
‘जागतिकीकरण’ हा आता आधुनिकतावादाला पर्यायवाचक शब्द बनला आहे. जगातील अनेक देशांचे जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते व विरोधक असे विभाजन झालेले आहे. ब्रेक्झिट व अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले आहे. साधारणतः शहरी भागातील, उद्योग व व्यवसायाशी निगडित उच्चशिक्षित व्यावसायिक, विद्यापिठीय विचारवंत हे जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते आहेत, तर ग्रामीण भागातील लोक, शेतकरी, कामगार हा समाज हा जागतिकीकरणाच्या विरोधात आहे. राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याची भूमिका त्याला अधिक सुरक्षितता देणारी वाटते. ब्रिटनपाठोपाठ अन्य युरोपीय देशातही नवराष्ट्रवादाच्या जागरणाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. या प्रक्रियेने ‘पुरोगामी’ व ‘समाजवाद’ या दोन संकल्पनांची व्याख्या बदलून गेली आहे. काही वर्षांपूर्वी कामगार व शोषित वर्ग यांच्या बाजूने बोलणे म्हणजे ‘समाजवाद’ मानला जात असे. मार्क्सने समाजवादी क्रांतीच्या आड येणार्या राष्ट्रवादाला विरोध केला होता. त्यामुळे शेतकरी, कामगार यांचे समर्थन करणारा ‘पुरोगामी समाजवाद’ हा राष्ट्रवादाच्या विरोधात मानला जाई. पण आता राष्ट्रवाद व शेतकरी, कामगार यांचे हितसंबंध एकत्र आले आहेत व स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणविणारे आंतरराष्ट्रीय भांडवलदारांचे समर्थक बनले आहेत. अमेरिकेत तर या नवसमाजवादाला आवाहन करून एक भांडवलदार, ट्रम्प अध्यक्षपदावर निवडून गेला आहे. त्यातच जिहादी मुस्लिमांच्या समस्येने या वादाला आणखी एक पदर निर्माण केला आहे. सामाजिक व राजकीय जीवनातून धर्माची हकालपट्टी करणे हे पुरोगामित्वाचे लक्षण मानले जात होते. पण जग ज्या वैचारिक संक्रमणातून गेले, त्यातून मुस्लीमसमाज गेला नाही. त्यामुळे आजही धर्म हाच मुस्लीमसमाजाच्या राजकीय किंवा सामाजिक अस्तित्वाचा केंद्रीभूत घटक आहे. त्यामुळे पुरोगामी समाजात धर्मप्रधान मुस्लीमसमाजाला सामावून कसे घ्यायचे हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःला ‘पुरोगामी’ समजणार्यांना धार्मिक आधारावर एखाद्या समाजाचा विचार करून निर्णय घेणे हे प्रतिगामीपणाचे लक्षण वाटते. परंतु, एखादा समाज आपली धार्मिक अस्मिता सोडायलाच तयार नसेल, तर केवळ पुरोगामी धर्मावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून मुस्लिमांच्या धार्मिक भावना बदलत नाहीत, असा अनुभव आल्याने जे व्यवहारी व रोखठोक विचार करणारे आहेत त्यांचा मुस्लीमसमाजाबरोबरच्या सहस्तित्वाला विरोध आहे. त्यामुळे अमेरिका व युरोपीय देशात जवळजवळ दोन स्वतंत्र भूमिका असलेले समाज तयार झाले आहेत व ते एकमेकांशी संघर्ष करण्याच्या भूमिकेत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मुस्लीमसमाजावर तांत्रिक हेरगिरी करायला ट्रम्प प्रशासनाने सांगितले तर त्याला नकार देऊ, असे अमेरिकेतील एका तंत्रज्ञांंच्या संघटनेने जाहीर केले आहे, तर याच्या अगदी उलट जर्मनीच्या चॅन्सलर मर्केल यांनी मुस्लीममहिलांनी बुरखा घालण्यास विरोध दर्शविला असून मध्य पूर्वेतून येणार्या निर्वासितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यास पाठिंबा दिला आहे. जर्मनीमध्ये मुस्लीमसमाजाच्या विरोधात जे वातावरण तयार होत आहे, ते लक्षात घेऊन त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.
गेल्या चारपाचशे वर्षात वैज्ञानिक क्रांती, औद्योगिक क्रांती आणि राष्ट्रवाद या तिन्ही क्रांत्या एकमेकांना पूरक ठरल्या. वैज्ञानिक क्रांतीने केवळ तंत्रज्ञानातच नाही, तर वैचारिक विश्वात व उत्पादन पद्धतीत क्रांतिकारी बदल केला. वैज्ञानिक क्रांतीपूर्वी पारलौकिक विचारांवर आधारित धर्मकल्पनेवर समाज चालत असे. त्यावेळी निसर्गातील गूढतेमुळे ईश्वराची उपासना करून त्यावर मात करता येईल असे माणसाला वाटत असे. परंतु, विविध वैज्ञानिक शोधांनी माणसाचा बौद्धिक आत्मविश्वास वाढला व आपण न पाहिलेल्या ईश्वराची पूजा करण्याऐवजी निसर्गाचे नियमशोधून काढून आपल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधू शकतो असा अनुभव त्याला येऊ लागला. साथीचे रोग आल्यानंतर देवाची पूजा करण्यापेक्षा औषधांचा उपयोग करून रोगाचे निवारण कसे करता येईल, याचा विचार तो करू लागला. यातूनच धार्मिक विचारांवर समाजाचे नियमन करण्यापेक्षा मानवी जीवनाला हितकारक वाटतील अशा नियमांच्या साहय्याने आपला समाज कसा चालविता येईल, असा विचार तो करू लागला. पारलौकिक, ईश्वरी आज्ञांच्या आधारे चालणार्या धार्मिक समाजाचे उपयुक्ततावादाच्या आधारावर चालणार्या इहवादी समाजामध्ये रूपांतर झाले. धर्माऐवजी ‘राष्ट्र’ हा समाजाचा आधार बनला. वैज्ञानिक शोधांमुळे जे तंत्रज्ञान निर्माण झाले त्याने औद्योगिक संस्कृतीला जन्मदिला. शेतीचे महत्त्व कमी झाले व भांडवलाचे महत्त्व वाढले. ग्रामीण भागातील व्यवसाय कमी झाले व शहरीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली. कर्तृत्ववान माणसे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शहरात धाव घेऊ लागली. विद्यापिठीय शिक्षण घेतलेला मध्यमवर्ग हा समाजाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण घटक बनला. त्याने धार्मिक नेते व राजघराणी यांचे महत्त्व कमी केले.

गेल्या पंचवीस वर्षांत संपर्क तंत्रज्ञानाने जी क्रांती केली त्यामुळे औद्योगेतर सामाजिक संस्कृती निर्माण होऊ घातली आहे. विविध प्रकारच्या जागतिक दळणवळणात जी क्रांती निर्माण झाली आहे त्यामुळे जग बाह्यतः एकत्र आले आहे. परंतु, त्यातून अनेक प्रकारचे तणाव निर्माण झाले आहेत. माणूस आणि व्यवसाय या दोन्हींचे झपाट्याने स्थलांतर होत आहे. त्यामुळे आपले सामाजिक संबंध बिघडतील काय व आपले आर्थिक उत्पन्नाचे साधन गायब होईल की काय, या भीतीने जग अस्वस्थ झाले आहे. त्यातच मुस्लीमसमाजात, अन्य प्रगत देशात झालेली औद्योगिक क्रांती व त्यातून निर्माण झालेली आधुनिक मूल्ये निर्माण झाली नाहीत. इतर प्रगत समाजाप्रमाणे त्या समाजात मध्यमवर्ग तयार झालेला नाही. त्यामुळे अशा समाजाचा प्रभाव वाढू लागल्यावर अन्य समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया निर्माण होऊ लागली. परंतु, या आधुनिकीकरणातून ज्या समाजाला फायदा झाला त्याचे हितसंबंध हे जागतिकीकरणात व त्यातून निर्माण झालेल्या जीवनमूल्यात आहेत. त्यामुळे जागतिकीकरणावर झालेला हल्ला हा या वर्गाला आपल्या अस्तित्वावर झालेला हल्ला वाटतो.
वास्तविक पाहता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत न आलेल्या वर्गाला जागतिकीकरणाविषयी जी भीती वाटते त्यातून त्याला मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार देणे आणि त्याबद्दलची जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील लोकांना जाणीव करून देणे हे प्रसारमाध्यमांचे कामअसायला हवे होते. तसे झाले असते तर या दोन्ही गटांना सांधणार्या दुव्याचे कामत्यांनी केले असते. जागतिकीकरणाची भीती वाटणार्यांच्या काही शंका काल्पनिक आहेत, तर काही खर्या आहेत. परंतु, ज्या काल्पनिक शंका आहेत त्यांची टवाळी करून राष्ट्रप्रेमाची भाषा बोलणे म्हणजे जणू काही आधुनिकतेशी किंवा मानवतेशी केलेला द्रोह आहे, असे जे वातावरण त्यांनी तयार केले आहे त्यामुळे या समाजगटाशी त्यांचे काहीच नाते राहिलेले नाही. याचा परिचय ब्रेक्झिट असो की अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक असा अनेकवेळा आला आहे. खरे सांस्कृतिक संकट हे आहे.
-दिलीप करंबेळकर