आकाशाशी जडले नाते- पर्शियन सूर्य

    23-Nov-2016   
Total Views |

“वेताळबाबा, आज कोणत्या मंदिराची सफर करायचीय आपण?”, सुमितने उत्सुकतेने विचारले.

“आज वेताळ नाही! वेताळ नाही!! दुर्गामातेने आज्ञा केली आहे – वेताळ बीताळ बंद करा म्हणून!”, आबांनी डोळे मोठे करून दुर्गाबाईंची नक्कल केली.

“अहो! काही पण काय सांगताय? मी नाई हो असा काही ‘आदेश’ दिला! चालू द्या की तुमचं विक्रम-वेताळाचे नाटक!”, दुर्गाबाई म्हणाल्या.  

“खर असं आहे, आजचे मंदिर विक्रम-वेताळापेक्षा तीन हजार वर्ष जुने आहे! त्यामुळे आजचा guide अश्वत्थामा आहे!”, आबा म्हणाले.

“म्हणजे जो कपाळावर भळभळ वहाणारी जखम घेऊन रानावनात हिंडतो तो?”, सुमितने खात्री करून घेतली.

“Exactly! महाभारताच्या युद्धातला survivor, अश्वत्थामा! आणि मी जी गोष्ट सांगणार आहे, ती महाभारत काळातली आहे. कृष्णाच्या सांब नावाच्या मुलाची.

“एकदा काय झालं, सांबला महारोग झाला. त्या रोगाच्या निवारणार्थ त्याने सूर्याची उपासना आरंभली. मित्रवन किंवा मैत्रवन येथे त्याने १२ वर्ष उग्र तपश्चर्या केली. सूर्याने प्रसन्न होऊन सांबला रोगमुक्त केले. अत्यंत आनंदित झालेल्या सांबने, कश्यपपूर येथे सूर्याचे ‘आदित्य मंदिर’ बांधले. पुढे कश्यपपूर नगराचे नाव ‘सूर्याचे मूळ स्थान’ यावरून ‘मूलस्थान’ आणि नंतर ‘मुलतान’ झाले.”, आबा म्हणाले.

“या नगराचे नाव पूर्वी कश्यपपूर का होते?”, सुमितने पृच्छा केली.  

“महाभारताच्या फार पूर्वी, रामाच्याही आधी, कश्यप ऋषींचा पुत्र हिरण्यकश्यपू, या प्रांताचा राजा होता. त्याची राजधानी – ‘कश्यपपूर’. नरसिंह रूपात विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध करून, प्रल्हादाचे रक्षण केले होते. तेंव्हा  प्रल्हादाने आपल्या राज प्रसादात नरसिंहाचे मंदिराचे बांधले. मुलतानच्या किल्ल्यातील नरसिंहाचे प्रल्हादपुरी मंदिर, अजूनही प्रसिद्ध आहे. फाळणीच्या दरम्यान, पुजाऱ्यांनी या मंदिरातील मूळ नरसिंह मूर्ती हरिद्वारला आणली.

“असो. आत्ता आपल्याला पाहायचे आहे ते इथले सूर्य मंदिर. महाभारत काळात मित्र, वरुण, अग्नी, वायू, इंद्र आदी देवतांची उपासना करत असत. या देवतांना यज्ञात हवी देऊन पुजत असत. मंदिर / चैत्य बांधत असत. पण देवतांची मूर्ती स्थापन करायची पद्धत नसावी. त्यामुळे सांबने बांधलेल्या मंदिरात सूर्याची मूर्ती असायची शक्यता कमीच आहे.”, आबांनी सांगितले.

“आबा, पण मंदिर म्हणाल्यावर मूर्ती कधीतरी आलीच असेल ना?”, सुमितने विचारले.

“काय झालं, मित्र किंवा सूर्य पूजा भारतातून पर्शिया मध्ये या पूर्वीच गेली होती. पर्शियन सूर्योपासकांनी अतिशय प्रेमाने, भक्तीने मित्राला मानव रूप दिले. पर्शिया मध्ये मित्राची मूर्ती रूपात पूजा होऊ लागली. मित्राच्या पुजाऱ्यांना ‘मॅगा’ म्हणत. त्या काळात या मॅगा लोकांचे चांगलेच प्रस्थ होते.

“मुलतानच्या आदित्य मंदिरात ५२० BCE च्या आधी कधीतरी, सूर्य मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी मॅगांना पाचारण केले. त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने सूर्याच्या मूर्तीची स्थापना केली. भारतात बरीच शतके सूर्याची प्रतिष्ठापना मॅगाच करत असत. खुद्द वराहमिहिराने बृहत-संहितेत सांगितले आहे की – सूर्याची स्थापना मॅगा कडूनच करून घ्यावी! मॅगांच्या पर्शियन प्रभावाने, साधारण ५०० CE पर्यंतच्या सूर्य मूर्तींनी पर्शियन झगा, कुस्ती म्हणजे पारसी जानवे व बूट घातलेले दिसते! नंतरच्या काळात सूर्य मूर्तीवर भारतीय संस्कार झाले. मग बूट, झगा गेले, ४ हात आले, आणि जसे विष्णूचे प्रस्थ वाढले, तसे विष्णूला जोडणारे ‘सूर्यनारायण’ असे नाव त्याला मिळाले!”, आबा म्हणाले.

“आपण जे देतो तेच आपल्याला कितीतरी पटींनी परत मिळते! पूर्वी आपण जी मित्रपूजा जगाला बहाल केली, तीच आणखीन सुंदर होऊन, सगुण होऊन आपल्याला परत मिळाली. पुढे काय झालं आबा?”, सुमित म्हणाला. 


“५१५ BCE मध्ये एका ग्रीक सरदाराने या मंदिराला भेट दिली होती, त्याने या मंदिराची ग्रीक कागदोपात्रात नोंद केली आहे. ७ व्या शतकात Hiuen Tsang या चीनी यात्रेकरुने आदित्य मंदिरा बद्दल भरभरून लिहिले आहे. डोळे दिपवणारी, सूर्याची रत्नजडीत सुवर्ण मूर्ती आणि मंदिराला भेट देणारे देशोदेशीचे हजारो सूर्यभक्त पाहून तो नतमस्तक झाला.

“८ व्या शतकात मुहम्मद बिन कासीम याने, तर ११ व्या शतकात मुहम्मद गझनवीने सूर्य मंदिर व नरसिंह मंदिर  लुटले. बरीच वर्ष मुलतान मध्ये राज्य करणाऱ्या अरबांनी, सूर्याची मूर्ती ओलीस धरली होती. हिंदू राजाने मुलतान वर आक्रमण केले की, ही मूर्ती तोडू अशी धमकी देऊन मुलतानची सत्ता राखली. १९ व्या शतकात, महाराजा रणजीतसिंगने मुलतान ताब्यात घेतले, तेंव्हा त्याला नावाला सुद्धा सूर्य मंदिर सापडले नाही. नरसिंह मंदिरात मात्र परवा परवा पर्यंत पूजा-अर्चा चालू होती. १९९२ मध्ये बाबरी ढांचा पाडल्यावर, पाकिस्तानात दीड - दोनशे मंदिरे तोडली, त्यातच हे नरसिंह मंदिर जमीनदोस्त झाले. आज पाकिस्तानातील हिंदू त्या जागेवर दुसरे बांधकाम होऊ नये म्हणून कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे.”, इतके सांगून अश्वत्थामाने एक सुस्कारा सोडला.

“अश्वत्थामा! आजच्या कहाणीचा अंत असा दुर्दैवी होणार का रे?”, न रहावून सुमितने विचारले.

“अरे! ही कहाणी संपली कुठे अजून?

“जगाला मित्र पूजा बहाल करणारे, आदित्य मंदिरासाठी प्राण वेचणारे आणि सूर्योपासना करणाऱ्यांमध्ये आजच्या पाकिस्तानी लोकांचे पूर्वजही होतेच की. आपले पूर्वज कोण होते, त्यांचे कार्य काय, आपण कोण आहोत हे विचार जेंव्हा पाकिस्तानी मनाला खुपतील, तेंव्हा ही गोष्ट एक नवीन वळण घेईल.

“त्यांचे सोड! आपल्याला तरी पाकिस्तान, अफगाणीस्तान, किंवा बांगलादेशचा हिंदू आणि बौध इतिहास कुठे ठाऊक आहे? शाळेत शिकतो तो भौगोलिक दृष्ट्या ‘आजच्या’ भारताचा इतिहास.”

“इतिहासातल्या या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांनी केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानात सुद्धा पोहोचले पाहिजे. तरच काही फरक पडायची शक्यता आहे!”, सुमित म्हणाला.

“सुम्या! माध्यमे सर्वत्र पोहोचली आहेत रे, पण मजकुराचे काय? पुढच्या भेटीत तुला माध्यमांची आणि एका सूर्य मंदिराची गोष्ट सांगेन!”

-दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.