शंकररावांनी दार उघडलं, अन् दुर्गाबाईंना म्हणाले - "आला ग तुझा Superman!"
"मी, Superman? का ग आजी?" सुमितने, हातातली sack टीपॉयवर ठेवत विचारले.
दुर्गाबाई म्हणाल्या, "अरे, अधनं मधनं तुझं जरा कौतुक करते ना मी, म्हणून!"
आबा म्हणाले, "अधून मधून? जरा? अरे! उठता बसता तुझं कौतुक करते! हसलास तरी कौतुक! शिंकलास तरी कौतुक! काय विचारतोस? बरं! ते राहू दे. आज काय फर्माईश?”
“आबा, सूर्याच्या प्रवासाबद्दल तुम्ही आणखीन काही सांगणार आहे, असे म्हणाला होता.”, सुमितने लगेच त्याची इच्छा सांगितली.
"हं!”, आवडता विषय निघताच, आबा उत्साहाने सांगू लागले, “कसं असते बघ आपलं, करायचं आपण, पण नाव दुसऱ्यावर घालायचं. जसं 'गणित चुकलं'! गणित चुकलं नसते, चुकलो असतो आपण. पण म्हणायचं 'गणित चुकलं’! किंवा लाल चष्मा घालायचा आणि म्हणायचं जग लाल आहे! खरंतर आपली दृष्टी लाल असते. तसं आपला दृष्टिकोन न जाणता, आपण जगाबद्दल मत तयार करतो."
"जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण फिरण्याचा आरोप आपण सूर्यावर करतो, हेच सांगायचे आहे ना?" सुमित हसत हसत म्हणाला.
"अगदी बरोबर ओळखलस, सुमित! आज आपण आपल्या दृष्टिकोनात बदल करू. पृथ्वीवरून आकाश बघायच्या ऐवजी, आकाशातून पृथ्वी बघू. अवकाशात दूर एका ग्रहावर उभे राहून पृथ्वीचा सूर्याभोवती होणारा प्रवास पाहू.”, आबा म्हणाले.
“परग्रहावर घेऊन जायला, माझा Superman बरोबर आहेच, तेवढी छान सोय झाली!", दुर्गाबाई मिश्कीलपणे म्हणाल्या.
“Yes! Krypton वरून पृथ्वी पाहू!”, कपाळावर एक बट ओढत सुमित म्हणाला.
"चलो Krypton!”, आबा म्हणाले, “सुमित, आपण मागे बोललो की पृथ्वीचा सूर्या भोवतीचा मार्ग perfect circle नसून ellipse आहे. त्या ellipse च्या एका focal point ला सूर्य आहे.
“मंद श्वास घेणाऱ्या प्राण्यासारखे या मार्गाचे स्पंदन होते. हा ellipse लहान होत होत जवळ जवळ circle होतो, आणि मग मोठा होत होत त्याचा ellipse होतो. की पुन्हा लहान!
“हा बदल फार सावकाश होत असतो. या मार्गाच्या एक श्वासोच्श्वासाला १,००,००० वर्ष लागतात!”
"या बदलत्या मार्गाचा पृथ्वीवर काही परिणाम होतो का?" सुमितने विचारले.
"होतो तर! पृथ्वीच्या कक्षेच्या आकारावर ऋतूंचा कालावधी ठरतो . पृथ्वी सूर्यापासून दूर असतांना, म्हणजे aphelion ला जे ऋतू असतात, ते अधिक लांबीचे असतात. या आकृतीतुन, elliptical आणि circular orbit मधील ऋतूंच्या लांबीतला फरक लक्षात येईल.
“सध्या उत्तर गोलार्धात वसंत ऋतू व उन्हाळा, थंडी व पानगळती पेक्षा ८ - ९ दिवसांनी मोठे आहेत. आणि दक्षिण गोलार्धात याच्या बरोबर उलट स्तिथी आहे.
“पृथ्वीवर साधारणपणे दर १,००,००० वर्षांनी हिमयुग येते, ते या चक्राशी बांधलेले आहे!”, आबांनी सांगितले.
“Wow! म्हणजे आबा, पृथ्वीवरचे कोणते प्राणी नामशेष होणार, स्थलांतरे कशी होणार, कोणत्या संस्कृती विकसित होणार, हे या आकाशातील घटनेवर अवलंबून आहे?!”, सुमितला आकाशातील मार्गाचा पृथ्वीवरील जीवांवर होणारा दूरगामी परिणाम दिसू लागला.
“अगदी बरोबर निष्कर्ष आहे तुझा सुमित! पृथ्वीच्या ऋतुचक्रावर परिणाम करणारा, अजून एक बदल या मार्गात होतो. हा ellipse स्वतः गोल फिरतो! असा - ”
“या बदलामुळे काय होते, perihelion बिंदू, म्हणजे सूर्यापासून सर्वात कमी अंतर असलेला बिंदू, पुढे पुढे सरकतो. सध्या ३ जानेवारीच्या आसपास असलेला perihelion हळूहळू फेब्रुवारीत जाईल. मग आणखीन पुढे जात जात, २१,००० वर्षांनी पुन्हा अवकाशात होता तिथे येईल.
“या दोन गतींमुळे २१,००० वर्षात ऋतूंची लांबी कशी बदलते ते बघ -
“ओह! म्हणजे सध्या जे उन्हाळा मोठा आहे, ते १०,००० वर्षांनी हिवाळा मोठा असणार! आबा, या चित्रात दिसणारे लाल बाण काय आहेत?", सुमितने विचारले.
"सुमित, ते बाण पृथ्वीची अजून एक हालचाल दर्शवतात. वरच्या आकृतीत, त्या हालचालीचा एक परिणाम आहे. त्याबद्दल आपल्याला सविस्तर बोलायला लागेल. पुढच्या आठवड्यात त्याबद्दल बोलू.”, आबा म्हणाले.
“हो बाई, सध्या landing करा आणि आठवडाभर स्वस्थपणे पृथ्वीवर राहा!”, असे म्हणत दुर्गाबाई दोघांना जमिनीवर घेऊन आल्या!
*Please note – all images are exaggerated so that the difference between ellipse and circle is visible. In reality the path of Earth is almost circular.
- दिपाली पाटवदकर