हे माणसा, तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला...
बाबूराव बागुलांच्या विद्रोही कवितेची ही कसदार आणि सणसणीत ओळ. शोषितांच्या वेदनेची तिरीप मराठी साहित्यात आणून मान्यतेची भीक न मागता मान्यता मिळविलेले असे हे दलित साहित्य. ही मंडळी केवळ ‘दलित’ होती म्हणून त्यांना संवेदनशील मराठी वाचकाच्या मनात हुकूमी स्थान मिळाले नाही, तर त्यांना ते स्थान मिळाले ते जगण्यातून, आलेल्या अनुभवातून प्रसविलेल्या साहित्यातून. सातरस्त्याच्या पुलाखाली भेटणार्या ढसाळांना सूर्याच्या रथाचे सातही घोडे मारण्याचा आत्मविश्र्वास त्यांच्या साहित्यनिर्मितीतून आला होता. काव्य इतके रसरशीत की ‘पद्मश्री’लाही त्यांना नंतर वरावेच लागले. सध्या साहित्य परिषदेच्या कसल्याशा निवडणुकीचे कुठेलेसे भाषण ‘विद्रोही’ म्हणून सर्वत्र फिरतेय. ढसाळ असोत, दया पवार असोत, किशोर शांताबाई काळे, शंकरराव खरात असोत या सगळ्यांना न पटलेल्या विषयात गरळ ओकत फिरण्याचे कामकरावे लागले नाही. आपल्यातल्या विद्रोहाचा झेंडा त्यांनी सतत आपल्या लिखाणातून फडकत ठेवला.
साहित्य हे समाजापासून निराळे असू शकत नाही हे बरोबरच, पण त्यासाठी भूमिका घेऊन मोजावी लागणारी किंमत दुर्गाबाईंसारख्यांनी आणीबाणीत मोजली होती. राजकारण करायला, न पटलेल्या विचारसरणीवर टीका करायला लोकशाहीत भरपूर व्यासपीठे उपलब्ध आहेत. तिथे कुत्राही फिरकत नाही म्हणून साहित्यिक व्यासपीठांचा वापर आपल्या ओकार्या काढायला करायचा, ही साहित्याशी केलेली बेईमानी आहे. स्वत:ला ‘साहित्यिक,’‘विचारवंत’ वगैरे म्हणवायचे असेल, तर तेवढ्याच ताकदीचे साहित्यही प्रसवावे लागते. विद्रोहाला तर वेदनेचा अनुभव हवाच, त्याशिवाय त्यात जिवंतपणाच येऊ शकत नाही. मात्र, सोईच्या राजकारण्यांबरोबरची चंगळ संपली की, विद्रोही वाटायला लागणे ही विकृती आहे. ज्यांनी या विद्रोहाची चळवळ चालविली ती माणसे खरोखच सच्ची होती. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी थेट राजकारण करावे. लोक आपल्यावर विश्वास ठेवत नसतील, तर ते का ठेवत नाहीत, याचा प्रामाणिकपणे विचार करावा. पण स्वत:च्या विखारी अजेंड्यासाठी महाराष्ट्रातले वैचारिक वातावरण कलुषित करू नये.
महाराष्ट्राला विद्रोही साहित्याचे वावडे नाही. ते कसदार असेल, तर ते स्वीकारले जातेच. विद्रोही साहित्याच्या आद्यपुरुषांनी ते सिद्धही केले आहे. वाट्याला आलेल्या विषमतेतून जे काव्य स्फुरले ते खरे. इथे कसला आला वारसा? मुळात वारसा आला की, तुम्ही प्रस्थापित झालातच की! महाराष्ट्राला जसे विद्रोही साहित्याचे वावडे नाही, तसेच ते परिवर्तनाचेही नाही. पण परिवर्तन करणार्यांचा मजूकर किती तगडा आहे यावर ते अवलंबून आहे. तो कसदार आणि अस्सल असला पाहिजे. जर तो द्वेषावरच अवलंबून असेल, तर त्याला ‘साहित्यिक अभिव्यक्ती’ म्हणायचे की, शिवीगाळ? कुठल्या त्या परिषदेचा अध्यक्ष पहिल्यांदा ‘दलित’ झाला म्हणून हे स्वीकारले पाहिजे वगैरे असा काही तरी येडपट प्रचार कुणी तरी सुरू केला आहे.
तुकाराममहाराजांचे अभंग महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत भक्तिपरंपरा जपणार्या वारकर्यांनी आपले मानले ते त्यातल्या काव्यसंपदेमुळे. तुकोबा ओबीसी होते म्हणून त्यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले नाही. सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा यांचे संतसाहित्य मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे स्वीकारले गेले नाही, तर त्यातल्या निर्मितीमूल्याचा तो विजय होता. स्वत:च जातीयवादी खेळ खेळायचे आणि इतरांना ‘जातीयवादी’ म्हणून हिणवायचे हा शुद्ध दांभिकपणा आहे. राजकारण मोकळेपणे करा. ‘आप’नेही ते केले आहे आणि लोकांनी त्यांना दिल्लीत भरभरून मतदानही केले. यांना वाटले की, पंतप्रधानांनी बोलायचे आणि नाही बोलले की मग ते जातीयवादी. या देशाचे सोडा, पण महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्या वेळी आज ‘पुरस्कारवापसी‘चे नाटक करणारे कुठे तरी जाऊन झोपले होते. मावळला पाणी मागायला आलेल्या शेतकर्यांवर गोळीबार झाला, त्याच्या किती तरी आधी झालेले गोवारी हत्याकांड हे वंचिताचे हत्याकांड नव्हते का? गोवारी शोषित वाटले नाही का? ज्यांनी पुरस्कार वाटून तुम्हाला खूश ठेवण्याचे आणि गरज पडली की, झांजा वाजवून घेण्याचे तंत्र विकसित केले, त्यांच्याविरोधात कधी यांनी जड जड शब्द वापरून बोलल्याचे ऐकवत नाही. विषमतेचे प्रश्न आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत. ते कोण नाकारतंय? देशात काही विरोधाभास आहेतच, हे सगळं घेऊनच हा देश पुढे जाणार आहे. ते असताना तुम्हालाही प्रश्न मांडण्याची संधी साहित्यिक म्हणून मिळतच आहे. ज्या डाव्या विचारांची कास तुम्ही धरली आहे, त्या विचारांनी चालणार्या देशात आज अभिव्यक्तीस्वातंत्र्याची नेमकी स्थिती काय आहे ते जरा तपासून पाहा. लोकशाही म्हणून प्रश्न सोडविण्याची जबाबदारी घेण्याचीही एक पद्धत आहेच. ती तर यांना कधीच नको आहे. साहित्य संमेलनाच्या आणि परिषदेच्या निवडणुकांत जो काही प्रकार चालतो तो यांना मंजूर आहे. गेल्या संमेलनाच्या निवडणुकीत जो काही नमुना निवडून दिला आहे, त्याला पाहिले, तर ‘आम्हाला वगळा...’ असेच आधीचे संमेलनाध्यक्ष म्हणत असतील. महाराष्ट्राचे साहित्यविश्र्व एका सक्षमसाहित्यसंपदेवर उभे आहे.
संतसाहित्यापासून ते विद्रोही साहित्यिकांच्या खर्या काव्यावर मराठी वाचनसंस्कृतीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिकतेचा पिंड पोसलेला आहे. जे सत्य आहे, ज्यात सत्त्व आहे अशा सर्वच गोष्टींबरोबर खरा पुरोगामी महाराष्ट्र सदैव उभा राहिला आहे. जेएनयु कॅम्पस आणि ‘फेसबुक‘च्या चव्हाट्यावरून बाहेर पडून कधी तरी नाशिकला काळ्या रामाच्या मंदिराजवळ जा. मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खाद्यांला खांदा लावलेल्यांची पाटी तिथे लावली आहे. आडनावावरून जात तपासण्याची जित्याची खोड नाही तरी तुम्हाला आहेच. ती माणसे कोण आहेत ते पाहा. महाराष्ट्र असा आहे नाही, तर तुकोबांची काठी आहेच.