नंदूरबार जिल्ह्यातील उत्तर टोकाला नर्मदा किनारी कंजाला आणि आजूबाजूच्या गावात लगबग चालली होती. गावात जणू जत्रेच वातावारण होत. प्रत्येक महिला आपल्या विशेष कामात गुंतली होती. कंजालामधे तर सगळ गाव सजवल जात होत. आजूबाजूच्या गावातून लोक यायला सुरूवात झाली होती. पारंपारीक वेषात पुरूष, महिला , मुले येत होते. महिलांनी पारंपारीक दागिने पण घातले होते आणि हातात होत्या सजविलेले ताट, टोपल्या. एका प्रशस्त मंडपात प्रत्येक महिला ताट ठेऊन नावनोंदणी करत होती. सगळीकडे खमंग वास येत होते. सगळे जमल्यावर ताटांवरची कापड काढली गेली. आणि समोर जंगलातला खजिना खुला झाला. साधारण १००-१२५ ताटांमधे तेवढ्याच प्रकारच्या रानभाज्या दिसत होत्या. तोंडाला पाणी सुटले होते. कंजाला गावातील तिसऱ्या वनभाजी जत्रेच हे दृष्य डोळ्यासमोरून जात नाहीये.
वनभाज्या किंवा रानभाज्या म्हणजे शेतात, जंगलात, ओढ्यात मिळणाऱ्या वनस्पती ज्या स्थानिक लोक परंपरेने खातात. या वनस्पती सगळीकडे मिळतात. अगदी शहरात सुद्धा यातील काही मिळत असतील. पण जनजाती भागात याच प्रमाण जास्त आहे. आजही आहे. ते कुठे मिळतात, कसे खातात याच ज्ञान तेथील समाजाला परंपरेनी मिळत असत. या रानभाज्या जास्तकरून पावसाळ्यात येतात. त्यामुळे इतर भाजीपाला उपलब्ध नसताना त्या महत्वाचा अन्नस्त्रोतही ठरतात. पण नविन शिक्षण पद्धतीने आणि शिकलेल्या समाजाने आपल्या परंपराना बाद ठरविल्याने काही चांगल्या गोष्टीपण बाद झाल्या. तेच रानभाज्यांच झाल. सुपोषणाचा चांगला स्रोत असलेल्या भाज्या नव्या पिढीच्या गावीही नाहीत. ग्रामीण भागात विशेषतः नवीन शिक्षण ण घेतलेल्या घरातील शिकलेल्या मुला मुलींना तर आपल्या घरच्यांना काहीच येत नाही असा समजच दृढ होत गेला. त्यामुळे स्थानिय ज्ञानाचा वापर कमी होत गेला. याचा एक परिणाम स्थानिक निसर्गाकडे दुर्लक्ष होण्याकडे झाला. पण निसर्गचक्रा प्रमाणे माणसाच्या प्रश्नांच चक्र त्याला जुन्या गोष्टी आठवायला भाग पाडत. तसच रानभाज्यांच झाल. कुपोषणाचा प्रश्न जसा आवासून ऊभा राहीला तसा हा अमूल्या ठेवा लोकांच्या लक्षात यायला लागलाय. कंजाला गाव हे याच प्रातिनिधिक उदाहरण.
जनजाती भागात आजही लोकांचे जीवन स्थानिक निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याची जाण, माहीती लोकांजवळ आहे. पण अवलंबित्व बदलत नसल तरी माहितीची कमतरता वाढत आहे. नवी शाळेत शिकलेली पिढी या सगळ्यापासून कोसो दूर आहे. जे खूप शिकून शहरात गेलेत त्याना सोडून द्या. पण जे गावात आहेत पण माहीती नाही त्यांच काय? असा प्रश्न समोर आहे. नाशिक मधील एका गावात चर्चा करत असताना एकाने या परिस्थितीच खूप छान वर्णन केल. तो म्हणाला शिकलेली पोर म्हणजे ' शाळेत जाऊन बांधतो पट्टा, राशनच्या दुकानात घेतो कट्टा'. विनोदाचा भाग सोडला तर शेती करण्यात या मुलांना येणारी अडचण ही मोठी समस्या निर्माण होत आहे. तितकीच किंवा अजून वाईट स्थिती जंगलाचा वापर या संबंधी आहे. जोडीला शासन प्रयत्नांमुळे जंगलाविषयी एक परकेपण तयार झालय ते वेगळ. त्यामुळे रानभाजी जत्रांच महत्व अजून अधोरेखीत होतय.
या जत्रांमुळे विविध गोष्टी साध्य होत आहेत. गावामध्ये जंगलांविषयी जागरूकता निर्माण करता येत आहे. नविन पिढीला या संपत्तीचे दर्शन होत आहे. जंगल संरक्षण प्रयत्नाना मदत होत आहे. स्रियांकडे असलेले ज्ञान समोर येत असल्याने त्यांना सन्मान मिळत आहेत. शाळा शिकणाऱ्या मुला मुलींना आपले आई-वडिलांची नव्याने ओळख होत आहे. देशाच्या वन संप्पत्तीची नोंद होत आहे. ती नोंद स्थानिक लोकच करत आहेत. ही नोंदणी फार महत्वाची आहे. हळदी पेटंटचा लढा आपण पाहीला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तर हे महत्वाच आहेच. याबरोबर स्थानिक वनाच्या व्यवस्थापनासाठी पण गरजेचे आहे. यातून गायरानावर झाड लावण्यासारख्या चुका थांबवता येतील. जैवविविधता कायद्याने अशा नोंदणीकरणाला कायदेशीर आधार गिला आहे. त्यासाठी एक शास्त्रीय पद्धत पण दिली आहे. रानभाज्या जत्रांसारखे उपक्रम हे शास्त्रीय पद्धतीने नोंदणी करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होऊ शकते.
कंजाला मधे हा प्रयत्न जून २०१४ ला पर्यावरण दिनी सुरू झाला. गावस्तरीय जैवविविधता समित्या, एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ व योजक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या कामाची सुरुवात झाली. त्या वर्षी ४४ भाज्या होत्या. गेल्या वर्षी ७१. तर या वर्षी १२४. त्यामुळे ज्ञानाची व्याप्ती पण वाढत आहे. या सगळ्या प्रयत्नाचे आयोजन स्थानिक लोक करतात. यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना पण बोलाविले जाते. याशिवाय वनविभागाचे कर्मचारी, शासकीय अधिकारी व शहरातील लोकही येतात. भाज्यांच्या आस्वादा बरोबर स्थानिक संगीत, गीत, नृत्य, कथा असे कार्यक्रम हि असतात.
या प्रयत्नातून काही नविन विषयही समोर येत आहेत. त्याच झाल अस की कोणती भाजी कधी मिळते हे सांगताना महिला भिली महिने सांगत होत्या. जे तरूण नोंदणीकरत होते त्यांना सगळे महिने समजत नव्हते. त्यामुळे त्यांचा आग्रह होता की मराठी किंवा इंग्रजी महीन्यात सांगा. ते महिलांना जमत नव्हत. ज्यांना थोडफार जमल त्यांना भिली महिने व इतर महिने यात मेळ घालता येत नव्हता. यातून भिला कँलेंडर बनवायची कल्पना पुढे आली. या वर्षी तिथल्या एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळाने ते तयार करून ३० शाळांना सुद्धा दिले आहे.
जे ज्ञान गोळा होत आहे त्यावर समाजाचा अधिकार प्रस्थापित करण्याची गरज आहे. कायद्यानी दिलेला अधिकार वापरण्याची गरज आहे. पण कायद्यात म्हंटल्याप्रमाणे सगळी नोंद पुरी होत पर्यंत थांबायचे का छोटे भाग पुर्ण करत प्रक्रिया करायची हा पण प्रश्न आहे. कंजाला मध्ये दुसरा मार्ग निवडला आहे. पाच गावातील जैवविविधता समित्यांनी एकत्र येऊन 'कंजाला परिसरातील रानभाज्या' हे पुस्तक तयार केल. काही शास्त्रज्ञानी या कामाला शास्त्रीय मदत केली. या मधे भाज्यांची माहीती, त्यांची नावे, त्यांचे महत्व, कोणत्या महिलेने माहीती दिली तिचे नाव, गाव लिहीले आहे. या पुस्तकाच प्रकाशन महाराष्ट्राचे मा. राज्यपाल यांनी ८ मार्च २०१६ ला महिला दिनी राजभवनात केल. यासाठी १० महिला थेट राजभवनात गेल्या होत्या.
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे गेल्या १३ वर्षा पासून रानभाजी स्पर्धा होत आहेत. या वर्षी १०० हून अधिक महिलानी या वर्षी भाग घेतला. या कामाची प्रेरणा कंजालात काम सुरु करताना होतीच. योजकच्या सहयोगी संस्थांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षी नंदुरबार, अमरावती, नांदेड येथील एका एका गावात हा प्रयत्न झाला. या वर्षी तर याला अजूनच प्रोत्साहन मिळाल आहे. वनवासी कल्याण आश्रमाने पुणे व नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी ४ गावात हा उपक्रम केला. पर्यावरण विषयात काम करणाऱ्या कल्पवृक्ष, पुणे या संस्थेने पण तीन गावात रानभाजी महोत्सव घेतले. औरंगाबाद जवळ पण एका ठिकाणी असा उपक्रम झाला.
विज्ञानाला समजून घेऊन त्याचे लोक परंपरेत रुपांतर करीत ज्ञानाची प्रक्रिया पुढे सुरु ठेवण्याची भारतीय परंपरा आहे. नवरात्र हे या परंपरेचे जिवंत उदाहरण आहे. कालौघात या परंपरांमढील विज्ञान कमी होत चालल आहे. पण त्यासाठी या परंपरांना नाव न ठेवता याचा उपयोग नवीन ज्ञान आधारित परंपरा निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. रानभाजी जत्रा हा असाच एक प्रयत्न आहे. आयुर्वेदा मध्ये कोजागिरी पौर्णिमेला वनस्पती शक्ति सर्वाधिक प्रभावी असते असे म्हटले आहे. येणाऱ्या कोजागीरीपासून आपल्या परिसरात असा रानभाजी उत्सव करता येईल का? केलात तर आम्हालाही कळवा.