विक्रम और बेताल  

    10-Oct-2016   
Total Views |

सध्या आपल्या देशात दोन गोष्टी गाजत आहेत. नियंत्रणरेषा ओलांडून आपल्या सैन्याने केलेला विक्रम आणि आपल्या राजकारण्यांची व लिबरल पत्रकारांची बेताल वक्तव्ये. 

उरी हल्ल्याचा सडेतोड बदला भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक्स करून घेतला. खुद्द भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांकडून तशी अधिकृत घोषणा झाली. पाकिस्तानला अर्थातच हे हल्ले झाले हे कबूल करणं परवडण्यासारखं नव्हतं त्यामुळे सीमेपलीकडून 'हे हल्ले झालेच नाहीत' असा पद्धतशीरपणे प्रसार करण्यात येतोय. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हा विखारी प्रचार भारतातही केला जातोय आणि तो ही भारतीयांकडूनच. गेल्या काही दिवसात मोदीद्वेषाची कावीळ झालेल्या विरोधी पक्षातल्या काही वाचाळवीरांनी ह्या हल्ल्यांबाबत जे अकलेचे तारे तोडले आहेत ते पाहता अश्या लोकांची खरोखरच कीव येते. 

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि समस्त ब्रह्मांडाचे स्वघोषित नेते श्री अरविंद केजरीवाल ह्यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे व्हिडियो पुरावे द्यावेत अशी हास्यास्पद मागणी करून आपल्याला देशहिताची नाही तर केवळ पंजाबमध्ये येऊ घातलेल्या निडणूकांचीच चाड आहे हे स्पष्ट दाखवून दिले. कदाचित लष्करी कारवाईचा व्हिडियो केजरीवाल ह्यांचा त्यांच्या पक्षातले सहकारी संदीप कुमार ह्यांच्या 'रेशन कार्ड सीडी' इतका सोपा वाटला असावा!  

केजरीवाल ह्यांचे सहकारी आशुतोष ह्यांनी तर त्यांच्या एका ट्विट मधून आपली खरी मळमळ ओकूनच टाकली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की मोदी सरकारने ह्या हल्ल्यांचा नामोनिर्देशही प्रसिद्धीसाठी करू नये! आता एका मोहल्ला रुग्णालयाचं उदघाटन केलं तरी सरकारी खर्चाने पान-पान भर जाहिराती देऊन फुकट प्रसिद्धीसाठी आणि मतांसाठी उपयोग करणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी हा उपदेश दुसऱ्यांना करावा हा एक मोठ्ठाच विनोद आहे. 

तिकडे दिल्लीत केजरीवाल हे बरळले, मग इकडे महाराष्ट्राचा 'जाणता' नेता कशाला मागे राहील? त्यांनी लगेचच 'आम्ही संरक्षण मंत्री असतानाही असे हल्ले झाले होते पण आम्ही कधी त्याचा बोभाटा केला नाही' असे उदारपणे जाहीर केले. आता पवारांना बऱ्याच गोष्टी बिनबोभाट करण्याची कला अवगत आहे, नव्हे, गवगवा न करता गुपचूप अनेक गोष्टी करणे हे साहेबांचे धोरणच आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतो, पण त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या ह्या तथाकथित हल्ल्यांबद्दल बोलायला साहेबांना तेव्हा कोणी बरे अडविले होते? 

आप आणि राष्ट्रवादी ह्या पक्षाच्या नेत्यांनी इतके अकलेचे तारे तोडल्यावर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस कसा बरे मागे राहील? काँग्रेस नेते संजय निरुपम ह्यांनी तर ही कारवाई खोटीच होती असे तारे तोडले. अर्थात निरुपम ह्यांच्याकडून शहाणपणाची कोणीच अपेक्षा करत नसल्यामुळे त्यांचे वक्तव्य ऐकून कुणालाच फारसा धक्का वगैरे बसला नाही. पण त्याच काँग्रेस पक्षाचे पन्नाशीला आलेले तरीही, 'युवा आणि भावी' अशी दोन बिरुदे गेली कित्येक वर्षे अभिमानाने मिरवणारे नेते श्री राहुल गांधी ह्यांनी तर कळसच गाठला. पंतप्रधान मोदींवर त्यांनी चक्क 'खून की दलाली' करण्याचा आरोप एका जाहीर सभेत केला. एकूणच गांधी मायलेकांना बी ग्रेड हिंदी सिनेमांचं खूपच आकर्षण दिसतंय. कारण दोघांच्याही भाषणातून 'मौत के सौदागर', 'जहर की खेती' आणि 'खून की दलाली' अशी केवळ रामसे बंधूंच्या भयपटांच्या नावात शोभून दिसेल अशी भाषा वारंवार वापरली जाते. पंतप्रधान मोदींविरुद्ध अशी शिवराळ, भडक भाषा वापरली तर त्याचा मोदींना फायदाच होतो हे अनेक वेळा दिसून आले असतानाही गांधी माय-लेक नेमकी तीच चूक परत परत करतात हे विशेष. 

सत्तेसाठी राजकारण सगळेच राजकीय पक्ष करतात, पण किमान देशाच्या सुरक्षिततेविषयी, भारतीय सैन्याविषयी बोलताना तरी सगळ्या राजकीय पक्षांनी एकवाक्यता दाखवावी अशी कुठल्याही सुजाण नागरिकांची अपेक्षा असते, पण सध्या बेताल विधाने करण्यात विरोधी पक्षनेत्यांमध्ये चढाओढ चालू आहे असेच चित्र दिसते. अर्थात केवळ राजकारणीच वायफळ बडबड करत आहेत असे नाही, तर पत्रकार, सिने कलाकार आणि स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारी काही अतिशहाणी टाळकी ह्या लोकांमध्येही सध्या वाट्टेल ते बरळण्याची साथ चालू आहे असे दिसते. मिता वसिष्ठ नामक कोणी एक बी ग्रेडची अभिनेत्री बाई आणि ओम पुरी ह्यांच्यासारखे सिनेकलाकार ज्या उद्दामपणाने वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी कारगिल युद्धात वीरमरण पत्करलेल्या लेफ्टनंट विजयंत थापर ह्या सैनिकाच्या सत्तरीला आलेल्या वडिलांशी बोलले, ते खरोखरच संतापजनक होतं. मुळात हे लोक अभिनेते आहेत. त्यांना देशाच्या संरक्षणाबद्दल काय कळतं? तरीही त्यांना टीव्ही वर का बोलवतात? त्यांचा माजोरडेपणा देशाला दाखवायला? 

देशाचे संरक्षण आणि अस्मिता हे राजकारणबाह्य मुद्दे आहेत. किमान ह्या दोन गोष्टींबद्दल बोलताना तरी लोकांनी तारतम्य बाळगायला हवे. आपले सैनिक सध्या सीमेवर तैनात आहेत. तिथे कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. आपल्या कुटुंबापासून हजारो मैल दूर राहून देशसेवेत तैनात असलेल्या सैनिकांपर्यंत ह्या बातम्या पोचतातच. अश्या बेताल वक्तव्यांचा सामान्य सैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो हे ह्या वाचाळवीरांना जर स्वतःहून समजत नसेल तर त्यांना कुणीतरी हे लक्षात राहील अश्या भाषेत समजावून सांगायची वेळ आली आहे. 

माझा एक जवळचा मित्र भारतीय सैन्यात अधिकारी आहे. आता तो काश्मीरमध्ये सीमेवर तैनात आहे. तिथे कधीही, काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे सध्या. दोन दिवसात त्याचा व्हॉटसऍप वर काही मेसेज नाही आला तर मला छातीत धडधडतं मग हजारो मैल दूर असलेले त्याचे आई-वडील, त्याची पत्नी, त्याची दोन वर्षांची मुलगी ह्यांचं काय होत असेल?

माझं कर्नल थापर ह्यांना लिहिलेलं प्रकट पत्र वाचून त्याने मला परवा फोन केला, म्हणाला, 'ह्या ओम पुरी सारख्या दिडदमडीच्या माणसांनी तोडलेले हे तारे ऐकून उद्वेग येतो आम्हाला कधी कधी. अगदी वयाच्या विसाव्या-एकविसाव्या वर्षी आम्ही गणवेष परिधान करतो. आमच्या वयाची इतर मुलं पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं की ऑस्टेलियाला हा विचार करत असताना पाठीवर वीस-वीस किलोचं ओझं घेऊन आम्ही पंधरा किलोमीटर चालतो. ही आमचीच निवड आहे. खरंच आहे. पण जेव्हा माझ्या तुकडीतले जवान त्यांच्या त्यांच्या फोनवर अशी क्लिप्स बघतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. त्यांचं मनोधैर्य खचतं. त्यांना वाटतं की ह्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो आपण? सध्या माझा खूप वेळ माझ्या बॉइजना मोटीवेट करण्यात जातो. कारण सैन्य लढत असतं ते मनोबलाच्या जोरावर, हत्यारांच्या नव्हे'. 

केवळ राजकारण करण्यासाठी किंवा फुकट प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भारतीय सैनिकांच्या विश्वसार्हतेबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या लोकांना हे कधी कळणार?  

- शेफाली वैद्य 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.