यंदाची लोकसभा निवडणूक देशाला दिशा देणारी!- देवेंद्र फडणवीस

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये सभा

    04-May-2024
Total Views |
df
 
मुंबई : "यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाचा नेता निवडण्याची, पुढची पाच वर्षे देश कुणाच्या हातात सुरक्षित असेल, देशाला विकासाकडे कोण घेऊन जाईल, जनसामान्यांच्या आशा-अपेक्षा कोण पूर्ण करेल, हे ठरवणारी, देशाला दिशा देणारी निवडणूक आहे", असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ४ मे रोजी केले.
 
सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री शंभुराज देसाई, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, देशात दोन वेगवेगळे धृव तयार झाले आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या सोबत महायुतीचे सर्व घटकपक्ष आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. त्यांच्यासोबत २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्यात कुणी कुणाला नेता म्हणायलाच तयार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

df
 
साताऱ्यातील विकासकामांसदर्भात बोलताना ते म्हणाले, २०१४ ला आमचे सरकार आल्यानंतर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्पाची कामे हाती घेतली. मोदींनी या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्याआधी येथील सर्व योजना बंद पडल्या होत्या. पण राज्यात सरकार आल्यावर सर्व सिंचन प्रकल्पांना आम्ही भरघोस निधी दिला. त्यामुळे आज एक एक प्रकल्प पूर्णत्वाला जात आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागही आज जलमय होत आहे. उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही सर्व कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
बाळासाहेब देसाई यांना पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणार
महाराष्ट्राने बाळासाहेब देसाई यांना लोकनेते हा बहुमान दिला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि महाराष्ट्र उभा करण्यात अग्रणी नाव असलेले ते लोकनेते आहेत. त्यांना पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी मी स्वत: केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. या संपूर्ण डोंगराळ भागातील विकासाचा विचार त्या काळात त्यांनी केला. कितीही राजकीय वादळे आली, तरी लोकांचे प्रेम देसाई कुटंबावर राहिले, ही त्यांची पुण्याई आहे आणि उदयनराजे हे काम पुढे नेत आहेत, याचा मला अतिशय आनंद आहे. उदयनराजेंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी पूर्ण केल्या आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यांनी सांगितले, म्हणजे कामगिरी फत्ते झालीच, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.