ठाण्यात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा धडाका

रेल्वे प्रवाशांसमवेत संवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद

    04-May-2024
Total Views |

ठाणे लोकसभा
 
ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी शनिवारी सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचार सुरु केला आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
 
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करत असतात. फलाट क्रमांक १ येथे शनिवारी सकाळी ६.३० वाजता प्रवाशांसमवेत संवाद साधत आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. ठाणे प्रादेशीक मनोरुग्णालय येथील विस्तारीत रेल्वे स्थानक, वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात, पादचारी पूल अशा विविध प्रश्नांवर यावेळी म्हस्के यांनी प्रवाशांशी चर्चा केली. 

ठाणे लोकसभा
 
जनहिताचा वारसा असलेल्या आणि देशाभिमानाचे बाळकडू पाजणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला म्हस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात देशात तर गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीने केलेल्या विकासकामांबाबत यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिर उभे राहिल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
 
मासुंदा तलाव येथील मारोतराव शिंदे तरण तलावाशेजारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सद्य परिस्थितीतील विविध विषयांवर म्हस्के यांनी गप्पा मारल्या तसेच जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधला.