गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात

    04-May-2024
Total Views |
लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे वाहू लागले असून यात आता आणखी एका कलाकाराला उमेदवारी जाहिर झाली आहे.
 

nandesh  
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीचे वातावरण सध्या देशभरात पसरले आहेत. अनेक नवे उमेदवार उभे राहात असून यात मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. दोन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक झाली असून पुढचे टप्पे लवकरच पुर्ण होतील. अशात संगीत क्षेत्रात शाहीरी वारसा पुढे नेऊन जपणारे गायक नंदेश उमप (Nandesh Umap) यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
नंदेश यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली असून मायावती यांच्या बसपा पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबई उत्तर पूर्वच्या विक्रोळी मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. याच मतदारसंघातून भाजपकडून मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटीलही उभे आहेत.
 
निवडणूक अर्ज भरल्यानंतर नंदेश उपम यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, “नव्या इनिंगला सुरूवात झाली आहे. मनात खूप चांगली भावना आहे. गाणे तर चालू आहेच, पण ही इनिंग लढायला काय हरकत आहे. म्हणून लढतोय. माझा जन्मच विक्रोळीत झाला असून तिथं आमची माणसं आहेत. तसंच सर्वच जातीधर्माची माणसं आहेत. मला लोकं ओळखतात. बाबांनी केलेले काम असल्यामुळे तिथूनच लढतोय”.
 
पुढे ते म्हणाले की, 'बाबासाहेबांची ऊर्जा घ्यायला मी चैत्यभूमीवर आलो आहे. सर्वांची प्रेरणा घेऊन लढणार आहे. रसिकांनी माझ्या गाण्यावर प्रेम केलं ते मला इथंही साथ देतील अशी आशा आहे. कलाकारांचा मुद्दा मला ठामपणे मांडायचा आहे. मी लढणार आहे. मी थांबणार नाही”.