सूनबाई...

    03-May-2024
Total Views |

Sunetra Pawar

(Sunetra Pawar and Supriya Sule - File Photo)


येत्या 7 तारखेला म्हणजे मंगळवारी राज्यात लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपन्न होईल. यात बहुतांशी लढती या लक्षवेधक आहेत. अर्थात, पश्चिम महाराष्ट्रातील या लढतींकडे ज्या मतदारसंघात अशी लक्षवेधक लढत होते, त्यातील बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्याला कारणेदेखील अनेक आहेत आणि ती लढतदेखील अनेकार्थांनी यावेळी अतिशय महत्त्वाची होऊन बसली आहे. जवळपास 1984 पासून या मतदारसंघावर शरद पवार घराण्याचे एकहाती साम्राज्य. देशात एकेकाळी प्रगल्भ राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात असे, असे शरद पवार यांच्या परिवारातील व्यक्तींनी 1985 आणि 1989च्या पोटनिवडणुका सोडल्या, तर या मतदारसंघावरील ताबा काही सोडला नाही. केवळ आपल्या घरातील व्यक्ती राजकारणात असावी, या एकमेव महत्त्वाकांक्षेसाठी पवारांनी काँग्रेससारख्या त्या काळातील बलाढ्य पक्षासह त्यांना महत्त्वाच्या वेळी साथ देणार्‍या पक्षाची देखील डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे स्वार्थी राजकारण होत असल्याचे बघून देखील, त्यांचे मित्रपक्ष मूग गिळून बसण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही. एवढेच कशाला अनेकवेळा दगा होऊन देखील पवारांविरोधात काँग्रेसची सक्षम उमेदवार उभा करण्याची हिंमत झाली नाही, यातच या पक्षाची हताशा आणि अपरिहार्यता लक्षात येते. तथापि शरद पवारांनी हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवताना जे राजकारण केले, त्यामुळे राजकारणातील विश्वासघात आणि अस्थिरता या गोष्टींवरच अधिक भर दिल्याचे आढळून येते. त्यांचे राजकारण हे ना धड स्वतः पूर्णकाळ सत्तेत टिकून राहण्याचे होतेे आणि अन्य कुणाला देखील सत्तेत टिकू द्यायचे नाही, अशा थाटाचे असायचे. लोकसभेसाठी या मतदारसंघात अजित पवारांना केवळ एकदा संधी मिळाली. तथापि, 1984 पासून 2019 पर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हेच उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले. आता या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच ‘पवार विरूद्ध पवार’ असा सामना रंगला आहे. या मतदारसंघात आता शरद पवारांना स्वतःकडे ही जागा अबाधित ठेवणे अवघड होऊन बसले आहे. कारण, खुद्द घरातीलच सुनेने त्यांच्यासमोर उभे केलेले आव्हान!
वहिनीसाहेब...

शरद पवारांकडून कायमच नैतिकतेला धाब्यावर बसवून केल्या जाणार्‍या राजकारणाला अनेक जण कंटाळले होते. ना धड सत्ता पदरी पडत होती, ना सत्तेत वाटा मिळवून दिला जात होता. आपल्या मतदारसंघातील लोकांना उत्तरे द्यायची कशी आणि मतं मागायला पुन्हा जायचे कसे, हे प्रश्न एखाद्या टांगत्या तलवारीप्रमाणे शरद पवारांकडील राष्ट्रवादीत असलेल्या असंतोष असणार्‍या आमदारांना केव्हाही घात होईल म्हणून अक्षरशः बोचत होते आणि शरद पवार मात्र राज्यात भलतेच उद्योग करून केवळ आपल्या मुलीचे राजकीय अस्तित्व टिकावे म्हणून वाट्टेल त्या स्तराला जात राजकीय खेळी खेळत होते. अखेर कंटाळून त्यांच्याजवळच्या लोकांमधील प्रचंड चलबिचलता आणि अस्वस्थतेचा कडेलोट झाला आणि अजित पवार अखेर त्यांच्या अशा कुरघोडीच्या आणि विश्वासघातकी वृत्तीच्या राजकारणाचा पर्दाफाश करून बाहेर पडले, नव्हे तर त्यांनी त्याच बारामती मतदारसंघात स्वतःच्या पत्नीला उमेदवारी देऊन आपल्या काकांपुढे तगडे आव्हान उभे केले. आत बघायचे आहे की, 2009 पासून या मतदारसंघात निवडून येणार्‍या सुप्रिया सुळे यांची डाळ किती शिजते ते. दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांचे आव्हान असल्यामुळे ही लढाई अटीतटीचीच. 2019 मध्ये सुळे यांना 6 लाख 86 हजार 714 मतं मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी भाजपच्या कांचन कूल यांना 5 लाख 30 हजार 940 मतं होती. त्यामुळे यावेळी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी भाजपची ताकद असल्याने आणि त्यांचे या मतदारसंघातील वाढते मताधिक्य सुळेंसाठी डोकेदुखी ठरेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, 2014 साली सुळे यांची लढत ही रासपचे महादेव जानकर यांच्या विरोधात होती आणि त्यांनी 4 लाख 51 हजार 843 मते मिळविली होती. त्यामुळे पवार घराण्याविरोधात तेथे गेल्या काही काळापासून धूसफुस सुरू असल्याचे यावरून लक्षात येते. आता तर खुद्द पवार कुटुंबातीलच व्यक्ती त्यांचे कारनामे जाहीर करीत असल्याने, सुनेत्रा पवारांना येथून विजय मिळविणे तसे जड जाणार नाही, असेच एकंदरीत चित्र दिसते.

- अतुल तांदळीकर