अभिराम भडकमकर यांच्या सीता कादंबरीवरील लेखास प्रथम क्रमांक

    03-May-2024
Total Views |

sita 
 
मुंबई : बुक अट क्लिक या संस्थेने आयोजित केलेल्या 'उत्तम वाचक लेखन स्पर्धा' या स्पर्धेत तृप्ती कुलकर्णी या स्पर्धकास प्रथम पारितोषिक लाभले आहे. तृप्ती यांनी अभिराम भडकमकर यांच्या सीता या पुस्तकाविषयी लेख लिहिला होता. मला आवडलेले पुस्तक असा या स्पर्धेचा विषय होता. तृप्ती यांच्यासोबत संदीप भीमराव कोळी यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे आणि विशाखा कुलकर्णी व डॉ. केतकी भातखंडे या दोघीना तिसरा क्रमांक विभागून दिलेला आहे. याबरोबरच, उत्तेजनार्थ पारितोषिके ३ सहभाग कर्त्यांना लाभले आहेत. दीप्ती जोशी, नितीन पासलकर आणि प्रभाकर मोतीराम पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
 
आपल्या पुस्तकाविषयी आणि सीतेविषयी बोलताना अभिराम बोलतात, "रामायण आपल्या कानावर अगदी लहानपणापासूनच येतं. ते कथेच्याही आधी ‘गीतरामायणा’तून माझ्यापर्यंत पोहोचलं आणि त्याचबरोबर मैथिली शरण गुप्तांचे ‘साकेत’ मी ऐकले होते. मोरारजी बापू हरियाना यांच्या दहा दिवसांच्या रामकथाही ऐकल्या. असं रामायण विविध बाजूने माझ्यापर्यंत पोहोचत होतं. मधल्या काळात सीता अबला, अगतिक असा आपला समाज झाला होता. पण, तरी त्या काळातील स्त्रीचित्राला छेद देणार्या गार्गी मैत्रेयी दिसल्या. रणांगणावर जाणारी कैकयी, वनवासाला जाणारी रामप्रिया, हा निर्णय सीतेचा होता. तिला जे प्रशिक्षण दिले होते - नैतिकता, राजकीय, संस्कृती, धर्म या सर्वांतून ती भूमिका आणि त्यायोगे निर्णय घेऊ शकते. ब्रह्मवादिनी गार्गी तर सीतेच्या गुरू होत्या. त्यात उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, असे म्हटले जाते. रामाचे सुरुवातीचे विशेष उत्तरकांडात नाहीत. ते नंतर जोडले असावे. याचाही उल्लेख कादंबरीत केला आहे. सीता स्वतःचा निर्णय केवळ रामालाच सांगत नाही, तर कैकेयीला सांगते. कैकेयीला समजून घेणारी ही सीता आहे. या कादंबरीत ’नियती की कर्म’ हा सीतेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ माझा नाही, तर माता अहिल्या, कैकेयी यांचासुद्धा आहे. त्यांचा उलगडा करणारी ही सीता!"