ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संकट

    03-May-2024
Total Views |

AUS Mall attack



ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संकटगेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील एका शॉपिंग सेंटरमध्ये जोएल कोची याने चाकूहल्ला करत सहा महिलांचा खून केला. यावर त्याच्या वडिलांचे म्हणणे होते की, त्याने हे भयानक कृत्य केले. पण, तो दु:खी होता. त्याला एकही ‘गर्लफ्रेंड’ नव्हती, म्हणून त्याने महिलांवरच हल्ला केला असावा. त्याच ऑस्टे्रलियामध्ये आता महिलांवर होणारे हिंसाचार ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
 
गेले काही वर्षं ऑस्टे्रलियामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. दर तीनपैकी एका महिलेला शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर दर पाच पैकी दोन महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत. दर चार दिवसांनी एका महिलेचा हिंसाचारामध्ये मृत्यू होतो आहे. ऑस्ट्रेलियाच्या समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की ”देशातल्या २३ टक्के युवकांना लिंगद्वेषात्मक किंवा लैंगिक शोषणाचा अंतर्भाव असलेले शब्द वापरणे चुकीचे वाटत नाही. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये किशोरवयीन मुले १४-१४ तास ऑनलाईन असतात. ७५ टक्के मुलांनी वयाच्या १२व्या वर्षी आधी पॉर्न वेबसाईट पाहिलेली असते. त्यातूनच त्यांच्या मनात लैंगिकतेविषयी अवास्तव गैरसमज वाढत जातात. मुली-महिलांना उपभोग्य वस्तू समजणे, ही विकृत वृत्ती वाढत जाते. त्यामुळेच पाचपैकी एक ऑस्ट्रेलियन पुरुष एखाद्या महिलेच्या संमतीशिवाय तिचे ‘इंटीमेट फोटो’ ऑनलाईन शेअर करणे पसंत करतो.
 
याच समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, नकार देणे किंवा आपल्याला सोडून दुसर्‍या पुरूषासोबत लग्न करणे किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणे, या गोष्टी ऑस्ट्रेलियातील अनेक पुरूषांना सहन होत नाहीत. त्यामुळे भूतकाळातील प्रेमी किंवा पती यांच्याकडूनच महिलेची हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२३ साली ६४ महिलांची, तर २०२४ साली जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत २८ महिलांची याच कारणामुळे हत्या झाली होती. याच वर्षी मॉली टाइसहर्स्ट या २८ वर्षांच्या महिलेचा झालेला खूनही याबाबत बरेच काही सांगून जातो. तिचा पूर्व पती डॅनियल बिलिंग्सने तिचा पाठलाग केला, तिच्या घराची तोडफोड केली आणि तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकले. इतकेच नाही तर तिच्या तीन महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लालाही त्याने जबर मारहाण केली. मात्र, तो आता जामिनावर बाहेर आहे. या घटनेच्या चार महिन्यांआधी ६५ वर्षांच्या एका महिलेचा खून तिच्याच मुलाने केला. म्हणजेच काय तर, एक ना अनेक महिलांवर होणारे अत्याचार थांबण्याची चिन्हे नाहीत.
 
त्यामुळे काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ॅन्थोनी अल्बानीजसुद्धा होते. ते म्हणाले की, “लिंगभेदामुळे होणार्‍याा हिंसा थांबवण्यासाठी आम्हाला ही मानसिकता आणि न्यायव्यवस्था बदलण्याची गरज आहे. महिलांवर होणारे अत्याचार हे राष्ट्रीय संकट आहे.” महिलांसोबत होणारी हिंसा कशी थांबवावी, या विषयावर अल्बानीज मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेणार आहेत. त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत, म्हणून विशेष निधीही जाहीर केला आहे. याआधीही घरगुती हिंसेला बळी पडणार्‍या नोकरदार व्यक्तीसाठी दहा दिवसांची पूर्ण वेतन रजा तसेच त्या व्यक्तीला आर्थिक मदत देण्याचा कायदाही सरकारने केला होता. परदेशातील व्यक्तींवर घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल असेल, तर त्याला ऑस्टे्रलियात प्रवेशासही सरकारने बंदी घातलेली आहे.
 
एकंदर काय, तर ऑस्ट्रेलियन सरकार महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील आहे. त्यासाठी पंतप्रधान अँन्थोनी अल्बानीज हे पुढाकार घेताना दिसतात. अल्बानीज यांनी घरगुती हिंसा पाहिलेली आहे. त्यांची आई मेरीने ऐलरी ऑस्ट्रेलियन, तर पिता कार्लो अल्बानीज इटालियन. मात्र, अ‍ॅन्थोेनी यांचा जन्म होताच दोघे विभक्त झाले. पुढे मेरी अल्बानीजसोबत त्यांच्या आईबाबाकडे राहू लागल्या. मात्र, मेरी यांच्या पित्यांचे निधन होताच, त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. आधारासाठी मेरी यांनी दुसरे लग्न केले. मात्र, दहा आठवड्यांतच तेही लग्न तुटले. भयंकर मानसिक, शारीरिक त्रास त्यांना सहन करावा लागला. अ‍ॅन्थोनीच्या शिक्षणासाठी मग त्या सफाई कर्मचारी म्हणून काम करू लागल्या. या सगळ्यात आईचे शोषण, मानसिक पिडा अ‍ॅन्थोनी यांनी अगदी जवळून पाहिली. या पार्श्वभूमीवर वाटते की, ऑस्ट्रेलियामध्येच महिलांवर अत्याचार होतात का? तर नाही, जगभरात हे थोड्याफार फरकाने सर्वत्र होते. आधुनिक युगात तर तिच्या शोषणाचे प्रकारही बदलले. त्यामुळे महिलांसोबत होणारी हिंसा हे जागतिक संकटच!