डोळ्यांना न दिसणारं जग दाखवणारं कवितेचं पुस्तक

    03-May-2024   
Total Views |
 
cctv
 
सीसीटीव्हींच्या गर्द छायेत. खरंतर या पुस्तकाबद्दल कैकदा ऐकलेले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून सोशल मीडियावर बरेच चर्वित चर्वण झालेले हे पुस्तक. गाजलेलेच. या पुस्तकाचे वेगळेपण असे, एका तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संवेदनशील मुलाने लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या या कविता आहेत. एखाद्या कलाकृतीबद्दल किंवा साहित्यकृतीबद्दल जेव्ह मोठ्या प्रमाणावर समाजात चर्चा होते तेव्हा त्या मजकुरात नक्कीच साहित्य मूल्य असतात. आजच्या काळातील कवीच्या कविता वाचून उबग आलेल्या रसिक वाचकांसारखेच मीही थोडे दुर्लक्षच केले. पण हे केवळ पुस्तक नाही. ही घुसळण आहे. भावनांची, विचारांची आणि त्यातून मंथनाने बाहेर पडल्यासारखे अर्थगर्भ शब्द कवितेच्या प्रत्येक ओळीओळीत पेरलेले आहेत.
 
पुस्तकाबद्दल सांगण्यापूर्वी नेमाप्रमाणे अर्पणपत्रिकेबद्दल लिहिणे अपरिहार्य आहे. पुस्तकाचे नाव आणि अर्पणपत्रिका थोडीथोडकी नाही तर संपूर्णपणे एकमेकास विसंगत वाटू शकते. सीसीटीव्हीच्या गर्द छायेत नावाचा कवितासंग्रह कवीने नजरेस पडूनही कुठलीच दखल न घेतल्या गेलेल्या कष्टकऱ्यांना, वंचितांना अर्पण केला आहे! मात्र सीसीटीव्हीसारखी नजर कवीला मात्र लाभली आहे, हे त्याच प्रत्येक कविता वाचताना जाणवते. त्याच्या नजरेने हे कष्टकरी, वंचित टिपले आहेत. तसे ते इतरही अनेकांनी पहिले आहेत मात्र त्यांची दखल घेतली गेली नाहीये. आजच्या जगात हेच मोठ्या प्रमाणावर होतंय हे कवीला बिनचूक कळलंय. अर्पणपत्रिका हा पुस्तकाचा एक भाग झाला, परंतु लेखक मात्र पुस्तकाच्या पाना पानातून डोकावत असतो, तेव्हा त्याच्याविषयी थोडक्यात मत मांडणे गरजेचं वाटते. नव्या शतकाला प्रारंभ होण्यापूर्वी अखेरच्या काळात जन्मलेली एक संपूर्ण पिढी एका दुहीत सापडल्यासारखी झालीये. म्हणजे तशी प्रत्येक पिढी नव्या काळाला बांधील असते. मागे सरलेलं सोडून देऊन चालू काळाला स्वीकारण्याची आणि काही प्रमाणात का होईना जुन्या पिढीशी जुळवून घ्यायची शक्ती त्यांच्या ठायी असते. पण साधारण ९० च्या दशकातली पिढी मात्र डिजिटल क्रांतीपूर्वीचं आणि त्यानंतरचं जग यात इतकी गुरफटून गेलीये की, अगदी काही वर्षांपूर्वीचा काही त्यांना स्वप्नवत आणि हवाहवासा वाटतो, त्याचवेळी वर्तमानाशी जुळलेली नाळ मात्र त्याला तोडवत नाही. तंत्रज्ञानातील क्रांतीचे आजच्या मानवावर अनेक भलेबुरे परिणाम झाले आहेत. अगदीच काय, आहारापासून जीवनप्रणाली आणि प्रेरणास्थनांवर मोठ्या प्रमाणावर बदल झालेत. तेव्हा हे हरवलेलं जग, गोष्टींतून, पुस्तकांतून कवीने पाहिलंय आणि त्याला ते खुणावतंय. पण हा तरुण प्रचंड आशावादी मात्र आहे. पुस्तकाला सुरुवात करण्यापूर्वी तो रुमीचे वाक्य आवर्जून लिहितो. i know, you are tired but come, this is the way. त्याचा हा आशावाद, त्याचे वैफल्य आणि पुन्हा भावनाप्रधान दूरदृष्टी मुखपृष्ठावर उत्तम उरलीय. पुस्तकाचा सारा सारच हे मुखपृष्ठ शब्दांशिवाय कथन करतं. त्याच्या कवितांकडे येण्यापूर्वी अगदी थोडक्यात त्याचे मनोगत जणूं घ्यावे म्हणून. तो म्हणतो, त्याच्या पहिल्या कवितासंग्रहानंतर जगात फार काही घडून गेले. कोरोनाच्या काळानंतर तर जग दोन खंडात विभागले गेले. मध्ये अनेक सामाजिक, राजकीय उलथापालथी झाल्या, काही प्रसंग कवीच्या वैयक्तिक आयुष्यात घडून गेले, अनेक देशाची अर्थव्यवस्था विस्कटली, थोडक्यात सामाजिक घडी विस्कळीत झाली. याकाळात धर्मांधता, मानवी नातेसंबंध, मुल्क्यांची पडझड, या सर्वांचा विचार करणे गरजेचे वाटते.
 
त्याच्या नोटिफिकेशन या कवितेत माणसाचा मृत्यू झाला तरीही त्याच्या वाढदिवसाचे नोटिफिकेशन येत राहते, त्याच्या मृत्यूची नोंद घेतली गेली तरी फिकीर केली जात नाही, असं म्हणताना त्याच्या मनातली कालवाकालव किती सहज शब्दात उतरली आहे. नवरा वारल्यावर त्याच्या वस्तूंचे काय करावे याचा विचार करताना त्याच्या वस्तूंभोवती गुंतलेल्या भावना कवीने व्यवस्थित मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे आईच्या मृत्यूचा शोध घेणारी मुलगी, वडिलांना उत्तर देऊ पाहणारा मुलगा आणि बरंच काही. अभंगाच्या स्वरूपातही काही कविता आहेत. या कवितांना रचनांचे, विषयांचे बंधन नाही पण त्या सगळ्याच्या सगळ्या अर्थगर्भित आहेत. हे मात्र विचारात घ्याल हवे. कुतूहल, झाकोळला तळ्यातून, टाहो फोडू दे अशा अनेक कविता यात आहेत, हुरहुर लावणाऱ्या, पुढे वाचावेसे वाटणाऱ्या, कविता आहेत. आजच्या तरुण पिढीचे भाविषव समजून घेण्यासाठी तसेच त्यांच्यादृष्टीकोनातून सीसीटीव्हीच्या निगराणीतील हे जग एकदा पाहण्यासाठी वाचावेच असे हे कवितांचे पुस्तक.
 
पुस्तकाचे नाव - सीसीटीव्हींच्या गर्द छायेत
कवी - गीतेश गजानन शिंदे
प्रकाशन - शब्दलाय प्रकाशन
पृष्ठ संख्या - १२८
मूल्य - २५०

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.