काँग्रेसमध्ये धुसफुस? वर्षा गायकवाडांच्या रॅलीत बड्या नेत्यांची दांडी

    30-Apr-2024
Total Views |
 
Varsha Gaikwad
 
मुंबई : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले. मात्र, त्यांच्या रॅलीमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दांडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
 
वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावरून नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. यासंदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली होती. त्यानंतर त्यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. परंतू, त्यांच्या उमेदवारीवर अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  उत्तर मुंबई लोकसभेसाठी पीयूष गोयल यांनी भरला उमेदवारी अर्ज!
 
यासंबंधी काही काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बैठकही घेतली होती. वर्षा गायकवाड यांच्याऐवजी दुसऱ्या कुणालातरी उमेदवारी द्यावी, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान, आता वर्षा गायकवाडांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
मात्र, यावेळी काढण्यात आलेल्या वर्षा गायकवाडांच्या रॅलीत काँग्रेसचे अनेक बडे नेते अनुपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. नसीम खान आणि भाई जगताप या नेत्यांनी गायकवाडांच्या रॅलीला दांडी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु असल्याचे बोलले जात आहे.