चरैवेती चरैवेती...

    30-Apr-2024   
Total Views |
scfd 
 
वैयक्तिक दुखाःने कोलमडून गेले तरीसुद्धा त्या कठीण समयीसुद्धा समाजाच्या कल्याणासाठीचे व्रत अंगीकारणारे मुंबईचे शेखर पारखी. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
शेखर पारखी यांनी ऑटो-रेंटलचा व्यवसाय एका गाडीवर सुरू केला होता. त्या व्यवसायामध्ये भरभराट होत त्यांच्याकडे ३६ वाहनं आली. आर्थिक सुबत्ता होती. काही कमी नव्हते. ते आणि त्यांचे भाऊ असे दोघे मिळून व्यवसाय सांभाळत. शेखर यांची पत्नी ज्योती गृहलक्ष्मीच. दोघांना एक मुलगा अंकुर. एकलुता एक मुलगा अर्थात लाडाकोडाचा आणि त्याच्यासाठी खूप स्वप्नही पाहिलेली. या काळातही पारखी कुटुंबाने समाजभान जपलेले. सगळं चित्रासारखं सुंदर आयुष्य. नंतर शेखर यांचे बाबा जगन्नाथ यांचे निधन झाले. पितृछत्र हरपले. काही काळातच शेखर यांच्या काळजाचा तुकडा असलेल्या अंकुरचे निधन झाले. जगातल्या कोणत्याही आईबापावर हा प्रसंग ओढवू नये. शेखर आणि ज्योती कोलमडून गेले. सहा महिने होत नाहीत, तर शेखर यांचा भाऊ विवेक याचाही मृत्यू झाला. तीनही मृत्यूने शेखर यांना अंतर्बाह्य बदलले.
 
२०१६ साली शेखर पारखी यांनी निर्णय घेतला की आता अर्थार्जन बंद करायचे. जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत सामाजिक कार्य करायचे. समाजासाठी देहप्राण झिजवायचा. नुसता निर्णय न घेता, त्यांनी खरोखरच त्यांचा अतिशय सुस्थितीत चालणारा व्यवसाय तत्काळ बंद केला. व्यवसायातून जो नफा झाला होता, ज्या ठेवी होत्या, त्यावरच गुजराण करायची, असे जगणे सुरू केले. २०१६ साली घेतलेला निर्णय ते आजही तितक्याच व्रतस्थपणे जगत आहेत. ‘समाजासाठी जगणार’ हा विचार त्यांच्या आयुष्याची प्रेरणा झाली. ते सर्वार्थाने सामाजिक कार्य करू लागले. आज शेखर पारखी हे ‘अस्मिता शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थे’चे अध्यक्ष असून श्री बालगोविंद मंदिर सहकार्यवाह, क्रांतीनगर गणेश उद्यानमंदिरचे विश्वस्त आहेत.
 
पारखी कुटुंब मुळचे पुणे येथील भोर संस्थानचे. जगन्नाथ पारखी पोटापाण्यासाठी मुंबईत आले. त्यांची पत्नी उषा अत्यंत संस्कारशील-धर्मशिल गृहिणी. त्यांचे सुपुत्र शेखर. सगळ्यांच्या सुखदुखात सहभागी व्हायलाच पाहिजे, दुसर्‍यांचे दु:ख जाणून घेऊन, दु:खी व्यक्तीला शक्य होईल, तितकी मदत केलीच पाहिजे, अशी शिकवण पारखी दाम्पत्य त्यांच्या मुलांना देत असत. अशा संस्कारांत शेखर वाढले. लहानपणीच शेखर रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. तेव्हा त्यांना मोहन अय्यर हे संघशिक्षक होते. संघाचे देश-धर्म-समाजशील विचार शेखर यांच्या मनात कायम रूजले.
 
लहानपणापासून शेखर यांनी ठरवले की, नोकरी करायची नाही. दहावीनंतर त्यांनी कुठे उदबत्ताया विक, कुठे स्टेशनरी विक, कुठे वाणसामान विकण्याची कामे सुरू केली. त्यातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला. पण, भांडवलाअभावी या व्यवसायामध्ये अनेक अडचणी आल्या. तो काळ संघर्षाचा होता. पण, शेखर कधी निराश झाले नाहीत. प्रचंड कष्टाने त्यांनी व्यवसायात यश मिळवलेच. मात्र, संगणक युगात हा व्यवसाय अडचणीत आला. तेव्हा त्यांनी वाहन भाड्यावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे पितापुत्र आणि भावाचा मृत्यू झाल्यानंतर व्यवसाय बंद केला. त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले.
 
संस्कारशील समाज संवर्धित असणे, ही काळाची गरज आहे, असे शेखर यांना वाटे. त्यामुळेच वस्तीपातळीवरील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी ते काम करू लागले. ते ज्या शाळांमध्ये पदाधिकारी आहेत, त्या सर्वच शाळांमधील हजारो मुलांचे शेखर जणू पालक आहेत. या मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ते स्वदेशीचा जागर करतात. संस्कार-स्वधर्माचा जागर करतात. मुलांमध्ये देव-देश-धर्माप्रती जाणीव-निष्ठा उत्पन्न व्हावी, या तळमळीतून ते अनेक उपक्रम राबवतात. समाजात कुटुंबव्यवस्था टिकावी, भारतीय संस्कृतीचे हे देणे संवर्धित व्हावे, यासाठीही शेखर कायम प्रयत्नशील असतात. ‘आमचे पटत नाही’ म्हणत विभक्त होऊ पाहणार्‍या शेकडो दाम्पत्यांमध्ये शेखर यांनी समन्वय घडवून आणला. या दाम्पत्यांचा संसार पुन्हा खर्‍या अर्थाने सुरू व्हावा, यासाठी शेखर पालकाच्या मायेने काम करतात. आजकाल समाजात भौतिक चंगळवाद वाढला आहे.
 
अगदी घरोघरी लोक गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संचय करतात. त्या वस्तू कधीकधी नुसत्या पडून असतात. शेखर अशा कुटुंबांना, लोकांना भेटतात. अधिकच्या वस्तू किंवा ज्यांचा ते उपयोगच करत नाहीत, अशा वस्तू ते या लोकांकडून घेतात. या वस्तू संबंधित गरजूंना वितरीत करतात. गेली अनेक वर्षे ते हे उपक्रम राबवित आहेत. संकल्पना तशी छोटीशी. पण, या संकल्पनेतून अनेक गरजूंना पाठबळ मिळाले आहे. २०२० साली कोरोनाची महामारी आली. त्यावेळी ‘लॉकडाऊन’ सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण ‘लॉकडाऊन’ संपण्यापर्यंतच्या दोन वर्षांच्या काळात शेखर कोरोनाने त्रस्त झालेल्या समाजासाठी काम करत होते. ते दररोज सकाळी ९ वाजता घराबाहेर पडत ते रात्री १० वाजता घरी येत. कोरोनग्रस्त रूग्णाला इस्पितळात नेणे, गरजूंना अन्नवितरण करणे असू दे, की कोरोनाने भयभित झालेल्या लोकांना धीर देणे असू दे, शेखर हे काम करत राहिले. शेखर म्हणतात ”रा. स्व. संघाच्या प्रेरणादायी परिसाने हेच शिकवले की, ‘चरैवेती चरैवेती.’ म्हणूनच काहीही घडले तरी सामाजिक कार्याचा घेतलेला वसा टाकणार नाही.” शेखर यांचे विचार आणि ते करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे.
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.