"मोठे नेते कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी फक्त २०० रुपये होता!"

पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांचे नाव घेता टीका

    30-Apr-2024
Total Views |

Sharad Pawar 
 
सोलापूर : देशात मोठे नेते कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी २०० रुपये होता, परंतू, आज तो ३४० रुपये प्रतिक्विंटल आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे. मंगळवारी माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "महाराष्ट्राची जनता भरभरून आशीर्वाद देते. परंतू, जर कुणी आपलं वचन पूर्ण करत नसेल तर ही जनता त्यांनासुद्धा आठवणीत ठेवते.१५ वर्षांपूर्वी एक मोठे नेते याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मावळत्या सुर्याची शपथ घेऊन सांगितलं होतं की, आम्ही दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवू. परंतू त्यांनी तिथे पाणी पोहोचवलं का? त्यामुळे आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. आज ते इथून निवडणूक लढवण्याची हिंमत करु शकले नाहीत."
 
हे वाचलंत का? -  मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उबाठा थेट लढत! रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर
 
"१० वर्षे ज्यावेळी रिमोट कंट्रोलचे सरकार होते त्यावेळी इथले मोठे नेते देशाचे कृषीमंत्री होते. जेव्हा ते दिल्लीत बसून राज्य करायचे तेव्हा उसाचा एफआरपी जवळपास २०० रुपये होता. पण आज मोदीच्या सेवाकाळात ऊसाचा एफआरपी ३४० रुपये प्रतिक्विंटल आहे," असे म्हणत त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली.
 
"विदर्भ आणि मराठवाड्याला एक एक थेंब पाण्यासाठी तरसवण्याचं पाप वर्षानुवर्षे होत राहिलं. काँग्रेसला ६० वर्षे देशाने काम करण्याची संधी दिली. या ६० वर्षात जगातील अनेक देश पूर्णपणे बदलून गेलेत. परंतू, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीसुद्धा पोहोचवू शकली नाही," असा घणाघातही त्यांनी काँग्रेसवर केला.
 
ते पुढे म्हणाले की, "आज अयोध्येत ५०० वर्षांनंतर भव्य राममंदिर तयार झाले. राम मंदिर बनल्याने सर्वजन आनंदी आहेत. वास्तविक देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्याच दिवशी राम मंदिर बनायला हवं होतं. परंतू, त्यांना केवळ त्यांच्या मतपेढीची काळजी होती. त्यावेळी काँग्रेसकडे संधी होती. पण त्यांनी केवळ यात अडथळे निर्माण केले," असेही ते म्हणाले.