“कदाचित मी राज कपूर असतो आणि लता दीदी निर्मात्या असत्या...”, - महेश कोठारे

    30-Apr-2024
Total Views |

Lata Mangeshkar 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गाणं न ऐकलेला एकही श्रोता मिळणार नाही. लहानपणापासून कानांवर पडलेले पहिले सुर नक्कीच बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि लता दीदींचे (Lata Mangeshkar) असतील यात तिळमात्र शंका नाही. पण लता दीदींची एक नवी ओळख जगासमोर आली असती याचा खुलासा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून याही चित्रपटात कोणती नवी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 
महेश कोठारे आठवण सांगताना म्हणाले की, “लता दीदींची एक इच्छा होती माझ्यासोबत चित्रपट करायची. त्यांना मुळात तो चित्रपट निर्मिती करायचा होता.अंदाज या हिंदी चित्रपटाचा मराठी रिमेक करण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती. त्यात राज कपूरच्या भूमिकेत मी आणि दिलीप कुमारच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर असावेत आणि मी तो चित्रपट दिग्दर्शित करावा असं त्यांच्या डोक्यात होतं. पण दुर्दैवाने मी पुन्हा कधी त्यांना विचारलं नाही आणि ती मोठी कलाकृती बनवायची राहून गेली. नाहीत आज लता दीदींची ओळख एक निर्माती म्हणूनही असती”.
 
पुढे महेश कोठारे म्हणाले की, “भारतरत्न लता मंगेशकर आणि माझं एक वेगळं नातं आहे. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर. याचा एक खास किस्सा आहे. तो असा की, लता दीदी आणि माझी थेट ओळख नव्हती. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींना मी एकदा सांगितलं की मला माझ्या वाढदिवशी लता दीदींसोबत बोलायचं आहे. त्यांनी मला एक फोन नंबर दिला आणि सांगितलं की यावर फोन कर थेट त्याच फोन उचलतील. त्याप्रमाणे मी फोन केला आणि लता दीदी माझ्याच फोनची वाट पाहात होत्या. त्यांनी फोन उचलताच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या”.
 
दरम्यान, लता मंगेशकर यांनी महेश कोठारे यांच्या बाल वयातील तीन गाण्यांना आवाज दिला होता. त्यातील एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘तु कितनी अच्छी है.. ओ मॉं’ हे निरुपा रॉय आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रित झालेल्या राजा और रंक मधील गाणं लता मंगेशकर यांनी गायले होते.