दादासाहेब फाळकेंनी भारतातील पहिला चित्रपट १५ हजारांत १९१३ साली बनवला; कसा? जाणून घ्या...

    30-Apr-2024
Total Views |

dadasaheb phalke   
 
 
मुंबई : भारताला चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम देऊ करणाऱ्या चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती. दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी १९१३ साली भारत देशाला पहिला कृष्णधवल मुकपट ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपट दिला. त्यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत ९० पेक्षा अधिक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले. आज दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जयंतीदिनी जाणून घेऊयात त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट कसा तयार केला होता.
 
दादासाहेब फाळके यांचे खरे नाव 'धुंडीराज गोविंद फाळके' होते. ३० एप्रिल १८७० रोजी त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला. कलेची आवड उपजत असल्यामुळे त्यांनी याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. १९८५ मध्ये त्यांनी जे.जे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. कला महाविद्यालयानंतर त्यांनी पुढील शिक्षण वडोदरा येथील कलाभवन येथे पूर्ण केले आणि त्यानंतर १८९० मध्ये दादासाहेब वडोदरात छायाचित्रकार म्हणून काम पाहू लागले.
 
पुढे दादासाहेबांनी छापखाना सुरू केला. आणि दुसरीकडे कलेचे अधिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी परदेशाची स्वारी केली. जर्मनीहून त्यांनी अद्यायावत तांत्रिक शिक्षण घेत भारतात पहिला चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट तयार करण्यासाठी लागणारं भांडवलं उभं करताना त्यांनी अपार कष्ट सोसले. त्यांनी चित्रपट निर्मितीची मुळाक्षरं लंडनमध्ये गिरवली. अगदी पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्यांनी पैसे जमा करत १५ हजारांमध्ये १९१३ साली राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार झाला. या चित्रपटात दादासाहेब स्वतः राजा हरिश्चंद्राच्या भूमिकेत तर मुलगा हरिश्चंद्राच्या मुलाच्या भूमिकेत होता. आणि स्त्री कलाकार न मिळाल्यामुळे एका पुरुषानेच स्त्री पात्र साकारले होते. हा चित्रपट त्या काळात २३ दिवस चित्रपटगृहात सुरु होता.