"महाराष्ट्र बंद नसता तर मी कधीच... ", आमिर खानचा मोठा खुलासा

    30-Apr-2024
Total Views |

amir khan 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) त्यांच्या विविधांगी कलाकृतींमळे कायम चर्चेत असतो. काही दिवसांपुर्वीच त्याने निर्मिती केलेल्या लापता लेडिज चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. अलीकडेच आमिरने नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान त्याने भूतकालातील अनेक किस्से सांगितले. त्यावेळी कॉलेजचा विद्यार्थी ते एक सुपरस्टार प्रवास कसा घडला त्याबद्दलही तो व्यक्त झाला.
 
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “मी चुकून अभिनेता झालो आहे. कारण- मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो तेव्हा एक नाटकाचा ग्रुप होता आणि मला नाटकात काम करण्याची आवड होती. महेंद्र जोशी नावाचे एक दिग्दर्शक होते आणि त्यांच्यासोबत मला काम करायची खूप इच्छा होती. कॉलेजच्या एका नाटकासाठी मी ऑडिशन दिली पण यशस्वी झालो नाही आणि त्यावेळी ती संधी हुकली. त्यावर मी कधीच हार मानली नाही.”
 
पुढे आमिर म्हणाला, “कॉलेजच्या नोटीस बोर्डवर गुजराती नाटकाची तालीम सुरू होणार आहे असं लिहिलं होतं. मी ते वाचलं आणि नाटकासाठी अर्ज केला. अडचण अशी होती की मला गुजराती, मराठी भाषा येत नव्हती; पण नशीबाने गुजराती नाटकात कोरसमध्ये मला संधी मिळाली. त्या संपूर्ण नाटकात मला एक ओळ दिली होती. पूर्ण नाटकात आणि कोरसमध्ये एकच असा माणूस होता; ज्याच्या तोंडी एकच ओळ होती आणि ती ओळ म्हणजे एक शिवी होती. मी ती एक ओळ तीन महिने सराव करून पाठ केली होती; पण ‘महाराष्ट्र बंद’ असल्यामुळे मला तालमीला जाता आलं नाही. कारण- त्या दिवशी आईनं बाहेर जायला मनाई केली होती.
 
“दुसऱ्या दिवशी दिग्दर्शकांनी तालमीला का नाही आलो याबद्दल विचारलं. तर मी सांगितलं ‘महाराष्ट्र बंद’ होता म्हणून आईनं पाठवलं नाही. बाकीचे तर आलेले; तू नाही आलास, असं म्हणत त्यांनी मला नाटकातून काढून टाकलं. नाटकाची तालीम सुरू झाली होती आणि समोर बसून मी रडत होतो. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. इतक्यात तिकडून निरंजन थाडे आणि इंद्रजित सिंग बन्सल ही दोन माणसं आली, त्यातील निरंजन माझा मित्र होता. तेव्हा निरंजन मला म्हणाला की, इंद्रजित पुणे इन्स्टिट्यूटमध्ये एक डिप्लोमा फिल्म बनवतोय त्याला अभिनेत्याची गरज आहे. तुला थोडा वेळ आहे का? मी त्याला म्हटलं की, मी आताच मोकळा झालो. तो म्हणाला की, आजच्या आज तुला पुणे इन्स्टिट्यूटला जायचं आहे.”
 
“मी घरी गेलो आणि आईला सांगितलं की, काही कामासाठी मला पुण्याला जायचं आहे. माझं काम झालं आणि ते काम एका एडिटिंगच्या विद्यार्थ्यानं पाहिलं. त्याचं नाव होतं राजीव सिंग. त्यानंतर राजीव सिंगनं मला चित्रपट ऑफर केला आणि तो मी केला. त्यानंतर केतन मेहता यांनी मला ‘होळी’मध्ये कास्ट केलं आणि होळी चित्रपट पाहिल्यानंतर मन्सूर आणि नासिर साहेबांनी माझ्यासोबत चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. म्हणून मी म्हणतो की जर का त्या दिवशी जर ‘महाराष्ट्र बंद’ नसता, तर माहीत नाही की, मी स्टार झालो असतो की नाही”, असा मोठा गौप्यस्फोट आमिर खान याने केला.