थोरले बाजीराव : एका शूर वीराची भावकथा

    29-Apr-2024
Total Views |

bajirav peshve 
 
थोरले बाजीराव पेशवे म्हणजे छत्रपतींच्या नंतर महाराष्ट्राची शान जपणारं एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व. त्यांचे आयुष्य सगळ्या रोमहर्षक प्रसंगांनी सदा बहरलेलं. युद्ध, रणनीती, राजनीती आणि प्रेम या सर्वच कसोट्यांवर अव्वल ठरावे असे हे पेशवे. विश्वनाथानंतर वारसा परंपरेने आलेले आणि मराठा राज्यासोबत उत्तम माणसांचा संचय करणारे हे दौलतीचे लाडके पेशवे. राजपूत, जाट, बुंदेले, मुसलमान, रोहिले अशा नाना पंथाच्या लोकांशी ज्यांचा संबंध आला ते पेशवे. त्यांचं आयुष्य म्हणजे मराठा साम्राज्याला पडलेलं एक गोड स्वप्न. त्या स्वप्नाचा परिघही मोठा होता आणि तेवढीच तेजस्वी त्यांच्या घोडीची दौड. परंतु काही पारंपरिक समजुतींमुळे या बाजीरावाला गृहकलहांचा सामना करावा लागला. नाहीतर हिंदुस्थानावर हुकूमत गाजवण्याची त्यांची श्रेष्ठता होती, परिस्थितीने ते अपरिहार्य होते. ही त्यांची द्विधा त्यांच्या कुटुंबियांना कधी कळलीच नाही. विचार करा, ज्या काळात अनेक अंगवस्त्र, अनेक रखेल्या आणि नाटकशाळा ठेवण्याचा प्रघात होता त्या काळात केवळ मस्तानीच्या हृदयाशी समर्पित असलेले राऊ म्हणजे काळाने आपल्यासोबत गडप केलेलं महाराष्ट्रीयांचं आशास्थान. इतिहासाने त्यांची नोंद शूर, सामर्थ्यवान पण मस्तानीच्या पायातली बेडी होऊन पडलेला वीर अशी केलीय ही आपली शोकांतिकाच. थोरले बाजीराव पेशवे ही केवळ शूरकथा नाही तर ती एक अत्यंत उत्कट अशी भावकथा आहे. बाजीरावांच आणि चिमाजी आप्पाचं सौख्य सर्वानाच माहित. दौलतीची सेवा करण्यात कुणीही कसूर केली नाही. अप्पांनी फडावर स्वतःला गुंतवून घेतलं तर बाजीरावांनी अप्पांना कधी तोशीस पडू नये याची काळजी घेतली. या बाजीरावांनी बुद्धी चातुर्याने लाभेल्या लढायांचा तपशील आज सांगतेय.
 
नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्ये सरदार निर्माण केले. हा गुण आपल्या शिवबाशी तंतोतंत जुळतो बघा. त्यांची दौड, त्यांचा हेतू आणि सावधगिरी यावरून भविष्याचा वेध घेऊ पाहणारे हे पेशवे म्हणून त्यांची गणना व्हायची.
 
आपल्या उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तब्बल ४७ लढाया केल्या. आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. बाजीला हार माहितीच नाही. कुटुंबासमोर जी काही हार त्यांनी पहिली त्याव्यतिरिक्त रणभूमी त्यांच्यासाठी नेहमीच यशवंत राहली. डिसेंबर,१७२३ माळवा त्यानंतर पुढल्याच वर्षी धार, त्याच साली औरंगाबाद ४ वर्षांनी पालखेड , पालखेड फेब्रुवारी, १७२८ मध्ये, साधारण १७३१ च्या आसपास अहमदाबाद. ३६ साली उदयपूर पुढल्याच वर्षी फिरोजाबाद. अशी विजयी पताका सतत फडफडत होती. बाजीरावांची दिल्ली स्वारी जी सुप्रसिद्ध आहे तीही याच वर्षीची. असे म्हणतात, बादशहाच्या स्त्रियांनी या वीराला पाहण्याची अनुमती आपल्या शोहर्मगितली आणि पेशव्यांना पाहिल्याबरोबर पायली पायली मोती त्यांनी त्यांच्यावर उधळले. पुढे
 
३७ साली पेशावर, कंदहार, काबूल, बलुचिस्तान सर्व एकाच वर्षी. तसेच पुढील वर्षी भोपाळ आणि त्यानंतर मात्र पुण्याच्या शनिवारवाड्यात राऊ आप्पांचे खटके उडू लागले. मस्तानी बायजींना काशीबाईंइतके अधिकार अप्पा काही मिळू देत नव्हते. सतत जाबसाल करीत. तेव्हा कधी नव्हे ते वैतागून चिमणाजिन्ना बाजीराव बोरूबहाद्दर म्हणाले. पुढे वसईची मोहीम चिमाजींनी अगदी पेटून उठून घेतली. १७ मे १७३९ साली वसई विजय मिळवला हा बाजीरावांच्या आयुष्यातला शेवटचा विजय मात्र चिमाजींनी त्यांच्या पायाशी आणून घातला. अशा लहानमोठ्या एकूण ४७ लढाया ते जिंकले. पुढील वर्षी नासीरजंगाविरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासीरजंगने हंडिया व खरगोण हे प्रदेश बाजीराव पेशव्यांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी बाजीराव पेशवे खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी विषमज्वर होऊन त्यांचे निधन झाले. नुकतीच त्यांची पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने या पेशव्याचे स्मरण करावे वाटले.