‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटातून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला - सरसंघचालक

    24-Apr-2024
Total Views |
'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.
 
 
sudhir phadke 
 
मुंबई : संगीत क्षेत्रातील अजरामर नाव म्हणजे बाबूजी अर्थात सुधीर फडके. बाबूजींच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) हा संगीतमय चरित्रपट १ मे २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. बाबुजी गायक, संगीतकार तर होतेच, परंतु ते सच्चे देशभक्तही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य त्यांनी शेवटपर्यंत सुरु ठेवले होते. नुकताच स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी चित्रपटाच्या (Swargandharva Sudhir Phadke) टीमसोबत पाहिला आणि या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.
 
रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत चित्रपटाबद्दल म्हणाले की, “बाबुजी म्हणाले होते, कोणतेही गीत गाताना भावना त्या शब्दांसोबत आल्या पाहिजेत. केवळ सूर असून चालत नाही. तेव्हा त्याचे महत्व आम्हाला फारसे समजले नाही. परंतु हा चित्रपट पाहून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला. त्यांची देशभक्ती, त्यांनी सोसलेले कष्ट पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येतो. ही गाणी ऐकताना पुन्हा त्याच विश्वात गेल्याचा भास होतो. उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड यामुळे हा चित्रपट एका उंचीवर गेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी सुवर्णकाळ उभा केला असून महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना हा नक्कीच आवडेल, असा हा चित्रपट आहे''.
 
दिग्दर्शक योगेश देशपांडे यांना ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या माध्यमातून बाबूजींच्या जीवनातील अनेक पैलु प्रेक्षकांसमोर मांडायचे आहेत. 'बाबुजी' हे व्यक्तिमत्वच इतके महान होते की जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.
  
सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.