“आम्ही कलाकार जेव्हा नवं काम करतो तेव्हा”, ‘छावा’ आणि विकी कौशलबद्दल केली भावूक पोस्ट

    23-Apr-2024
Total Views |
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी भाषिक छावा चित्रपट लवकरच येणार असून याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी घेतली आहे.
 

santosh  
 
मुंबई : अभिनेता विकी कौशल याची प्रमुख भूमिका असणारा ‘छावा’ (Santosh Juvekar With Vicky Kaushal) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक पटात विकी कौशल छत्रपटी संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील झळकणार आहेत. यापैकी एक म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar With Vicky Kaushal). नुकतचं त्याने शुटींग पुर्ण केलं असून चित्रपटाचा अनुभव त्याने सांगितला आहे.
 
संतोष लिहितो, “फायनली माझं शूट संपलं. पण, शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण, उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल, तर काम बहारदार रंगतं आणि मनही कामात रमतं. या क्लिपमधून तुम्हाला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल. पण, मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याची सुद्धा कल्पना येईल.”
 

santosh  
 
सर्वांचे आभार मानत अभिनेता पुढे लिहितो, “आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेव्हा नवीन माणसांची, नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं. आमच्या आयुष्यात आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत.”
“लक्ष्मण उतेकर सर तुम्ही, दिग्दर्शनाची टीम, आपली संपूर्ण @maddockfilms production टीम, आपले DOP सौरभ सर, बबलू सर, फाइट सीक्वेन्स डिरेक्टर परवेज भाई व त्यांची टीम, आपल्याला सर्वांना आनंदाने खाऊपिऊ घालणारे डिपार्टमेंटवाले तुम्हा सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी. विकी कौशल पाजी, आशिष, अंकित, शुभांकर, बालाजी सर, प्रदीप सर तुम्हा सर्वांना खूप प्रेम. आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीला आई भवानीचा , छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशीर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चला भेटूयात लवकरच तोपर्यंत जय भवानी!” अशी पोस्ट संतोषने शेअर केली आहे.
 
दरम्यान, ‘छावा’ हा चित्रपट २०२४ मध्येच प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत असून यात विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा हे देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.