धन्य धन्य आमुचा जन्म। मुखी रामनाम उत्तम॥संत ज्ञानेश्वरांचा ‘परब्रह्म राम’ (उत्तरार्ध)

    20-Apr-2024
Total Views |

dnyaneshwer
 
संत ज्ञानेश्वरांची अभंगगाथा नामभक्तीचा चैतन्यदीप आहे. या अभंग गाथेमध्ये सुमारे 992 अभंग आहेत. विविध विषयांवरील हे अभंग ज्ञानोत्तर भक्तीचे उत्कट दर्शन आहेत. त्यातील नामभक्तीपर अभंगामध्ये ‘राम आणि रामनाम महती’ या विषयावर अनेक अभंग आहेत. ‘मन हे राम जाहले, मी पण हरपले’ असे म्हणत, ज्ञानदेव रामनामाची फलश्रुती कथन करतात. पूर्वपुण्याई असेल, तरच रामराम जिव्हाग्री येते व रामनामाने भक्ताचा जन्म धन्य होतो. हरिपाठ व अभंगातून ज्ञानदेव निर्गुण परब्रह्म रामाची व रामनामाची महती सांगतात आणि, तोच विचार आपणास पुढील सकलसंतांच्या अभंगातून मिळतो.
अभंग गाथेतील ‘राम’
संत ज्ञानदेवांची अभंग रचनाही विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. ‘ज्ञानदेव अभंग गाथा’ नावाने अनेकांनी त्याच्या विविध आवृत्त्या प्रकाशित केलेल्या आहेत. श्रीक्षेत्र आळंदी येथील ‘ज्ञानेश्वर देवस्थान, संस्थान’ने प्रकाशित केलेल्या ‘ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथेत’ ‘अनुभवामृत’, ‘चांगदेव पासष्टी’ यांच्यासह 992 अभंग आहेत. ही गाथा वारकर्‍यांमध्ये सर्वमान्य आहे. या अभंगगाथेत ‘रूपाचे अभंग’, ‘बाळक्रीडा’, ‘नाम संकीर्तन’, ‘पंढरी माहात्म्य’, ‘विठ्ठल प्रसाद’, ‘उपदेश’, ‘गोंधळ’, ‘विरहिण्या’, ‘देवाशी प्रेमाचे भांडण’, ‘निवृत्ती-ज्ञानदेव संवाद’ अशा विविध विषयांवरील अभंग रचना आहेत. या गाथेतील ‘नामसंकीर्तन’, ‘नाममाला’, ‘नामग्रहण’ या विभागात अनेक अभंग रामनाम माहात्म्यपर आहेत.
 
मन हे राम जाले, मन हे राम जाले।
प्रवृत्ति ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले॥ 620
बापरखुमादेवीवरू विठ्ठले मीपण हरपले। (अ.क्र.762)
ज्ञानदेवांच्या या अभंगातील राम हा ‘आत्माराम’ आहे. आध्यात्मिक अंतरंग स्थिती परिवर्तनाचे हे शब्दरूप आहे. एक सुंदर उन्नयन आहे. अर्थात, हे अनायास घडत नाही, त्यासाठी भाव, भक्ती, साधना, गुरुकृपा आणि पुण्याईचे बळी लागते.
 
जन्म जन्मातरी। असेल पुण्य सामुग्री।
तरीच नाम जिव्हाग्री। येईल श्रीरामाचे॥1। (अ. क्र. 98)
आणि असे श्रीरामाचे नाव जिव्हाग्री आले की, मग ते निष्ठाभावाने जप करून जपावे लागते. मग फलप्राप्ती इच्छा न करताही मिळतेच. ज्ञानदेव त्याच अभंगात पुढे म्हणतात-
 धन्य कुळ तयाचे। रामनाम घेती वाचे।
दोष हरतील जन्माचे। श्रीराम म्हणताचि॥2॥
कोटी कुळाचे उद्धरण। मुखी राम नारायण।
राम कृष्ण स्मरण। धन्य जन्म तयाचे॥3॥
 रामनामाचे माहात्म्य सांगताना आणखी एका अभंगात ज्ञानदेव म्हणतात-
रामनाम ही वैकुंठाची वाट आहे. आणि त्या विधानाला थेट भगवद्गीतेचीच साक्ष देतात.
रामनाम वाट हेचि पै वैकुंठ।
ऐसी भगवद्गीता बोलतसे स्पष्ट॥1॥ (अ. क्र.111)
 
देवाधिदेव महादेव म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या संवादातून एखाद्या ग्रंथाचे, तत्त्वाचे, विचाराचे महत्त्व सांगण्याची पूर्वापार प्रथा-परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली दिसते. संत ज्ञानदेवांनीही शिव-पार्वती संवाद रूपात अनेक विषय सांगितले आहेत. अगदी ज्ञानेश्वरीतही गीतेचे महत्त्व पटवून देण्यास ज्ञानदेवांनी शिव-पार्वती संवादाची योजना केलेली आहे. ‘या गीतार्थाची थोरी। स्वये शंभू विवरी। जेथ भवानी प्रश्नु करी। चमत्कारोनी॥70॥ तेथ हरू म्हणे नेणिजे। देवी जैसे कां स्वरूप तुझे। तैसे हे नित्य नूतन देखिजे। गीतातत्त्व॥71॥’ अशी शिव-पार्वती संवादाची योजना ज्ञानदेव रामनामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या अभंगवाणीतूनही करतात-
 
शिव भवानी उपदेशी प्राणप्रिये।
निज मानसी ध्याये परमानंदु पाहे॥1॥
रामु सखा हरि रामु सखा।
रामु सखा हरि रामु सखा॥2॥
या अभंगात ‘रामु सखा हरि’ ही ओळ दोन वेळा आहे. पहिल्या ओळीचा अर्थ राम हा शिवाचा सखा आहे, अशा अर्थी आहे, तर दुसर्‍या ओळीत शिव हा रामाचा सखा आहे, असा भाव आहे. या दोन देवतांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नाही, तर परस्पर प्रेमाचा सख्यभाव आहे. रामनाम हे जीवाचे जीवन, मनाचे मोहन, सुखाचे साधन, भक्तीज्ञानाचे अंजन आहे, असे ज्ञानदेव म्हणतात.
 
राम नामामृत रस पी जिव्हे॥1॥
धन्य धन्य वेदाचा मतितार्थ। राम कृष्ण मुखी नाम॥2॥
राम नाम हा महामंत्र। सर्व बाधा निवारी॥
कोटी तपाचिया राशी। जोडती रामनामा पाशी॥
समाधीचे साधन। ते राम नाम चिंतन।
अशा विविध प्रकारे ज्ञानदेव आपल्या अभंगांतून रामनामाचे महात्म्य सांगून लोकांना नामस्मरण भक्तीकडे वळण्याचा उपदेश करतात. रामनाम हा महामंत्र बीजमंत्र आहे, हे आपण निवृत्तीनाथ यांच्या रामदर्शन लेखनात आधी सविस्तर पाहिले आहे, त्याची इथे पुनरावृत्ती करीत नाही. वरील अभंगचरणात रामनामाला ज्ञानदेव ‘समाधीचे साधन’ म्हणतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
 
हरिपाठातील ‘राम’
ज्ञानेश्वरी, अभंग त्यानंतर वारकर्‍यांमध्ये नित्य उपासनेचा भाग म्हणून ज्ञानदेवांचा ‘हरिपाठ’ विशेष प्रसिद्ध आहे. ज्ञानदेवांचा हा हरिपाठ भक्तीशास्त्रातील सकल सिद्धांताचा अल्पाक्षरब्रह्म असा अक्षरठेवा आहे. वारकर्‍यांच्या दृष्टीने ‘हरिपाठ’ म्हणजे लघुज्ञानेश्वरीच आहे. हभप धुंडामहाराज देगलूरकर म्हणतात- हरिपाठ म्हणजे ‘अल्पाक्षरम संदिग्ध सारवद्विश्वतो मुखम्’ असा अर्थगर्भ आहे. स्वानंद सुखाचा, परम शांतीचा अनुभव देणारे साधन आहे. अशा या हरिपाठांच्या 27 अभंगांतून नामभक्तीचे श्रेष्ठत्त्व-महात्म्य ज्ञानदेवांनी गायलेले आहे. यातील अभंगांमध्ये ज्ञानदेव म्हणतात-
 
सर्वाघटी राम देहादेही एक।
सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी॥3॥ (अ. क्र. 15)
ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा।
येणे दशदिशा आत्माराम॥4॥ (अ. क्र.16)
जप तप कर्म क्रिया नेम धर्म।
सर्वांघटी राम भाव शुद्ध॥1॥
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो।
राम कृष्ण टाहो नित्य फोडी॥2॥
ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी।
तेणे वैकुंठ भुवनी घर केले॥4॥ (अ. क्र.24)
ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद।
वाचेसी सद्गद जपे आधी॥2॥ (अ. क्र.26)
वरील अभंगातील रामनामाचे उल्लेख पाहता, हे निर्गुण आत्मारामाचे आहेत, हे स्पष्ट आहे.
 
अशा प्रकारे संत शिरोमणी ज्ञानदेव माऊलींच्या साहित्यामध्ये आपणास विठ्ठल, कृष्ण या नामाप्रमाणेच रामनामाचे सगुण-निर्गुण दर्शन घडते. ज्ञानदेव-निवृत्तीनाथ यांच्या अभंगांचा व विचारांचा प्रभाव आपणास समकालीन व उत्तरकालीन सकल संतमंडळांच्या अभंगांवर दिसतो. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सेना या संतसांगातींच्या अभंगांमध्ये जे ‘रामदर्शन’ घडते, ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रबोधाचे पाईकत्त्व आहे. राम आणि कृष्णाची नामभक्ती ही सकल संतांची दिवाळी आहे. राम कृष्ण आम्हा सणू नित्य दिवाळी।
॥श्रीराम ॥
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात : संत नामदेव गाथेतील ‘रामकथा माहात्म्य’)