अपंग शाळांमधील शिक्षकांना रखडलेले वेतन मिळणार
महा एमटीबी   07-Jul-2019
 


आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यशठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यासह राज्यातील अपंग शाळांमधील हजारो शिक्षकांना अखेर तीन महिन्यांनंतर रखडलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांनंतर ऑनलाईन वेतन प्रक्रियेतील बिघाड दूर केल्यानंतर शिक्षकांना दिलासा मिळाला.

 

राज्यातील अपंग शाळांमधील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन वेतन प्रक्रियेद्वारे केले जाते. मात्र, त्यात तीन महिन्यांपासून तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांचे वेतन रखडले होते. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबियांचे हाल होत होते. विशेषतः शाळा सुरू होत असताना मुलांचे शैक्षणिक शुल्क व घरांचे हप्ते थकल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती.

 

या संदर्भात काही शिक्षकांनी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांची आमदार डावखरे यांनी भेट घेऊन अपंग शाळांच्या शिक्षकांच्या वेतनप्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करण्याबाबत निवेदन दिले होते. तसेच ऑनलाईन प्रक्रियेतील बिघाड दूर न झाल्यास ऑफलाईन प्रक्रिया राबविण्याचा आग्रह धरला होता.

 

या प्रकरणी मंत्री खाडे यांनी प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना निर्देश दिले होते. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करीत तांत्रिक अडथळे दूर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर ऑनलाईन वेतन प्रक्रियेतील बिघाड दूर करण्यात विभागातील अधिकाऱ्यांना यश आले. त्यामुळे राज्यातील सर्व अपंग शाळेतील कर्मचार्‍यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला. या कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच वेतन जमा होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat