'न्यू इंडिया स्टार्ट अप कॉन्क्लेव’ सोहळा संपन्न
महा एमटीबी   03-Jul-2019नीति आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या अटल इन्होवेशन मिशनच्या अटल इनक्युबेशन सेंटर- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी द्वारा न्यू इंडिया स्टार्ट अप कॉन्क्लेवह्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय कृषि व किसान कल्याण राज्य मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या हस्ते झाले. 

तसेच या परिषदेसाठी अटल इन्होवेशन मिशन-नीति आयोगाचे मिशन डायरेक्टर आर. रमणन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक मिलिंद कांबळे आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहताहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या परिषदेचे आयोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात करण्यात आले होते.

 

परषोत्तम रुपाला यांनी कृषि आधारित स्टार्ट अप्स आणि त्यांचा समाजाला होणारा उपयोग यावर प्रकाश टाकला तर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मुबलक प्रमाणातील अन्न धान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता भारतामध्येच असल्यानेहे अटल इनक्युबेशन सेंटर होतकरू स्टार्ट अप्ससाठी एक महत्वाचं मार्गदर्शन केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला.

 

आर. रमणन यांनी अटल इन्होवेशन मिशनचे कार्य उपस्थितांना समजावून सांगत अटल इनक्युबेशन सेंटरचे महत्व यावेळी अधोरेखित केले आणि प्रबोधिनीचे अश्या प्रकारच्या परिषदेच्या आयोजनासाठी अभिनंदन केले तर मिलिंद कांबळे यांनी स्टार्ट अप्सच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर या सेंटरने मार्गदर्शन करून त्यांना एक दिशा द्यावी असे प्रतिपादन केले. मिरा भाईंदरच्या महापौर श्रीमती डिंपल मेहतांनी देखील स्टार्ट अप्सचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली तर अटल इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उदय वांकावला यांनी उद्घाटन सत्रातील मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधिनीचे कार्यकारी प्रमुख आणि अटल इनक्युबेशन सेंटरचे मुख्य सल्लागार रवी पोखरणा यांनी केले. 

उद्घाटन सत्रानंतर ह्या परिषदेत कनेक्ट, शेअर आणि ग्रोया त्रिसूत्रीवर आधारित, कृषी, माहिती संचार तंत्रज्ञान (शैक्षणिक व आरोग्य) व सामाजिक उपक्रम या क्षेत्रांत सहभागी असणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानयुक्त व रोजगार निर्मिती अश्या गुणांच्या माध्यमातून भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेल्या २१ स्टार्ट अप्सनी आपल्या व्यवसायाचे सादरीकरण विविध क्षेत्रातले तज्ज्ञ, मान्यवर आणि विद्यार्थ्यांसमोर केले.

 

तीन समांतर सत्रांमध्ये झालेल्या या सादरीकरणांचे मानव संसाधन विकास मंत्रालयातील चीफ इन्होवेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे (माहिती संचार तंत्रज्ञान), बी.व्ही.जी. ग्रुपचे अध्यक्षहनमंत गायकवाड (कृषि) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक मिलिंद कांबळे (सामाजिक उपक्रम) यांच्या अध्यक्षतेखाली २० पेक्षा अधिक तज्ज्ञांनी मुल्यांकन केले. जवळपास २५० प्रतिनिधींनी या परिषदेत आपला सहभाग नोंदवला.

 

समारोप सत्रात तीनही विभागांच्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून या स्टार्ट अप्सना प्रोत्साहन दिले.अटल इनक्युबेशन सेंटर- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय वांकावला यांनी सेंटरच्या विविध कार्यक्रमांचा आणि आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. तर फ्युचर ग्रुपचे मदन मोहन मोहपात्रा यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करत स्टार्ट अप्सना नावीन्यपूर्ण योजना आखून त्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. अटल इनक्युबेशन सेंटरचे संचालक जय मृग यांनी अश्या प्रकारच्या परिषदांचे महत्व अधोरेखित केले तर कार्यक्रमाचा समारोप रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ट्रस्टी अरविंद रेगे यांच्या भाषणाने झाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat