पावसाचे रौद्ररूप पुढील दोन दिवस कायम
महा एमटीबी    02-Jul-2019
मुंबई : कधी संततधार, तर कधी मुसळधार बरसत गेले चार दिवस ठाण मांडून बसलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्ररूप धारण करीत मुंबईकरांची दैना उडवून दिली. ते तासांत सुमारे चारशे मिमी. पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

 

दरम्यान, सोमवारी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. रस्ते वाहतूक कोलमडली, गाड्या होड्यांसारख्या तरंगत होत्या, रेल्वे सेवा ठप्प झाली, घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढली. २६ जुलै २००५ च्या घटनेची आठवण देणारा हा पाऊस ठरला. सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पावसाचे रौद्ररूप लक्षात घेता भीतीमुळे मुंबई, उपनगर आणि ठाणे-पालघरमध्ये शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली.


चार दिवस मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतली. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असतानाच दुपारी ४ नंतर पुन्हा फेरा धरला. कधी रिमझिम तर कधी सरीवर पाऊस बरसत होता. मात्र रात्री १० वाजता पावसाने पुन्हा जोर धरला. साडेदहाच्या सुमारास इतका कोसळला की तांडवच सुरू केले.

 

सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची दैना उडवून दिली आणि जनजीवनच विस्कळीत केले. धावणारी मुंबई ठप्प झाली. १९७४ मध्ये असा पाऊस झाला होता. त्यानंतर थोड्यावेळात जास्त पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे.मृतांच्या नातेवाईकांना मदत

मालाड येथे पडलेल्या भिंतीचे बळी ठरलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाखांचा निधी जाहीर केला आहे. तसेच महापालिकेनेही पाच लाखांचा निधी द्यावा असे त्यांनी सुचविले. तसेच या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे त्यांनी सुचविले आहे.

 


चांदिवलीत जमीन खचली

चांदिवलीत जमीन खचल्याने आजूबाजूच्या इमारती रिकाम्या कराव्या लागल्या. घाटकोपर पूर्वेला पंतनगर व जवळच असलेल्या खाडीपर्यंत सर्वत्र गुडघाभर पाणी साचले. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर क्र.१ मधील म्हाडाच्या बैठ्या चाळीत घराघरात पाणी शिरले. कुर्ल्यात राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले.मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती. रेल्वेमार्वगावर पाणी साचल्याने मध्यरेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. हार्बर मार्गावरील गाड्याही ठप्प होत्या. पश्चिम रेल्वे विलंबाने धावत होती. सोमवारी रात्री उशिरा बंद झालेली मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 12 तासानंतर सुरू झाली. मंगळवारी 3 वाजता सीएसएमटीवरून पहिली गाडी सोडण्यात आली.

 परीक्षा रद्द

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता आणि तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयाच्या मंगळवार (2 जुलै)च्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या. सदर परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

 


बेस्टच्या एकूण ७७ बसचे मार्ग बदलले

जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या बसेसना मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे ७७ बसचे मार्ग बदलण्यात आले होते. ५८ बसेस पाण्यात अडकल्या होत्या. तर १५२ बसेस नादुरुस्त झाल्या. त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.


पाणी साचलेली ठिकाणे

वांद्रे पूर्व, कलानगर, माहीम, हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड, मानखुर्द, गोवंडी, चुनाभट्टी, या सखल भागात पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात खार लिंक रोड, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी सबवे, जोगेश्वरी स्थानक आणि हायवेनजीक, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

 


रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या


1) मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस (अप आणि डाऊन), 2) हैद्राबाद-मुंबई (हुसेनसागर एक्सप्रेस), 3) विजापूर-मुंबई

 

प्रवास खंडित करण्यात आलेल्या गाड्या


1) कोईम्बतूर- एलटीटी, 2) बेगळुरू-मुंबई उद्यान, 3) नागरकोईल-मुंबई, 4) हैदराबाद-मुंबई, 5) नागपूर-मुंबई सेवाग्राम, 6) मुंबई-बिजापूरमहापौरांचा दावा फोल

सोमवारी पावसाने दाणादाण उडवून दिली असली तरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांन मुंबई आलबेल असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांचा दावा मंगळवारी खोटा ठरला. मुंबईवर धोक्याची घंटा घणघणत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबईची परिस्थिती जाणून घेतली. महापालिकेकडून पाणी निचऱ्यासाठी होत असलेल्या प्रयत्नाची त्यांनी प्रशंसा केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

मुंबई मान्सून रेल्वे मंत्रालय बेस्ट महाविद्यालय Mumbai Monsoon Ministry of Railways Best College