देशातील सर्वांत मोठा चर्च घोटाळा उघडकीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019
Total Views |



लखनौ : भारतात चर्चशी संबंधित अनेक वादग्रस्त प्रकरणे उजेडात येत असताना चर्चशीच संबंधित आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (सीएनआय) चे बिशप पीटर बलदेव व आणखी १६ जणांच्या विरोधात चर्चच्या तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता हडपल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दाखल करण्यात आला आहे. चर्चशी संबंधित घोटाळ्यांपैकी आजवरचा हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याची शंकाही यामुळे व्यक्त करण्यात येत आहे.

 

काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील सिव्हील लाईन्स पोलीस स्थानकात या प्रकरणी बिशप पीटरसह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चर्चच्या मालमत्ता बनावट कागदपत्र वापरून अवैधरित्या हडप केल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात आली असून लखनौ डायोसीज ऑफ चर्च ऑफ इंडियाचे बिशप जॉन ऑगस्टीन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, भारतातील काही चर्चच्या बिशप्सनी १९७० मध्ये एकत्र येऊन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया असोसिएशन (सीएनआयए) ची स्थापना केली. त्यानंतर अफरातफर करण्याच्याच हेतूने बिशप ऑफ कोलकाता हे पद निर्माण करण्यात आले. पुढे याच बिशप्सनी १९९१ मध्ये या खोट्या संस्थेचा विस्तार करताना, चर्चच्या विश्वस्तांकडील त्यावेळच्या तब्बल १ हजार कोटी रूपये किमतीच्या मालमत्ता खोटी कागदपत्रे वापरून अवैधरीत्या सीएनआयएच्या नावे करून घेतल्या. या मालमत्तांमध्ये लखनौमधील महात्मा गांधी मार्ग आणि प्रयागराज येथील मालमत्तांचाही समावेश आहे.

 

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, अवैधरीत्या हडपलेल्या या मालमत्तांची आजची किंमत तब्बल १० हजार कोटी रूपये असल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले असून या १७ जणांनी संगनमताने या १० हजार कोटींच्या मालमत्ता आपापसांत वाटून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या १७ जणांमध्ये प्रयागराज येथील बिशप पीटर बलदेव हे या सर्व घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचेही तक्रारकर्त्याने म्हटले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याच्या तपासासाठी अधिक कालावधीची गरज आहे. जर हे सर्व आरोप खरे असतील, तर हा भारतात चर्चशी संबंधित सर्वांत मोठा घोटाळा असेल.” अशी माहिती उत्तर प्रदेश्ज पोलीस प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@