जे जे भेटले ते ते माझे गुरु...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2019
Total Views |


 

 

गेल्या ३५ वर्षांपासून मेळघाटासारख्या दुर्गम भागात जाऊन, तिथेच राहून वनवासी बांधवांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या, अविरत रुग्णसेवा करणारे एक सुपरिचित नाव म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे. केंद्र सरकारने यंदाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव केला. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. रवींद्र कोल्हे सांगताहेत आपल्या गुरूंविषयी...


मुल जन्माला येतं तेव्हा त्याला सर्वाधिक जवळीक लाभते ती आई-वडिलांची. आई-वडील जसे वागतील, जसे शिकवतील, जसे सांगतील, तशीच कृती करण्याचा प्रयत्न मूल करत असते. म्हणजे आईवडील हेच आपले गुरू असतात. माझे आईवडीलही माझ्यासाठी गुरूस्थानीच आहेत, कारण जे संस्कार त्यांनी माझ्यावर केले, त्यामुळेच तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. प्रत्येकच घरात 'शामची आई' असते, तशीच वागणूक माझ्या आईचीही होती. आपल्या घरी सणावाराला, काही विशिष्ट प्रसंगी गोडाधोडाचा, रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळा स्वयंपाक करण्याची पद्धत असते. माझी आईही असे करेच, पण तिची पद्धत होती, ती म्हणजे आधी शेजाऱ्यापाजाऱ्यांना, त्यांच्या मुलाबाळांना घरात केलेला पदार्थ द्यायचा आणि नंतर आपल्या मुलांनी, आपण खायचा. हाच इतरांना देण्याचा, वाटून खाण्याचा, त्यातल्या आनंदाचा संस्कार माझ्यावरही झाला. असाच स्वभाव माझ्या वडिलांचाही होता. ते रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि ट्रेड युनियनचेही काम पाहत असत. सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याची त्यांची आवड होती. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात येणाऱ्या वस्तूचे संबंधित दुकानदाराकडे खाते असे. दुधाचे, किराण्याचे, शिंप्याचे आणि आणखीही कसले कसले. आमचीही खाती होतीच, जिथे वस्तू, सामान, साहित्य आणले की, त्याचे बिल महिन्याच्या शेवटी दिले जात असे. पण, बऱ्याचदा बाबांचे काही सहकारी आर्थिक अडचणीमुळे म्हणा किंवा वैयक्तिक कारणांमुळे वा बदलीमुळेही बिल चुकवू शकत नसत किंवा बिल न देताच जात असत. माझे बाबा मात्र अशावेळी मदतीचा हात पुढे करत. एखाद्याची उधारी, महिन्याचे बिल स्वतःच्या खात्यावर घेत आणि स्वतःच त्याचे बिल फेडत असत, उधारी चुकती करत असत. असा इतरांच्या मदतीचा पाठ मला बाबांकडूनच मिळाला.

 

माझी बहीण सहावीत आणि मी नववीत असताना घडलेला एक प्रसंग मला विशेष प्रेरणादायक वाटतो. बहिणीच्या वर्गातील एका मुलीकडे व्यवस्थित शिवलेला फ्रॉक नसल्याने शिक्षकांनी इतर मुलींना आपला वापरलेला फ्रॉक घेऊन यायला व तिला द्यायला सांगितला. माझ्या बहिणीने हे आईला सांगितले, तेव्हा आईने बहिणीचा जुना फ्रॉक घेतला व त्याला ती ठिगळ लावून शिवू लागली. जेणेकरून तो त्या मुलीला वापरता येईल. बाबांनी हे पाहताच, आईला विचारले की, “फ्रॉकला ठिगळ वगैरे का लावतेस?” तेव्हा आईने सगळी हकीगत सांगितली. वडिलांनी हे ऐकले आणि तसे काही करण्याची गरज नाही, असे सांगितले. बाबा बहिणीला म्हणाले की, “त्या मुलीला आपल्या शिंप्याकडे घेऊन जा आणि तिच्यासाठी नवा फ्रॉक शिवून घे व पैसे आपल्या खात्यात टिपायला सांग.” तेव्हा बहिणीने त्या मुलीला शिंप्याकडे नेले व तिच्यासाठी नवीन फ्रॉक शिवला. अर्थात, त्याकाळी त्याची किंमत फार काही नसेल, पण या एका घटनेतून मला इतरांना मदत करण्याची मोठी शिकवण मिळाली. हा झाला बालपणीचा भाग, पण मी डॉक्टरकीच्या इंटर्नशिपनंतर आई-बाबांना वनवासी भागात जाणार असल्याचे सांगितले, तेव्हा मात्र दोघांनीही 'आमचं काय?' हा प्रश्न विचारत विरोध केला. पण, मी त्यांना एकच उत्तर दिले की, “तुम्ही मला जो इतरांना मदत करण्याचा संस्कार दिला, शिकवण दिली, त्यानुसारच तर मी वागत आहे. माझ्यात ही मदतीची भावना तुमच्याचमुळे रुजली आहे, त्यामुळे मला वनवासी भागात जाण्याची इच्छा होते, त्यालाही तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही जे बीज रोवलं, रोपटं लावलं, त्याला आता वाढू द्या. मात्र, मी तिकडे गेलो तरी कोल्हे कुळाचे नाव कधीही बदनाम होऊ देणार नाही.”

 

पुढे मला केंद्र शासनाने 'पद्मश्री' पुरस्कार दिला आणि मी आई-वडिलांना, माझ्या गुरूंना दिलेला शब्द पाळल्याचे समाधान वाटले. त्याचे श्रेय माझ्या आई-बाबांचेच. इथे कोणाला असेही वाटेल की, मी आईवडिलांना सांभाळायला नकार दिला का? असे करणे कोणाला चुकीचेही वाटेल. पण, माझ्या वडिलांना ते केंद्र सरकारच्या नोकरीत असल्याने भरपूर पेन्शन होती, मेडिकलची, प्रवासाचीही सुविधा होती. खर्चाचा मुद्दा नव्हता. त्यामुळे मी त्यांच्यासमोर असाही प्रस्ताव ठेवला की, “तुम्ही मला एका मर्यादेपर्यंत पैसा कमव असे सांगा, मी तेवढा पैसा कमावतो वा तुमच्या अपेक्षेनुसार घर, गाडी बंगलाही घेतो, नंतर तरी मला जाऊ द्या.” अर्थातच हे शक्य नाही, असे म्हणत आई-बाबांनी ते नाकारले. तेव्हा मीच म्हणालो, “यातून मी तुमच्या ऋणातून मुक्त होईन, पण मला समाजाचे ऋणही फेडायचे आहे, त्यामुळे नंतर तरी मला वनवासी भागात जाऊ द्या.” पुढे बहिणीच्या लग्नाचा आणि भावाच्या शिक्षणाचा खर्च मी उचलायचा, तसेच आई-बाबांकडून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासाठी-समाजसेवेसाठी पैसा मिळणार नाही, या अटींवर तडजोड झाली आणि मी मेळघाटात आलो. दुसरीकडे आई-बाबा शेगावला गजानन महाराज संस्थानमध्ये जात असत. मीही त्यांच्याबरोबर जात होतो. तिथे बालपणापासूनच कानावर विठ्ठलाचे नाम आणि 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला,' ही अभंगवाणीही पडत असे. हे संस्कारही माझ्यावर झाल्याने मी इथपर्यंत येऊ शकलो.

 

आई-बाबा माझे गुरू आहेतच, पण त्याचबरोबर मला ज्या शिक्षकांनी बाहेरचे जग पुस्तकांतून, शालेय पाठांतून, अभ्यासक्रमांतून सांगितले, शिकवले, ते शिक्षकही माझे गुरू आहेत. माझ्या हायस्कूलचे दोन्ही मुख्याध्यापक एदलाबादकर सर, दुसरे पिटीचे म्हणजे कवायतीचे शिक्षक विठ्ठल वाघ यांनी माझ्यावर संस्कार केले. मी जो घडलो, तो त्यांच्याचमुळे. १९७१च्या युद्धात आणि नंतर आणीबाणीच्या काळातही सतत देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात दाटून येई. नंतर वर्ध्यातील भारंबे, सुपे सरांनीही हेच संस्कार दिले. वैद्यकीय शिक्षणातही असेच शिक्षक-प्राध्यापक भेटले. मुंबईला भायखळ्याला आणि मुलुंडला असताना निलू अडवाणी, दिनू दयाल, आहुजा या वरिष्ठांनी अहोरात्र रुग्णसेवेचा आदर्श माझ्यासमोर ठेवला आणि त्यातूनच मी घडत गेलो. त्यानंतर माझ्यावर संस्कार करणारे तिसरे गुरू म्हणजेच पुस्तके-वाचनालये. वर्ध्याला असताना रामकृष्ण मिशन, गांधी मंदिर, जिल्हा वाचनालय या सर्वांनीच मला चांगली चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली. तसेच सर्वोदय हायस्कूलचे आणि भायखळ्यातील 'ग्रंथाली'च्या वाचनालयानेही पुस्तके दिली. वाचनालयांमुळेच जगभरातील विचारवंतांची मला ओळख झाली. तसेच 'रामकृष्ण मिशन'च्या वाचनालयात गेल्यावर तर तिथल्या आध्यात्मिक संन्यासीजनांशीही मी चर्चा करत असे. पण, त्यांनीच मला आपण जे वाचतो, त्यातल्या 'बिटविन द लाईन्स'चा अर्थ घ्यायला शिकवले. पुस्तकातले शब्द प्रत्यक्ष जीवनात कसे आचरणात आणता येईल, त्याचा वस्तुपाठ मला 'रामकृष्ण मिशन'च्या वाचनालयातून आणि तिथल्या संन्याशांकडून मिळाला. सोबतच संतवाङ्मयाचाही यात मोठा वाटा आहे. ज्ञानोबा-तुकोबांसह अभंगातून, संतांच्या चरित्रातून इतरांच्या मदतीचे संस्कार मिळाले.

 

पुढे आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यावर भेटलेल्या व्यक्ती माझ्यासाठी चौथ्या गुरू आहेत. मग त्यात प्रा. राम शेवाळकर, पु. ल. देशपांडे, बाबा आमटे, यदुनाथ थत्ते, चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यासह आनंदवनाच्या प्लॅटफॉर्मवर केलेली चर्चा, ऐकलेले शब्द यांचाही जीवनावर प्रभाव पडला. वैद्यकीय शिक्षणासाठी भेटलेल्या देशकुलकर्णी काकांनी माझा मेळघाटातील जाण्याचा मनोदय ऐकून 'नाऊ ऑर नेव्हर'चा मंत्र दिला आणि आता मनात विचार आला आहे तर तो पूर्णत्वासच ने, असे सांगितले. सोबतच शालेय जीवनापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत मित्रही समविचारीच भेटले. त्यांच्याकडूनही चांगुलपणाशिवाय काही मिळाले नाही आणि त्यांनीही मला माझ्या कामात प्रोत्साहन दिले. सोबतच 'तपोवन'चे संस्थापक शिवाजीराव पटवर्धन यांच्यासह मी एक महिना राहिलो. त्यावेळी ते रोज एका क्रांतिकारकाचे-देशभक्ताचे पुस्तक वाचायला देत, अशी ३० दिवसांत ३० पुस्तके मी वाचली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंसह अन्य क्रांतिकारकांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात कसे आणता येईल, यावर शिवाजीराव यांच्याशी चर्चा होत असे. तसेच महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचाही परिणाम झाला. सरतेशेवटी माझे पाचवे गुरू मी जिथे आलो, त्या मेळघाटातले वनवासी बांधवच आहेत. कारण त्या लोकांनी मला स्वीकारले, माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांच्यामुळे आजही मला जगण्याचे, काम करण्याचे बळ मिळते, उर्मी मिळते, म्हणूनच माझ्या गुरुस्थानी ही इथली माणसेही आहेत. सोबतच मेळघाटात मी शेती करु लागलो, तेव्हा हयात असलेल्या माझ्या आजीने मला शेतावर येणाऱ्या मजुरांची मजुरी रोज देण्याची शिकवण दिली. कारण, आपण मजुरी दिली तर त्यांच्या घरची चूल पेटेल असे ती सांगे. अर्थातच स्वतः आयुष्यभर मजुरी केलेल्या आजीला मजुरांची अवस्था माहिती होती. तिच्याचमुळे मजुरांना अडचणीच्या वेळी मदत करण्याचा संस्कारही माझ्यावर घडला. तसेच माझी पत्नी स्मिता, मुले रोहित आणि राम. या सर्वांनीच माझ्या अशा आयुष्यात साथ दिली, त्यामुळे त्यांच्याकडूनही मी काहीतरी शिकत गेलो, अशा सर्वांनीच माझे आयुष्य घडवले. ही सर्वच माणसे माझे गुरू आहेत.

 

- डॉ. रवींद्र कोल्हे

(शब्दांकन : महेश पुराणिक)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@