पुरंदर विमानतळ एसव्हीपीच्या अध्यक्षपदी लोकेश चंद्र
महा एमटीबी   11-Jul-2019



मुंबई : पुणे जिल्ह्यात पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संयुक्त कंपनी / विशेष हेतु कंपनीच्या (स्पेशल पर्पज व्हेइकल) संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर विमानतळ विकसित करण्याची जबाबदारी सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितीतील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपवली आहे. तसेच, राज्यातील सर्व विमानतळांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ही नोडल एजन्सी म्हणून घोषित करण्यात आली आहे.

 

सदर विमानतळाच्या विकासासाठी संयुक्त कंपनी / विशेष हेतु कंपनीच्या स्थापनेसही मान्यता देण्यात आली असून प्रस्तावित विशेष हेतु कंपनीमध्ये सिडकोचे सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के समभाग राहणार आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र विकास कंपनीचे १९,एमआयडीसी व पीएमआरडीए यांचे अनुक्रमे १५ टक्के समभाग असणार आहेत.

 

सदर संयुक्त कंपनी/विशेष हेतु कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली असून अध्यक्षांसह एकूण १४ सदस्य या संचालक मंडळामध्ये असणार आहेत. सदर विमानतळासाठी जमीन संपादन, नुकसानभरपाई व पुनर्वसन या बाबींची जबाबदारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे.

 

पुरंदर विमानतळ प्रकल्पामध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची रू. ७६० कोटी इतकी गुंतवणूक असणार आहे तर ५१ टक्के समभागानुसार सिडकोची एकूण गुंतवणूक सुमारे रु. २०४० कोटी इतकी अंदाजित आहे. या विमानतळाच्या विशेष हेतु कंपनीकरिता सिडकोच्या वतीने करण्यात येणारी गुंतवणूक, करार, निविदा, इ. बाबतचे सर्व अधिकार लोकेश चंद्र यांच्याकडे देण्यात आले असल्याचेही राज्य सरकार व सिडकोने स्पष्ट केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat