कबीर कलामंचाच्या कार्यक्रमामुळेच माझ्या मुलाने सोडलं घर !

    10-Jul-2019
Total Views | 581



संशयित नक्षली संतोषच्या आईची खंत

 

पुणे : 'माझा मुलगा कुठे असेल तिथे आम्ही त्याची वाट पाहतोय, असा निरोप त्याला द्या,' अशी मागणी संशयित नक्षली संतोष शेलार याच्या आईने केली आहे. तुमचा मुलगा नक्षलवादी झाला आहे, अशी विचारणा केल्यास त्याबद्दलचा पुरावा द्या, अशी मागणीही त्यांनी केली. 'त्यावेळी कबीर कला मंचाचा कार्यक्रम वस्तीत झाला नसता तर एवढी वेळ आली नसती,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

"तो कुठेही असेल तिथून त्याने परत यावे, आम्ही त्याची वाट पाहतोय," असे आर्जव येणाऱ्या जाणाऱ्याला सुशीला शेलार करत आहेत. संतोषच्या घरात त्याचे वडिल गंभीर आजाराने अंथरूणाला खिळलेले आहेत. आयुष्यभर त्यांनी घरांच्या भिंती रंगवून उपजीविका केली आणि आता घर सोडून मुलगा गेल्याने घरात अठरा विश्व दारीद्र्य येऊन ठेपल्याची खंत कुटूंबिय व्यक्त करतात.

 

संतोषचा जन्म पुण्यात भवानी पेठेतील कासेवाडी झोपडीत झाला. आता तो छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांचा म्होरक्या झाल्याचा संशय पोलीसांना आहे. संतोष शेलारचे कुटुंब गरिबीत जीवन जगत आहे. कबीर कला मंचाने माथी भडकावल्याने तो घर सोडून गेला, असा आरोप शेलार कुटुंबाने केला आहे.

 

पुण्यातील एका झोपडपट्टीत आठ बाय दहाच्या खोलीत संतोषचे कुटुंब राहते. घरात छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे आदींच्या प्रतिमा आहेत. त्याचा धाकटा भाऊ विकास एका शाळेत काम करतो. वहिनी घरकाम करते. आई एका मंदिरात स्वयंपाकीणीचे काम पाहते. मुलगा नक्षलवादी बनल्याचे त्याच्या आईने अद्याप मान्य केलेले नाही. पोलीसांच्या तपासालाही ती जूमानत नाही, आपला मुलगा घरात परत यावा एवढीच तिची इच्छा आहे.

 

कबीर कला मंचाकडून तरुणांची माथी भडकवण्याचे काम

संतोष मोठा भाऊ संदीप शेलार याने दिलेल्या माहीतीनुसार, "संतोष नववीत शिकत असताना आमच्या वस्तीवर कबीर कला मंचातर्फे कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे तो त्यांच्यात सामील झाला. पथनाट्यात वैगरे तो नव्हता, मात्र, आमच्या शेजारी राहणाऱ्या रूपालीच्या संपर्कात होता आणि एक दिवस बेपत्ता झाला. या घटनेला आता दहा वर्षे उलटून गेली. सचिन माळी व कबीर कला मंचाचे लोक टीव्हीवर मुलाखती देतात मात्र, संतोषबद्द्ल माहीती विचारल्यास नकारार्थी माना हलवतात. त्यांच्यावर कारवाई न केल्यास ते आणखी तरुण गोळा करून पाठवतील. आम्ही तक्रार देण्यासाठी पुढे आलो. अनेकांची मुले अद्याप बेपत्ता आहेत. प्रत्येकजण तक्रार करेल, असे नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121