विधानपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प तहकूब करण्याची वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |
'


अर्थसंकल्पात विरोधकांची आडकाठी 



मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी ऐतिहासिक घडामोडी घडल्या. विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला जात असताना विरोधकांनी अर्थसंकल्प फुटल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ घातल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना अर्थसंकल्पादरम्यानच सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. अर्थसंकल्पादरम्यान कामकाज तहकूब करावे लागण्याची विधानपरिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

 

अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडत असतानाच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात अर्थसंकल्प मांडला जात असताना तो आधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर हँडलवरही दिसत आहे. त्यामुळे अर्थसंकल्प फुटला आहे. हा सभागृहाचा अवमान आहे, असे ते म्हणाले. त्याचवेळी विरोधी बाकांवरचे सदस्य आक्रमक झाले. तेव्हा सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले व सर्व गटनेत्यांना आपल्या दालनात बोलावले.

 

सभापतींवर हक्कभंग?

कामकाज पुन्हा सुरू होताच सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बोलण्यास सुरूवात केली. विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प वाचताना कामकाज स्थगित करण्यात आले. कुणीतरी उठतो. काहीतरी बोलतो आणि सभापती कामकाज स्थगित करतात. सभापतींकडून ही अपेक्षा नाही. सभापतींच्या दालनात नाकारलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलता येत नाही. त्यातही सकाळी गटनेत्यांच्या बैठकीत कोणाला बोलायचे असल्यास प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो मुद्दा घ्यावा असे ठरले. तरी धनंजय मुंडे यांना प्रश्नोत्तराच्या तासात बोलण्याची परवानगी दिली. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा वेळ वाया गेला. त्यामुळे आम्हाला खात्री पटली की सभापतींकडून आम्हाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही सभापतींविरूद्ध अविश्वासाचा ठराव मांडतो, असे ते म्हणाले.

 

सभापतींचे स्पष्टीकरण

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, आपल्याला काय चालले आहे हे कळले नाही. अर्थसंकल्प फुटला असे म्हणतात ते नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण कामकाज थांबवले, असे सांगत आणि अर्थसंकल्प पुढे मांडण्यास सांगितले.

 

विरोधकांचा सभात्याग

अर्थसंकल्पात धनगराच्या विविध योजनांचा उल्लेख होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी धनगरांच्या आरक्षणाची मागणी सुरू केली आणि सभात्याग केला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी अर्थसंकल्प फुटला नसल्याचे सांगितले. आता तंत्रज्ञान जलद झाले आहे. वित्तमंत्री अर्थसंकल्प वाचत असताना १६ मिनिटांनी ते ट्विट होत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@