ठाण्यातून रानडुक्कराचे मांस आणि बंदुक जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |


 


'येऊर'च्या वन अधिकाऱ्यांची धडक कारवाई


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या येऊर परिक्षेत्राच्या वनाधिकाऱ्यांनी ठाण्यातील चेणा बंदर परिसरातून रानडुक्कराचे मांस आणि दोन बंदुक जप्त केल्या आहेत. चेणा बंदर येथील रहिवाशी योगेश जाधव यांच्या घरावर वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे मारलेल्या धाडीत हे मांस आणि बंदुक आढळून आल्या. आरोपी योगेश जाधव हा फरार आहे.

 

गेल्या वर्षी गोरेगावच्या 'दादासाहेब फाळके चित्रनगरी' येथून एक मादी बिबट्या आणि सांबराच्या शिकारीचे प्रकरण उघड झाले होते. तेव्हापासून वन्यजीवांच्या शिकारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय उद्यान प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. यामध्ये येऊर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शिकारीच्या विरोधात विशेष मोहिम राबवून शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. अशाच प्रकारची एक मोहीम मंगळवारी पहाटे ठाण्यामध्ये पार पडली. ठाण्यातील चेणा बंदर परिसरात काही स्थानिक इसम हरणाचे मटण आणत असल्याची माहिती सोमवारी रात्री येऊर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे येथील स्थानिक रहिवाशी योगेश जाधव यांच्या घरावर धाड मारल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. यावेळी जाधव याच्या घरात रानडुक्कराचे अंदाजे २ किलो मांस आणि ठासणीची एक बंदुक व एक एअरगन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हरणाच्या मांसाविषयी माहिती मिळाली असल्याने धाडीमधून मिळालेल्या मांसाची चाचपणी करण्यात आली. या चाचणीव्दारे हे मांस रानडुक्कराचे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जाधव याने शिकार करुन रानडुक्कराला मारल्याचे उघड झाले आहे. धाडीवेळी आरोपी जाधव हा खाडीत मासेमारीसाठी गेला होता. त्यामुळे तो वन अधिकाऱ्यांच्या हातून निसटला. मात्र त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पवार म्हणाले.

 

रानडुक्कराची हत्या करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याने जाधव विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राष्ट्रीय उद्यानचे संचालक अन्वर अहमद याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या तपासात राजेंद्र पवार यांच्यासमवेत वनपरिमंडळ अधिकारी विकास कदम, सुजय कोळी आणि वनरक्षक संजय साबळे, राजन खरात, अमित राणे, जितेंद्र देशमुख, विजय धुरी, रमाकांत मोेरे समाविष्ट आहेत.


वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@