जगाच्या पाठीवर तिचे दुःख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019   
Total Views |



पाकिस्तानमधील ५०० ते ७५० मुलींची फसवणूक केली गेली. त्यांची लग्नाच्या नावाने अक्षरशः खरेदी केली गेली. खरेदी कसली तर तिच्या आईबापाला थातुरमातुर रक्कम दिली गेली. त्यानंतर त्या मुलींना चीनमध्ये नेले जायचे. तिथे त्यांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलले गेले. मात्र, याची वाच्यता किंवा जाब पाकिस्तानने चीनला विचारला नाही. या सगळ्या काळ्या आणि अतिशय क्रूर धंद्यात चीनबरोबरच पाकिस्तानचे काही स्थानिकही सहभागी आहेत, असा संशय आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया असतील?

कारण, पाकिस्तानमध्ये महिलांची परिस्थिती काय असेल, हे २००२ साली मुख्तार माई या महिलेच्या दुर्दैवी आयुष्यामुळे सगळ्या जगाने पाहिले होते. बालकांच्या लैंगिक शोषणावर जगभरात कायदे आहेत. मात्र, पाकिस्तानमध्ये या कायद्याचे अजब गजब कसे झाले, याचे अतिशय वाईट उदाहरण म्हणजे मुख्तार माईचे जगणे आहे. तिच्या अल्पवयीन भावाचे तीन जण सातत्याने लैंगिक शोषण करत असत. त्याने याबद्दल आवाज उठवून विरोध दर्शवला. मग या तीन जणांनी या १२ वर्षांच्या मुलाने त्यांच्या २० वर्षाच्या बहिणीवर जबरदस्ती केली, असे समाजात पसरवले. त्यामुळे या १२ वर्षांच्या मुलाला त्यांच्या २० वर्षांच्या बहिणीशी लग्न करावेच लागेल, असाही निर्णय दिला. यामध्ये स्वतःला वाचविण्यासाठी या तिघांनी आपल्या २० वर्षांच्या बहिणीच्या इज्जतीचाही विचार केला नाही की, तिच्या भावनांचा.

 

असो, पुढे मुख्तारने या गोष्टीला नकार दिला असता तिला पंचांसमोर न्यायनिवाडा करायला बोलावले गेले. मग तिथे ठरले की, या बदल्यात मुख्तारला तिच्या भावाचे शोषण करणार्‍याशी लग्न करावे लागेल. तिने नकार दिला असता, संपूर्ण पंचायतीसमेार तिला नग्न करत, ओढत एका झोपडीत नेले गेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. भयानक आणि शब्दातीत क्रौर्य. पण, हे त्यावेळी पाकिस्तानमध्ये घडले होते. हे सांगायचे यासाठी की पाकिस्तानमधले लहान मुलांच्या संबंधातले लैंगिक शोषण आजही थांबले नाही. लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ क्लिप्स, फोटो काढून ते सर्वत्र दाखवू, अशी पालकांना धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणे, हा इथल्या बहुसंख्य विकृतांचा सामान्य धंदा झालेला आहे.

 

त्यामुळे पाकिस्तानमध्ये शरिया कायदा असला तरी तिथल्या काही लोकांनी बलात्कार करून बलात्कारित व्यक्तीला किंवा त्यांच्या संबंधितांना ब्लॅकमेल करणे हा मोठ्या संख्येने होणारा गुन्हा आहे. इजिप्तमध्ये बलात्काराबद्दल तेथील विचारवंत उघडउघड बोलतात की, “काय करणार? महागाई इतकी वाढली आहे, बेकारी इतकी वाढली आहे की, पुरुषमाणसांना वेळेत लग्न करता येत नाहीत. मग ते काय करणार?” या विचारांना काय म्हणावे? इथियोेपियामध्येही मुलीमहिलांच्या शोषणाची पद्धत अशीच भयंकर. तिथे मुलगी दहा वर्षांची झाली की, पालकांना तिला डोळ्यात तेल घालून संरक्षण द्यावे लागते. कारण, इथे मुलगी दहा वर्षांची झाली रे झाली की तिला पळवून नेऊन जोपर्यंत ती गरोदर राहत नाही तोपर्यंत बलात्कार केला जातो. नंतर त्या पळवून नेलेल्या असाहाय्य गरोदर बालिकेला पुन्हा आईबापासमोर समाजासमोर आणायचे आणि त्यांना सांगायचे की, तुमची मुलगी माझ्यामुळे गरोदर राहिली आहे. मी तिच्याशी लग्न करेन, पण त्यासाठी मला अमुक अमुक रक्कम द्यावी लागेल.

 

मुलीच्या आणि घराच्या इज्जतीसाठी आईबापांना ते पैसे कसेही करून द्यावेच लागतात. नाहीतर समाजात त्यांना जगणे मुश्किल होते. वाह रे न्याय! पण, दुर्दैव असे आहे की, आजही इथियोपियामध्ये ही पद्धत रूढ आहे. यामुळेे अगणित बालिकांचे आयुष्य अवेळी कुस्करले जाते. मानवी हक्क आणि मानवी स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे याबाबत जवळजवळ मूग गिळूनच आहेत. का? असो, यावरून इटली देशातला बलात्कारासंबंधीचा एक निवाडा आठवतो. इटलीमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला. तिने पोलिसांत गुन्हा दाखल केला. गुन्हा सिद्ध होता.

 

पुरावेही होते. तरीही केस कोर्टात गेली. तिथल्या न्यायाधिशाने परिस्थितीजन्य पुराव्याला अनुसरून विचारले की, बलात्कार झाला तेव्हा मुलीने टाईट जीन्स घातली होती. ती जीन्स तीच काढू शकते. याचाच अर्थ त्या मुलीच्या संमतीनेच सारे झाले. वर न्यायालयाने असेही सांगितले की, टाईट जीन्स घालणार्‍या मुलींवर बलात्कार होऊच शकत नाही. अर्थात यावर जगभरातून इटलीची निंदा केली गेली. लाजेकाजेने हा निर्णय न्यायालयाने मागे घेतला. पण हे असे अनेक निर्णय आणि घटना आहेत, ज्यावरून जगभरातील महिलांच्या दुःखाचे पडसाद गडद होताना दिसतात.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@