मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट : पाकिस्तान, दहशतवाद, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |


बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद

 

बिश्केक : किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीसाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांत यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली. भारत व चीनमधील आर्थिक संबंधांना अधिक मजबुती व द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर यावेळी परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील उपस्थित होते.

 

दोन्ही नेत्यांत झालेल्या चर्चेची माहिती देताना परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग या दोन्ही नेत्यांनी परस्परांतील संबंध दृढ करण्यावर आणि वुहान परिषदेतील यशावर सहमती व्यक्त केली. सोबतच मोदींनी जिनपिंग यांना भारतात येण्याचेही निमंत्रण दिले. दरम्यान, शी जिनपिंग याचवर्षी भारतात येणार आहेत, अशी माहिती आहे.

 

गोखले पुढे म्हणाले की, “पंतप्रधानांनी दोन्ही देशांतील उत्तम संबंधांमुळे दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले मुद्दे सोडवले गेल्याचा उल्लेखही जिनपिंग यांच्याशी चर्चा करताना केला. ज्यात ‘बँक ऑफ चायना’ची भारतात शाखा सुरू करणे आणि मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा मुद्दा प्रमुख आहे. शिवाय, दोन्ही नेत्यांत पाकिस्तानविषयीही संक्षिप्त चर्चा झाली. पाकिस्तानने दहशतवादमुक्त वातावरण तयार करणे आवश्यक आहे, पण तो देश तसे करत नाही, असेही यावेळी मोदींनी जिनपिंग यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एससीओ शिखर संमेलनात किरगिझस्तानचे राष्ट्रपती जीनबेकोव यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच शुक्रवारी पंतप्रधान मोदी इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांचीदेखील भेट घेतील.

 

मोदी-पुतीन यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांत यावेळी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. तसेच हे संबंध अधिक दृढ करण्यावरही एकमत झाले. दरम्यान, रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी किरगिझस्तानचे राष्ट्रपती जीनबेकोव यांच्यासह भोजन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@