घाबरू नका, स्वतःला पंतप्रधान समजून काम करा; पंतप्रधान मोदींचा सचिवांना सल्ला
महा एमटीबी   11-Jun-2019


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग येथे केंद्र सरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी सचिवांना मार्गदर्शन करत घाबरुन काम करु नका, तर स्वतःला पंतप्रधान समजून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरकारला मिळालेल्या यशाचे श्रेय देखील या अधिकाऱ्यांना दिले.

 

आपण सर्वांनी स्वतःला पंतप्रधान समजून देशात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यासाठी काम करावे. हे करत असताना जर एखादी चूक झाली तर घाबरून जाऊ नका. ती तुमची नाही तर माझी चूक असेल. असे सांगत मी तुमच्या पाठीशी उभा असल्याचे, यावेळी मोदी म्हणाले. सचिवांमध्ये देशाला पुढे नेण्यासाठी दूरदृष्टी, बांधिलकी आणि ऊर्जा असून सचिवांच्या या चमूचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही मोदी म्हणाले. त्यासोबतच देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच ७५ वर्ष पूर्ण होणार असून देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे उपक्रम सर्व विभागाने सुरु करून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

भारतीय मतदारांनी पुढल्या पाच वर्षांसाठी एक स्वप्न पाहिले असून आता आपल्या समोर ही संधी आहे असे मोदी म्हणाले. जनतेच्या प्रचंड अपेक्षांकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पाहावे. जनादेशामध्ये सद्य परिस्थिती बदलण्याबाबत तसेच उत्तम जीवनमानाच्या जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागात कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.

 

या चर्चेदरम्यान विविध सचिवांनी प्रशासकीय निर्णय प्रक्रिया, कृषी, ग्राम विकास आणि पंचायती राज, माहिती तंत्रज्ञान उपक्रम, शैक्षणिक सुधारणा, आरोग्य, औद्योगिक धोरण, आर्थिक विकास, कौशल्य विकास यासारख्या विषयांवर आपल्या सूचना आणि कल्पना मांडल्या. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat