घटस्फोट आणि आयर्लंड
महा एमटीबी   28-May-2019जगभरात विवाह संस्कार, संस्था यांच्यामध्ये आश्चर्यकारक विविधता आणि तितकेच आश्चर्यकारक साम्यही आढळून येतेच येते. विविधता ही विवाह कोणत्या पद्धतीने करायचा, काय विधी करायचे? विवाहाच्या वेळच्या खानपान पद्धती वगैरेंमध्ये प्रामुख्याने असते. अर्थात, विवाहामध्ये साम्य असते, ते एकाच बाबतीत की एक स्त्री आणि एक पुरुष या दोन सजीवांची एकत्र जीवन जगण्यासाठीची सुरुवात होते. पुढे मानवी स्वभावानुसार या दोघांच्या सहजीवनात त्या त्या परिसरातील प्रथा-रूढींनुसार खूप काही घडते, ते जे काही घडणे असते, त्यामध्ये जगभरात आश्चर्यकारक साम्य आहे.

 

असो, तर विवाह झाला की, तो टिकावा असे वाटणे साहजिकच आहे. पण, तरीही जगभरात विवाह तुटण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. सगळ्यात जास्त घटस्फोटाचे प्रमाण युरोप खंडातील लक्झेमबर्ग या देशामध्ये आहे. या देशात घटस्फोटाचे प्रमाण तब्बल ८७ टक्के आहे. आपल्या संस्कृतीप्रधान देशात हेच प्रमाण एक टक्का आहे. अर्थात कुटुंबव्यवस्था, जातीपातीच्या पंचायती, संस्कार आणि समाजाचे दडपण याचा हा परिणाम असावा की, भारतात विवाह तुटण्याचे प्रमाण कमी आहे. ही आपल्या समाजव्यवस्थेच्या निकोपतेसाठी चांगली बाब आहे. घटस्फोट हासुद्धा केवळ त्या दोन व्यक्तींच्या फारकतीचा मुद्दा नसतो, तर त्या व्यक्तीसोबतच त्या दोन व्यक्तींच्या कुटुंबांची विशेषता त्यांच्यावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठांची, लहान मुलांची ती फारकत म्हणजे फरफटच असते. त्यामुळे घटस्फोट हा मुद्दा जगभरात विशेष दर्जानुसारच पाहिला जातो. या दर्जाला त्या त्या देशाच्या विशेष धर्मसंस्कृतीचा बाज असतो, हे मात्र नक्की.

 

आधीच सांगितल्याप्रमाणे भारतात घटस्फोट घेण्याचे प्रमाण १ टक्का आहे. कारण, एका जन्मातच नव्हे, तर सात जन्मात साथ देण्याचा संस्कार म्हणजे विवाह असा भारतीय संस्कृतीविचार. चीन, जपान आणि बौद्ध संस्कृती मानणार्‍या देशांमध्येही घटस्फोट सहजासहजी घेण्याकडे कल नाही. कारण अर्थातच सांस्कृतिक. कुटुंब प्र्रथेला प्राधान्य. त्याचवेळी या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतीलदेशांमध्ये तिथल्या धार्मिक परिभाषेनुसार घटस्फोटाचे कायदेही शरिया कानून मानणारे. तरीसुद्धा तिहेरी तलाक काही देशांनी नाकारलेला. अर्थात, आपल्या देशात मात्र तिहेरी तलाक विरोधी कायदा केला, तर त्या नियमाचा मक्ता घेतलेली धर्मसंस्था कोलमडेल, इतके वादळ उठवले गेले होते.

 

असो, यानुसार स्वतःला व्यक्तिस्वातंत्र्यवादी मानणार्‍या पाश्चिमात्त्य देशांमध्येही घटस्फोटाच्या कायद्यांबाबत एकवाक्यता नाही. बायबल धर्मग्रंथानुरुप साक्षात ईश्वराने विवाहसंस्था निर्माण केली आहे. त्यामुळे इथल्या कित्येक देशांमध्ये कायद्याने उठसूट घटस्फोट घेणे तितकेसे सोपे नाही. याचे प्रत्यंतर आयर्लंड या देशामध्ये दिसते. कॅथलिक चर्चचे प्रस्थ असलेल्या या देशामध्ये घटस्फोट घेणे देणे म्हणजे एक मोठी किचकट प्रक्रिया. त्यामध्ये शोधून शोधून अशा अटी टाकल्या आहेत की, त्या पाळण्यापेक्षा घटस्फोट न घेतलेला बरा, असे वाटावे. यापैकी एक अट अशी की, घटस्फोट हवा असणार्‍या जोडप्याने चार ते पाच वर्षे विभक्त राहून दाखवावे. त्यानंतरच घटस्फोटाला मंजुरी मिळेल.

 

अर्थात, घटस्फोट न घेता विभक्त राहायचे म्हणजे दोघांनाही विवाहित असून विवाहाच्या समस्त फायद्यांपासून वंचित राहायचे असा नियम. त्या दरम्यान त्यांच्या मुलांचे, घराचे, संपत्तीचे काय, यावर त्या पतीपत्नीने विचार करायचा. अर्थात, त्यामुळे घटस्फोट मिळेपर्यंत पती आणि पत्नी दोघांनाही बर्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागे. याबद्दल देशात बराच विरोध झाला. समलैंगिक विवाह आणि गर्भपात कायदा यावर जनमानसाचा कौल घेऊन कायदे बनविणार्‍या आयर्लंड सरकारने मग घटस्फोटाच्या या कायद्यावरही जनमत घेतले. ८२ टक्के लोकांनी घटस्फोट घेण्याआधी चार-पाच वर्ष विभक्त राहून प्रतीक्षा करण्याच्या अटीविरोधात मतदान केले. त्यामुळे आता इथे घटस्फोट हवा असेल, तर विभक्त राहण्याचा कालावधी दोन वर्षे केला गेला आहे. या कायद्याला तिथल्या जनतेचे समर्थन आहे. आयरिश जनतेने धर्मसंस्कृतीपलीकडे भौतिक वास्तविकतेचा विचार करून तिथे आणखी एक नवा अध्याय रचला आहे, असेच म्हणावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat