भाजपच्या 'या' नेत्याचा विजय अविस्मरणीय...
महा एमटीबी    24-May-2019


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीएने काँग्रेस आणि विरोधी पक्षांना सळो का पळो करून सोडले. भाजपने बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेसला क्लीन स्वीप दिला. मध्य प्रदेशमध्ये २९ जागांपैकी २८ जागांवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनादेखील गुना मतदार संघातून १ लाख मतांनी आपटले. भाजपचे कृष्ण पाल यादव उर्फ केपी यादव यांनी ही किमया करून दाखवली.

 

कृष्ण पाल यादव हे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. सिंधीयानच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ख्याती असताना काँग्रेस पक्षाने मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर के.पी. यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कधीकाळी केपी यादव हे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ताटकळत असायचे. भाजपने कृष्ण पाल यांना तिकीट दिल्यानंतर ही गोष्ट सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शिनी यांनीच सांगितली होती.

 

याच के.पी. यादवांना निवडणुकीत ६ लाख १४ हजार मते मिळाली तर ज्योतिरादित्यंना ४ लाख ८८ हजार मते मिळाली. के.पी यादव यांनी १ लाख २६ हजार मतांनी विजय मिळवून एक नवे उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे. के.पी. यादव हे ४५ वर्षाचे असून ते डॉक्टर आहेत. त्यांचे वडील अशोकनगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. गुणा मतदार संघ सिंधिया कुटुंबियांचा गड मानला जात होता. यादव यांनी त्याच गडाला सुरुंग लावण्याचे काम केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

भाजप काँग्रेस कृष्ण पाल यादव ज्योतिरादित्य सिंधिया गुना मतदार संघ BJP Congress Krishna Pal Yadav Jyotiraditya Scindia Guna Constituency