"देशाच्या पुनर्निर्माण व राष्ट्रोत्थानाच्या महायज्ञात जनतेची मतरुपी आहुती"
महा एमटीबी   21-May-2019


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार


नवी दिल्ली : रविवारी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होऊन भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे संकेत मिळाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची बैठक घेतली व सर्वांचे आभार व्यक्त केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “यंदाच्या निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या विजयासाठी वा पराभवासाठी नव्हे तर देशाच्या पुनर्निर्माण आणि राष्ट्रोत्थानाच्या महायज्ञात मतरुपी आहुती देण्यासाठी जनतेने सहभाग घेतला. परिवर्तनाच्या या प्रहरात माझेही योगदान असावे, हा भाव प्रत्येकाच्या मनात होता. सोबतच मी आतापर्यंत कितीतरी निवडणुका पाहिल्या. परंतु, यंदाची निवडणूक राजकाराणाच्याही पलीकडची होती. जनतेने समोर आलेल्या सर्वच अडथळ्यांना पार करत स्वतःच ही निवडणूकरुपी लढाई लढली,” असेही ते म्हणाले.

 

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने परिपक्वता दाखवली. आता आपल्याला रालोआला आणखी मजबूत केले पाहिजे,” असे आवाहनही यावेळी मोदींनी केले. पंतप्रधानांच्या संबोधनातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ते म्हणाले की, “यंदाचा प्रचार निष्कंटक वाटला. प्रचारकाळात आनंद वाटला. प्रचार करताना प्रचार करतो आहे, असे नव्हे तर देशाची तीर्थयात्रा करत आहे, असा अनुभव मला आला,” असे मत यावेळी मोदींनी व्यक्त केले. दरम्यान, नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित केलेल्या या बैठकीला रामविलास पासवान, हरसिमरत कौर, अनुप्रिया पटेल यांच्यासह अन्य नेत्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat