कॉंग्रेस आमदाराच्या गाडीच्या धडकेत दोघे ठार
महा एमटीबी   20-May-2019
 


धुळे : धुळ्यातील साक्री मतदार संघातील आमदार डी. एस. अहिरे यांच्या गाडीच्या अपघातात दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. आमदारांच्या वाहनचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत असताना या दोघांना बसलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, आमदार डी. एस. अहिरे यांचा वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत होता, असा गंभीर आरोप मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांच्या नातेवाईकांनी केला आहे.

 

मालांजन येथील सोनवणे कुटुंबातील दोन सख्खे भाऊ लग्न समारंभातून परतत होते. रविवारी रात्री धाडणे फाट्याजवळ आले आणि त्यांना आमदार अहिरे यांच्या गाडीने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी पुढे पाठवायची तसदी न घेता स्वतः आमदार आणि चालकाने पळ काढला. अपघातातील जखमींना वाऱ्यावर सोडल्याने उपचाराअभावी दोघांनी प्राण सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

धक्कादायक ! आमदाराच्या गाडीत दारूच्या बाटल्या

आमदार डी. एस. अहिरे यांच्या गाडीच्या पाहणीत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाडीत दारुच्या भरलेली बाटल्या आढळल्याने प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला आहे. थोड्याच वेळात पोलिसांनी अपघातग्रस्त कार तात्काळ उचलण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी हाणून पाडला. यावेळी कार उचलणाऱ्या अधिकाऱ्यांसह संतप्त जमावाने पोलीस आणि क्रेनला तिथून माघारी धाडले. दरम्यान, रात्री मृतदेह शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. ग्रामस्थांनी सुरत-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat