यामुळे बसतोय मुंबई मेट्रोरेल प्राधिकरणाला कोटींचा भृदंड
महा एमटीबी   20-May-2019



मुंबई : वृक्षतोडीची परवानगी मिळत नसल्याने मुंबई मेट्रो रेलप्राधिकरणाला दिवसाला ४.२८ कोटींचे नुकसान होत आहे. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड रखडल्याने यंत्रसामुग्री सध्या तशीच पडून आहे. काम होत नसले तरी त्याचे कोट्यवधींचे भाडे प्रशासनाला आणि पर्यायाने करदात्या सामान्य जनतेलाच भरावे लागणार आहे, अशी माहिती सोमवारी राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या कामावरील स्थगिती उठवावी, अशी विनंती पुन्हा एकदा न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

 

या समितीत आवश्यक संख्येत जाणकारांची भरती अजूनही झाली नसल्याने बुधवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. जास्तीच जास्त १५ सदस्य संख्या असलेल्या या समितीत वनस्पतीशास्त्रातील ७ माहितीगार समाविष्ट करणे अनिवार्य आहे. मात्र यापूर्वीच्या समितीत केवळ १४ नगरसेवक बसवल्याने न्यायालयाने ही समितीच बरखास्त केली होती.

 

मुंबईत वृक्षतोडीची परवानगी देण्याचे अधिकार याच समितीकडे असल्याने मान्सून पूर्वतयारी म्हणून धोकादायक झाडांची छाटणी, मुंबई मेट्रो, रस्तारुंदीकरण अशी अनेक विकास कामे खोळंबली आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांच्या समस्येत वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दादर, हिंदमाता येथील काही झाडांची छाटणी पावसाळापूर्वी करण्याची आवश्‍यकता आहे, असे महापालिकेच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat