मुद्दा केवळ मंदिर दर्शनाचा नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2019
Total Views |


 


सोबतच या सगळ्यालाच एका भयगंडाची किनारदेखील आहे. देशात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेवर येण्याची व आपली सद्दी संपल्याची जाणीव या लोकांना होत असल्यानेच हे सगळे घाबरलेले लोक मोदींविरोधात नाही नाही ते उद्योग करत आहेत. म्हणजेच मुद्दा केवळ नरेंद्र मोदींच्या मंदिर दर्शनाचा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाला लागलेल्या सुरुंगाचा आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी आपल्या आध्यात्मिक दौऱ्यांतर्गत पवित्र केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम मंदिरात जाऊन आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घेतले. मोदींनी यावेळी केदारनाथ तीर्थक्षेत्रातील गुफेत जाऊन ध्यानधारणादेखील केली. पंतप्रधानांची ध्यानावस्थेतील छायाचित्रेही त्यानंतर समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि देशातल्या सर्वच प्रसारमाध्यमांत, छद्म धर्मनिरपेक्षतावादी टोळक्यात एकच गहजब माजला. विशिष्ट धर्माचा पवित्र महिना सुरू असताना देशाचा पंतप्रधान इफ्तार पार्ट्या झोडायचे सोडून थेट हिमालयात जातो काय, शिवलिंगासमोर नतमस्तक होतो काय आणि मुख्य म्हणजे अंगावर भगवे वस्त्र लपेटून ध्यानधारणा करतो काय, हे सारेच दृश्य लिबरल गँगच्या दृष्टीने ‘न भूतो’, असेच होते. आतापर्यंत ज्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्षतावादी वगैरे कल्पनांच्या प्रभावाखाली इथल्या राज्यकर्त्यांनी बहुसंख्यांच्या श्रद्धांची हेटाळणी केली, त्याच श्रद्धेसमोर हा माणूस झुकताना पाहून ‘हेचि फळ काय मम लिबरलत्वाला’, असेही कित्येकांना वाटले. मोदींच्या केदारनाथ-बद्रीनाथ तीर्थयात्रेनंतरची बुद्धिजीवी, विचारवंती वर्तुळातली तगमग, तडफड पाहता या लोकांना मोदींची कृती किती झोंबली असेल, याचीही कल्पना करता आली. प्रसारमाध्यमांसमोर येत या लोकांनी मग नरेंद्र मोदींवर टीका करायलाही सुरुवात केली. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा शिल्लक असताना स्वभावाने फकीर असलेल्या नरेंद्र मोदींनी वैराग्यमूर्ती असलेल्या महादेवापुढे जाणे, ही कृती निश्चितच आगळीवेगळी होती.

 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या सव्वा महिन्यात नरेंद्र मोदींनी आपल्या पाच वर्षांतील कार्यकाळाचा लेखाजोखा मांडल्याचे सर्वांनीच पाहिले. जवळपास शंभराच्यावर सभा मोदींनी देशभरात घेतल्या आणि लाखो किलोमीटरचा प्रवासदेखील केला. देशाला विकासाच्या, प्रगतीच्या रस्त्याने पुढे जायचे असेल तर मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची आवश्यकता असल्याचे मोदींनी ठिकठिकाणी पटवून दिले. ही सगळी प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मग ‘आपलेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार,’ हा आत्मविश्वास जागलेल्या मोदींनी मनःशांतीसाठी हिमालयाचा मार्ग निवडला. अर्थात प्रत्येकच व्यक्ती आपापल्या आयुष्यात आपापल्या कुवतीनुसार मनःशांतीसाठी निरनिराळी पद्धती अवलंबत असतो. नरेंद्र मोदींनी ही मनःशांती केदारनाथ-बद्रीनाथ इथे शोधली तर काही लोकांनी मतदानाचे सगळे टप्पे पार पडण्याआधीच अभद्र आघाड्यांत ती शोधायला सुरुवात केली. सातव्या टप्प्यातील मतदान आणि मतमोजणी पूर्ण होण्याआधीच चंद्राबाबू नायडू, शरद पवार, मायावती, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल ही मंडळी एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसली. हा प्रकार मांसाच्या तुकड्यासाठी आकाशात घिरट्या घालणाऱ्या बुभुक्षित गिधाडाहून कमी कसा म्हणता येईल? असल्या दळभद्री कृत्यांतून कोणाला मनःशांती लाभत असेल तर त्यांनी ती निश्चितच मिळवावी. पण, नरेंद्र मोदींच्या वैयक्तीक कृतींवर टीका करण्याचे कोणतेही कारण नाही. कारण मोदी आपल्या मनातील श्रद्धेपायी केदारनाथला-बद्रीनाथला गेले, मतदानाचे निकाल जाहीर होण्याआधीच काही कांड करण्यासाठी नव्हे.

 

नरेंद्र मोदींच्या दोन दिवसांच्या तीर्थस्थळ दर्शनयात्रेवर आणखी एक टीका झाली, ती म्हणजे मोदींनी या तीर्थभेटींचादेखील इव्हेंट केला. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर येत दिवसभर आपलाच चेहरा सगळीकडे कसा झळकेल, हे पाहिले. सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी मतदारांवर प्रभाव टाकण्याची ही खेळी होती, असेही म्हटले गेले. पण, जर मोदींनी पत्रकारांना, वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना परवानगी दिली नसती तर? निश्चितच इथल्या तमाम बुद्धिमान शहाण्यांनी माध्यमस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले असते. मोदी कसे माध्यमविरोधी आहेत आणि त्यांच्या या नामंजुरीमुळे देशावर जणू काही भयानक संकट कोसळल्यासारखे आकांडतांडव सगळ्याच विद्वानांनी केले असते. अशा परिस्थितीत खरे म्हणजे नरेंद्र मोदींनी राजीव गांधींकडून काहीतरी शिकायला हवे होते. राजीव गांधींनी नौदलाच्या आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर आपल्या खासगी सहलीसाठी केला, पण एकाही छायाचित्रकाराला बरोबर घेतले नाही. म्हणजेच मोदी इथे चुकले असेच ना? सोबतच मोदींच्या केदारनाथ-बद्रीनाथ दर्शनाने काँग्रेसादी पक्षांचीही पुरती गोची झाली. कारण या पक्षाच्या कोणत्याही नेत्याला गळ्यात गळे घालत, डोक्यावर गोल टोपी चढवत, एकमेकांना मिठाईचा घास भरवत इफ्तार पार्ट्या करता आल्या नाहीत. बहुसंख्य समाजाला धरू की अल्पसंख्याकांना, असे अवघड दुखणे या लोकांच्या मागे लागले.

 

वस्तुतः २०१४ सालची निवडणूक, गेल्या पाच वर्षांतला मोदींचा सत्ताकाळ आणि आताचा निवडणूक प्रचार यामध्ये देशभरातच राष्ट्रवादी, भारतीयत्वाच्या विचारांची लाट उसळलेली पाहायला मिळाली. छद्म धर्मनिरपेक्षतावादाच्या विरोधातही या संपूर्ण कालावधीत पुरेपूर जागरण-जनजागृती झाली. पश्चिम बंगालमध्ये मात्र हे झाले नाही. पश्चिम बंगालची भूमी, क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची, आधुनिक विचारवंतांची, थोर लेखक-साहित्यिकांची. नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, रवींद्रनाथ टागोर आदी थोर प्रभृतींचा हा प्रदेश. परंतु, हा इतका समृद्ध वारसा असूनही बंगाली जनतेला आपले राजकीय नेतृत्व नीटसे शोधता आले नाही. भारतीयत्वाशी नाळ न जुळणाऱ्या डाव्या पक्षांनी इथे सुमारे ३५ वर्षे सत्ता राबवली. विरोधी मतांची गळचेपी-हत्या करणे, हिंसाचार, जीवघेणे हल्ले आदी अनेक अराजकसदृश्य घटना बंगालने या काळात अनुभवल्या. डाव्यांची सत्ता उलथून मुख्यमंत्रिपदी आलेल्या ममतांनीदेखील पश्चिम बंगालला रणभूमीचे रूप दिले. गेल्या ७-८ वर्षांत ममतांच्या बेलगाम सत्तेतून सिंहासन राखण्यासाठीच्या घाणेरड्या राजकारणाचे दर्शन अवघ्या देशाला झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांत तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपुरस्कृत हिंसेचा नंगानाच केला. केवळ राष्ट्रवादी-भारतीयत्वाची भावना मनी बाळगणाऱ्या पक्षाला-नेतृत्वाला मिळणारे प्रचंड जनसमर्थन ही या हिंसेमागची पार्श्वभूमी होती. प्रसारमाध्यमांनी, बुद्धिजीवी-बुद्धिमंतांनी मात्र बंगालात ममतांच्या गुंड कार्यकर्त्यांनी केलेल्या विध्वंसाविरोधात अवाक्षरही काढले नाही. उलट मोदी-शाह व भाजप कार्यकर्त्यांमुळेच राज्याची अशी अवस्था झाल्याचे या लोकांनी तोंड वर करून सांगितले. फरहान अख्तरला तर ममतादीदी आपल्या आदर्श असल्याचे वाटू लागले. म्हणजेच जी व्यक्ती उघडउघड लोकशाहीचा गळा घोटते, तिच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कोणीही जाब विचारायला तयार नाही. मात्र, हीच मंडळी आता नरेंद्र मोदींच्या केदारनाथ-बद्रीनाथ मंदिरभेटीवर अद्वातद्वा बोलताना, घाणेरड्या पद्धतीने विरोध करताना दिसतात. तृणमूल काँग्रेसने तर नरेंद्र मोदी केदारनाथला गेल्याचा विरोध करत चक्क निवडणूक आयोगाकडेच तक्रार केली. तृणमूल काँग्रेसच्या या कृत्यामुळे नरेंद्र मोदींनी आपल्या श्रद्धेय भगवंताचे दर्शन घेणेही गुन्हा आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. मात्र, या सगळ्यालाच एका भयगंडाची किनार आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. देशात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेवर येण्याची व आपली सद्दी संपल्याची जाणीव या लोकांना होत असल्यानेच हे सगळे घाबरलेले लोक मोदींविरोधात नाही नाही ते उद्योग करत आहेत. म्हणजेच मुद्दा केवळ नरेंद्र मोदींच्या मंदिर दर्शनाचा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाला लागलेल्या सुरुंगाचा आहे. परंतु, या लोकांनी कितीही विरोध केला तरी कोणाची किती किंमत करायची, ठेवायची हे देशातल्या जनतेला चांगलेच कळते आणि ती येत्या २३ मे रोजी सर्वांनाच समजणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@