भांडवली बाजारात परकी गुंतवणूकीला ओहोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : भांडवली बाजारातून परकी गुंतवणूक घटण्याचे सत्र सध्या कायम आहे. मे महिन्यात तिसऱ्या आठवड्यापर्यंत भांडवली बाजारातून परकी गुंतवणूकदारांनी ६ हजार ३९९ कोटी रुपये काढून घेतले आहे. त्यापैकी २ आणि ३ मे रोजी १ हजार २५५ कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. गुंतवणूक तज्ज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार, निवडणूक निकालांबाबत अनिश्चितता आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदारांनी हे पाऊल उचलले असल्याने भांडवली बाजारावर पडझडीची चिन्हे आहेत.

 

संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महीन्यांत मोठ्या प्रमाणावर परकी गुंतवणूक झाली होती. भांडवली बाजारात फेब्रुवारीमध्ये ११ हजार १८२ कोटी, मार्चमध्ये ४५ हजार ९८१ कोटी आणि एप्रिलमध्ये १६ हजार ९३ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक झाली. जागतिक बाजारातील मध्यवर्ती बँकांनी उदारतावादी धोरण स्वीकारल्याने भारतातील गुंतवणूकीचा ओघ वाढत होता. भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याचे सत्र एप्रिल अखेरपर्यंत सुरू झाले. एप्रिल महिन्यातील गुंतवणूक फेब्रुवारी आणि मार्चच्या तुलनेत घटली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी बँकींग, वित्तीय सेवा, विमा क्षेत्रासह नैसर्गिक वायु आणि तेल आदी क्षेत्रांमध्ये रस दाखवला होता.

 

निवडणूक निकालांवर रणनिती अवलंबून

 

२३ मे रोजी निवडणूक निकालानंतर विदेशी गुंतवणूकदार आपली रणनिती ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रणनितीचा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसला आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरच पुढील गुंतवणूकीची रणनिती निश्चित केली जाणार आहे. दरम्यान बाजाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला झुकते माप दिले आहे, त्यामुळे पुन्हा मोदी सरकार सत्तेत आल्यास स्थिर सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार नवीन उच्चांक गाठू शकतो.

 

चीन-अमेरिका व्यापार युद्धाचाही परिणाम

 

जागतिक गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम सर्व भांडवली बाजारांवर होत आहे. अनेक देशांतील भांडवली बाजारात हीच परिस्थिती कायम आहे. अमेरिका आणि चीनमधल्या या तणावामुळे गुंतवणूकदारही संभ्रमात आहेत. ही स्थिती निवळल्यावर पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. व्यापार युद्ध न संपल्यास गुंतवणूकीचा ओघ आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@