संरक्षित सागरी जीवांकडेच दुर्लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2019
Total Views |



आपण जंगलाची भम्रंती करून वाघ, बिबट्या, हत्तीसारख्या संरक्षित जीवांना आवर्जून पाहतो. मात्र, कधीच मासळी उतरविण्याच्या बंदरांवर जाऊन वाघ-बिबट्यांसारख्याच संरक्षित दर्जाच्या मृत सागरी जीवांना पाहण्याची किंवा त्याबाबत जनजागृती करण्याची तसदी घेत नाही. असे का होते?


वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीमधील वाघ-बिबट्यांसारख्या प्राण्यांच्या सुरक्षेसंदर्भात राज्यात अनेक संवर्धन प्रकल्प सुरू असताना याच श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या सागरी जीवांच्या संरक्षणाबाबत आपण मागे पडताना दिसत आहोत. संरक्षित जीवांच्या बाबतीत मच्छीमारांमध्ये असलेले अपुरे ज्ञान या जीवांसाठी अपथ्यकर होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय संरक्षित सागरी मत्स्य प्रजातींना ओळखण्याबाबत असलेल्या अपुऱ्या ज्ञानामुळे वन आणि मत्स्य विभागांच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करणे अडचणीचे होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. जाळ्यात अडकलेल्या जीवांना मच्छीमारांनी जाळे कापून समुद्रात सोडून दिल्यास, त्या जाळ्याची नुकसान भरपाई म्हणून मच्छीमारांना २५ हजार रुपये अनुदान देणारी योजना शासनाने जाहीर केली आहे. मात्र, या योजनेबाबत मच्छीमारांमध्ये अजूनही प्रबोधन न झाल्याने योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

 

आपण जंगलाची भम्रंती करून वाघ, बिबट्या, हत्तीसारख्या संरक्षित जीवांना आवर्जून पाहतो. मात्र, कधीच मासळी उतरविण्याच्या बंदरांवर जाऊन वाघ-बिबट्यांसारख्याच संरक्षित दर्जाच्या मृत सागरी जीवांना पाहण्याची किंवा त्याबाबत जनजागृती करण्याची तसदी घेत नाही. असे का होते? कारण, मासे हा फक्त आपल्या ‘खाद्यांन्ना’चा विषय असल्याने आपण त्यांच्याकडे संरक्षण किंवा संवर्धनाच्या दृष्टीने फारसे पाहत नाही. शिवाय महाराष्ट्रात सागरी जीवांच्या संशोधनाच्या दृष्टीने फार कमी काम झाले आहे. त्यामुळे हा विषय आजवर दुर्लक्षित राहिला. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून काही हौशी निरीक्षक, छायाचित्रकार आणि अभ्यासक समुद्रकिनाऱ्यांवर फिरू लागले आहेत. या माध्यमातून सागरी परिसंस्थेतील जीवांची नोंद करून त्यांच्या विस्तृत माहितीचे संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. किनारे आणि बंदरांवर हे हौशी निरीक्षक फिरतात. या ठिकाणी येणाऱ्या मृत संरक्षित सागरी जीवांचे छायाचित्र त्यांच्या माहितीसह नोंदवितात. या माहितीचे समाजमाध्यमे किंवा शास्त्रीय संकेतस्थळांच्या माध्यमातून संकलन केले जाते. याशिवाय महाराष्ट्रातील किनाऱ्यांवर मृतावस्थेत वाहून येणाऱ्या डॉल्फिन, पॉरपॉईज, व्हेल जातीमधील सस्तन सागरी प्राण्यांचे संकलन काही अभ्यासक करत आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर राबविण्यात येणारी ‘मरिन लाईफ ऑफ मुंबई’ ही मोहिम याचे उत्तम उदाहरण आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील सागरी अभ्यासक, छायाचित्रकार किनाऱ्यांवर फिरून छोट्या सागरी जीवांचे संकलन करत आहेत. तर ‘मरिन मॅमल रिसर्च अ‍ॅण्ड कॉन्झर्वेशन नॅटवर्क ऑफ इंडियाया संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून येणाऱ्या सागरी सस्तन प्राण्यांची नोंद केली जात आहे. अशा चळवळींद्वारे संरक्षित सागरी जीवांप्रति भाष्य करण्यास किंवा त्यासंबंंधीच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे.

 

‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ अंतर्गत सागरी परिसंस्थेतील काही जीवांना संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये सागरी कासवे, डॉल्फिन आणि देवमाशांच्या विशिष्ट जाती, अशा परिचयाच्या प्रजातींबरोबर काही मत्स्य प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातींमध्ये ‘व्हेल शार्क,’ ‘जायन्ट गिटारफिश’ याबरोबरीनेच ‘सॉफिश,’ ‘स्टींग रे’ आणि ‘शार्क’च्या काही प्रजातींचा समावेश आहे. राज्यातील मासळी उतरविण्याच्या केंद्रांवर फेरफटका मारल्यास या संरक्षित प्रजातींचे दर्शन सहज होते. मात्र, मच्छीमार या जीवांची जाणीवपूर्वक मासेमारी करतात का? तर शक्यतो नाही. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये संरक्षित सागरी प्रजाती अनावधानाने अडकल्या जातात. ज्या मच्छीमारांना संरक्षित प्रजातींविषयी ज्ञान असते, असे मच्छीमार ताबडतोब या जीवांना जाळ्यातून बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडून देतात. मात्र, अशा प्रजातींबाबत ज्ञान नसलेल्या मच्छीमारांकडून हे जीव बंदरांमध्ये आणले जातात. बऱ्याचदा हे जीव जाळ्यातून सोडविताना जाळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मच्छीमार या जीवांची सुटका करण्याचे कष्ट उचलत नाहीत. या जीवांच्या संरक्षणाबाबत मच्छीमारांमध्ये जागृकता असली तरी, बऱ्याचदा अनावधानाने संरक्षित माशांच्या प्रजाती जाळ्यात सापडत असल्याची माहिती मच्छीमार गणेश नाखवा यांनी दिली. त्यामुळे काही मच्छीमार कारवाईच्या भीतीपोटी या प्रजातींना जखमी आणि मृत अवस्थेत समुद्रामध्ये सोडून देत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बऱ्याच वेळा संरक्षित माशांची ओळख न पटल्यामुळे काही मच्छीमारांकडून हे मासे बंदरांमध्ये येत असल्याचे, नाखवा म्हणाले.

 

 
 

संरक्षित सागरी जीवांची जाळ्यांमधून सुटका करताना मच्छीमारांचे होणारे नुकसान लक्षात घेता मत्स्यव्यवसाय आणि कांदळवन संरक्षण विभागाने संयुक्तपणे एक योजना जाहीर केली आहे. गेल्यावर्षी या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. याअंतर्गत मच्छीमारांनी जाळे कापून या जीवांना पुन्हा समुद्रात सोडल्यास आणि त्याचा योग्य पुरावा मत्स्यव्यवसाय विभागाकडे सादर केल्यास त्यांना कांदळवन संरक्षण विभागाकडून २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांमध्ये या योजनेला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण, या योजनेसंदर्भात मच्छीमारांमध्ये अजूनही जनजागृती करण्यात आलेली नाही. शिवाय या योजनेची प्रक्रियाही किचकट आहे. मच्छिमारांकडून सादर झालेल्या प्रस्तावाची सत्यता पडताळण्याचे काम मत्स्यव्यवसाय विभागाकडे आहे. यासाठी मच्छीमारांना परवाना अधिकारी, स्थानिक मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. या पडताळणीनंतर कांदळवन संरक्षण विभाग (मॅगृव्ह सेल) प्रस्तावधारक मच्छीमाराला पैसे देण्याचे काम करणार आहे. परंतु, योजना नवी असल्याने या प्रक्रियेसंदर्भात स्थानिक मत्स्यव्यवसाय अधिकारी संभ्रमात आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके आलेले प्रस्तावही लाल फितींमध्ये अडकल्याचे चित्र दिसत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ही योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यांनी मच्छीमार संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याची नोंद शासन निर्णयामध्ये करण्यात आली होती. मात्र, अजूनही जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये या योजनेविषयी संभ्रम आहे. ही योजना यशस्वी करण्यामध्ये जनजागृती कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती सागरी अभ्यासक स्वप्निल तांडेल यांनी दिली. पर्ससीन किंवा बोटधारक मच्छीमारांबरोबरच किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांच्या जाळ्यात संरक्षित सागरी जीव मोठ्या प्रमाणात अडकले जातात. त्यामुळे सर्व स्तरावरील मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे तांडेल यांनी सांगितले. जनजागृतीबरोबरच मच्छीमारांनी या जीवांना पुन्हा समुद्रात सोडताना काय काळजी घ्यावी, त्यांना कसे हाताळावे यासंबंधीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे तांडेल म्हणाले. एकूणच जनजागृती आणि प्रशिक्षण ही दोनच संरक्षित सागरी जीवांबाबत समाजात जागृकता निर्माण करून त्यांना संरक्षण देण्याचे माध्यम आहे.

 

- अक्षय मांडवकर

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@