पश्चिम बंगालमधील प्रचाराला निवडणूक आयोगाचा लगाम : २० तास आधीच प्रचारतोफा थंडावणार
महा एमटीबी   15-May-2019बाशीरहाट : पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या काळातील हिंसाचारावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये आता निवडणूक प्रचारसभा, रोड शोवर उद्या गुरुवार दि. १६ मे पासूनच बंदी घालण्यात आली आहे. सामान्यतः मतदानाच्या आधी दोन दिवस असे निर्बंध घातले जातात, परंतु, आता हा निर्णय तीन दिवस आधीच लागू करण्यात आला आहे. सोबतच निवडणूक आयोगाने कित्येक अधिकार्‍यांच्या बदल्याही केल्या आहेत. ज्यात पश्चिम बंगालच्या गृह सचिवांचा समावेश आहे. आता मुख्य सचिवच गृह सचिवांचे काम पाहणार आहेत. दरम्यान, राज्यात येत्या १९ मे रोजी अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ममता बॅनर्जींवर घणाघाती हल्ला

 


सत्तेच्या नशेत धुंद झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. भाजपला मिळत असलेल्या व्यापक जनसमर्थनाने दीदींना सत्ता गमावण्याची भीती वाटू लागली आहे. त्यातूनच त्यांचे संतुलन बिघडले आहे,” असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ते पश्चिम बंगालमधील बाशीरहाट येथे आयोजित सार्वजनिक सभेत बोलत होते
नरेंद्र मोदी म्हणाले की, “ज्या पश्चिम बंगालच्या जनतेने तुम्हाला सत्तेवर आणले, ती जनताच तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार आहे आणि ती वेळ आता दूर नाही. २०१९ मध्येच पश्चिम बंगालची जनता तुमचा पत्ता साफ करणार आहे. सोबतच प. बंगालमध्ये भाजपची लाट पाहायला मिळत आहे आणि भाजपला तिनशे जागांचा टप्पा पार करण्यास हे राज्य महत्त्वाची भूमिका निभावणार आहे,” असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

 

पुढे ते म्हणाले की, “दहशतीच्या जोरावर आपण सत्ता भोगत राहू, असे दीदींना वाटत असेल तर ते त्यांनी आता विसरायला हवे. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस असे थोर पुरुष ज्या मातीने दिलेत, तेथील जनता अशी दहशत सहन करणार नाही.” भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्मा यांच्यासंदर्भातील वादावर पंतप्रधान म्हणाले की, “सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोतील व्यंग ममतांना सहन झाले नाही. स्वतः एक चित्रकार असूनही त्यांनी बंगालच्या कन्येला तुरुंगात धाडले. इतका राग कशासाठी? तुम्ही तर चित्रकार आहात. तुमची चित्रे कोट्यवधी रुपयांना विकली जातात. तेव्हा माझे तुम्हाला सांगणे आहे की, तुम्ही माझे वाईटात वाईट चित्र काढा आणि २३ मे नंतर मी पुन्हा पंतप्रधान होईन तेव्हा ते मला भेट द्या. मी आदराने त्याचा स्वीकार करेन आणि आयुष्यभर ते चित्र जपून ठेवेन. कुठेही एफआयआर नोंदवणार नाही!”

 

दुर्गापूजेची नव्हे मोहरमची वेळ बदलली

 

गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील मोहरमच्या ताबूत मिरवणुकीसाठी दुर्गा विसर्जनाचा दिवस बदलला होता. ममतांच्या या निर्णयावरून त्यांच्यावर देशभरातून टीका झाली होती. ममतांच्या या कृत्याचा संदर्भ देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चांगलेच सुनावले. पश्चिम बंगालमधील एका सभेत त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. “संपूर्ण देशात दुर्गापूजा आणि मोहरम हे एकाच दिवशी असतात. उत्तर प्रदेशमध्ये एका अधिकार्‍याने मला विचारले की, दुर्गापूजेची वेळ बदलायची का? मी त्याला सांगितले की, दुर्गापूजेची वेळ बदलणार नाही. तुम्हाला वेळ बदलायची असेल तर मोहरमच्या ताबूतची वेळ बदला,” असा टोला त्यांनी ममता बॅनर्जींना लगावला आहे. दरम्यान, आज कोलकाताच्या फूल बागान भागामध्ये होणारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली आहे. त्यावरून देखील योगींनी ट्विट करत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

 

नशीब बलवत्तर होते म्हणून काल मी वाचलो : अमित शाह

 

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी कोलकात्यातल्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारावरून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसत असल्याने हिंसाचाराचा आधार घेतला जात आहे. पण, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता नाही. राज्यातले तृणमूल सरकार जनताच हटवेल,” असे शाह म्हणाले.

 

नशीब बलवत्तर होते म्हणून काल मी वाचलो,” अशा शब्दांत शाह यांनी आपबिती सांगितली. “काल कोलकात्यात भाजपचा रोड शो सुरू होण्याआधी तृणमूलच्या गुंडांनी भाजपचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. भाजपचा रोड शो सुरू होताच तृणमूलकडून हिंसाचार सुरू झाला. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान नसते, तर तिथून निघणे कठीण झाले असते. तृणमूलच्या गुंडांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. माझे नशीब चांगले असल्याने मी तिथून योग्य वेळी निघालो,” असे शाह म्हणाले.

 

संपूर्ण देशात निवडणूक झाली. पण केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का झाला?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे,” अशी टीका त्यांनी केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केले. “दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितके कमळ जोमाने फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावे,” असे शाह यांनी म्हटले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat