अखेर मुंबईच विजेता!
महा एमटीबी   15-May-2019

यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन तुल्यबळ संघात अंतिम निर्णायक लढत झाली. दोन्ही संघ तोडीस तोड असल्यामुळे अंतिम सामनाही चांगलाच रंगतदार झाला. प्रथम फलंदाजी करणार्या मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 षटकांत आपले 8 फलंदाज गमावून 149 धावाच करता आल्या होत्या. म्हणजेच चेन्नईला 150 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य म्हणजे अलिकडच्या टी-20 सामन्यातील आक्रमक फलंदाजी पाहता काहीच नव्हते. त्यामुळे चेन्नईच्या गोटात आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या स्पर्धेत तसेही पहिलेपासूनच चेन्नईचा दबदबा होता. अनुभवी महेंद्रिंसह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने या स्पर्धेत तीन वेळा जेतेपद पटकाविले होते. मुंबईनेही तीन वेळा चषकावर नाव कोरले होते. अशा परिस्थितीत चेन्नईला 150 धावांचे आव्हान म्हणजे काहीच नव्हते.
 
 
 
त्यांनी त्या दृष्टीने आपली वाटचालही सुरू केली होती. 19 षटकांचा खेळ आटोपला तेव्हा चेन्नईने पाच फलंदाज गमावून 141 धावा केल्या होत्या. म्हणजे शेवटच्या षटकांतील सहा चेंडूत चेन्नईला विजयासाठी 9 धावांची गरज होती आणि त्यांचे पाच फलंदाज शिल्लक होते. टी-20 मधील आक्रमकता पाहाता या धावा चेन्नई सहज काढेल, असे वाटत होते. भरीस भर तीन षटकांमध्ये एकही फलंदाज न टिपता 43 धावा देणार्या लसिथ मिंलगाच्या हाती मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू दिला. चेन्नईचे फलंदाज मिंलगाची वाट लावणार, असे वाटत होते. काही अंशी त्यांना त्यात यशही आले होते. मात्र, ते आपली विकेट वाचवू शकले नाहीत. शेन वॉटसन आणि रवींद्र जडेजासारखे दिग्गज व अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर होते. शेवटच्या षटकांत वॉटसन धावबाद झाला आणि शार्दुल ठाकूरने त्याची जागा घेतली. नऊ पैकी सात धावा घेण्यात चेन्नईला यश आले होते. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी अवघ्या दोन धावांची गरज होती. येथेच चेन्नईचा घात झाला. कारण, अनुभवी जडेजा नॉन स्ट्रायकर एण्डला होता आणि मिंलगाच्या समोर शार्दुल ठाकूर नावाचा नवखा फलंदाज होता. व्हायचे तेच झाले. अनुभवी मिंलगाने ठाकूरचा बळी घेतला आणि मुंबईच्या गोटात उत्साहाला उधाण आले. एका धावेने का होईना मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा चषकावर नाव कोरण्यात यश मिळविले.
अशी ही आयपीएल स्पर्धा करोडोचा व्यवसाय करून आटोपली. क्रिकेटपटू लखोपती झाले, आयोजक करोडपती झाले, संघाच्या फ्रँच्याईझींनी आपले हात धुवून घेतले. क्रिकेटचे चाहते रंगतदार अंतिम सामना बघायला मिळाल्यामुळे खूश होते. या आयपीएल स्पर्धेला कोणीही नाव ठेवत असले तरी, एक मात्र खरे आहे की या आयपीएलमुळे देशात असे काही घडले आहे की, त्यामुळे विविध खेळांच्याही आता लीग स्पर्धांचे आयोजन केले जाऊ लागले आहे. एरवी रेल्वेच्या स्लीपर क्लासमध्ये धक्के खात सामने खेळायला जाणारे इतर खेळांचे खेळाडू आता विमानाने प्रवास करू लागले आहेत. त्याचे एक साधे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे देता येईल. कबड्डीसारख्या दुर्लक्षित खेळाला या लीगमुळे अच्छे दिन आले, ओघानेच खेळाडूंनाही अच्छे दिन आले. बॅडिंमटन, हॉकी, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल आदी अनेक खेळांच्या लीग स्पर्धा आता देशात खेळल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंनाही विदेशी खेळांडूसोबत खेळताना आपल्याही खेळात सुधारणा करता येऊ लागल्या आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये अलिकडच्या काळात इतर खेळांच्या भारतीय खेळाडूंना लक्षवेधक कामगिरी करता येऊ लागली आहे. टेबल टेनिससारख्या खेळात भारताला कधी पदके प्राप्त होत नव्हती तिही आता मिळू लागली आहेत. असे असताना आयपीएल क्रिकेटचे अवडंबर करताना आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असताना सट्टा बाजारही त्यात हात धुवून घेत आहे, त्यातूनच मग अवैध व्यवहारांना ऊत येतो. त्यामुळे की काय या आयपीएल स्पर्धेला मॅच फिक्सिंगसारखे गालबोट लागले आहे, खेळाडू आणि संघांना त्याची शिक्षाही भोगावी लागली आहे. विजेत्या संघाला 25 कोटी रुपयांचा पुरस्कार, स्पर्धेतील एकूण पुरस्कारांची राशी 50 कोटी रुपये यावरूनच या स्पर्धेचा आर्थिक आवाका लक्षात घेता येईल.
याआधी 2009 साली जेव्हा दुसर्या आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याची वेळ आली होती तेव्हा देशात लोकसभेची निवडणूक होणार होती. त्यावेळी केंद्रात संपुआचे सरकार होते. सरकारने सुरक्षेचे कारण आणि बंदोबस्तासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण सांगून स्पर्धा आयोजनासाठी नकार दिला होता. तेव्हा ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या यजमानपदाखाली खेळली गेली होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कुठलीही हाकबोंब न होता आयपीएल स्पर्धा आणि लोकसभा निवडणूक एकत्रितरीत्या पार पडली व स्पर्धेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हीच बाब केंद्रात नेतृत्व करीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभांच्या माध्यमातून देशवासीयांच्या निदर्शनास आणून दिली.
 
 
 
आयपीएलचा धमाका आता आटोपला असून सार्यांचे लक्ष्य विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे लागले आहे. ही स्पर्धा येत्या 30 मे पासून इंग्लंडच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथसारखे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात वर्णी लागल्यामुळे आयपीएल स्पर्धा अर्धवट सोडून राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी मायदेशी रवाना झाले होते. या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी फायदा होईल, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला असला तरी अतिक्रिकेट आणि आयपीएलची दगदग यामुळे खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्ती कितपत साथ देते, हे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बघावे लागणार आहे.
 
 
चेंडू कुरतडल्याप्रकरणी वर्षभराच्या निलंबनाची शिक्षा भोगणारे स्मिथ आणि वॉर्नर संघाबाहेर असल्यामुळे गत विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाची अलिकडच्या काळातील कामगिरी टुकार झाली होती आणि हा संघ जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला होता. आता मात्र हे दोन्ही दिग्गज खेळाडू संघात परतले असल्यामुळे आणि त्यांनी वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचीही समीक्षकांना दखल घ्यावी लागली आहे. माजी विजेता भारतीय संघ कागदावर जरी बलवान वाटत असला तरी मैदानावर काय कामगिरी बजावतो यावरच या संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे. जुन्या- नवीन खेळाडूंचा समन्वय भारतीय संघात साधण्यात आला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वाधिक अनुभव असलेल्या माजी कर्णधार, यष्टिरक्षक-फलंदाज तसेच विजयाचा आनंद चाखलेला महेंद्रिंसह धोनी याला निवड समितीने पुन्हा एकदा संघात स्थान दिले आहे. त्याच्या अनुभवाचा इतर खेळाडू कसा लाभ घेतात, हेही बघावे लागणार आहे. विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व असले तरी त्याच्याच नेतृत्वाखाली रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये केलेली गचाळ कामगिरी बघता त्यांच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तर नवल वाटायला नको...!