ईश्वराविना वेदमंत्र व्यर्थ
महा एमटीबी   15-May-2019ऋचो अक्षरे परमे व्योमन्

यस्मिन् देवा अधिविश्वे निषेदु:।

यस्तन्न वेद किमृचा करिष्यति,

य इत्तद् विदुस्त इमे समासते॥

(ऋग्वेद, १.१६४.३९ अथर्व.९.१०.१८)

 

अन्वयार्थ : (ऋच:) सर्व ऋचा, वेदातील मंत्र, समग्र ज्ञान (अक्षरे) त्या अविनाशी, नष्ट न होणार्‍या (परमे व्योमन्) सर्वश्रेष्ठ महान आकाशामध्ये, ‘ओम्’ ईश्वरामध्ये आधारलेले, अवलंबलेले आहे, (यस्मिन्) ज्याच्यामध्ये (विश्वेदेवा) जगातील सर्व दिव्य गुण, देवगण (अधिनिषेदु:) थांबले आहेत, स्थिर आहेत, म्हणूनच (य:) जो मनुष्य (तत्) त्या अक्षर अविनाशी परमेश्वराला (न वेद) जाणत नाही, त्याची भक्ती (स्तुती, प्रार्थना व उपासना) करीत नाही. मग असा तो (ऋचा) केवळ ऋचा किंवा वेदमंत्र वाचून (किं करिष्यति) काय करेल? (व्यर्थच जगेल!) पण या उलट (ये) जे लोक उपासक (तत्) त्या परमेश्वराला जाणतात व त्याची भक्ती करतात, (ते इत्) तेच मानी लोक (समासते) खर्‍या अर्थाने चांगल्या प्रकारे आत्मोन्नती साधत आनंदाने जगतात.

 

विवेचन : ‘बुडाला सोडून शेंड्याला जवळ करू नये’ अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. जे सर्वांचे मूळ कारण असते, ते विसरून चालणार नाही. कारण, ज्याच्यामुळे सर्वांचे अस्तित्व उदयास आले, त्यालाच सोडून जर काही भलतेच करू लागलो, तर जे काही मिळविले अथवा कमविले, ते फायद्याचे ठरत नाही. सर्व काही व्यर्थच होते. वरील मंत्रात हाच भाव प्रत्ययास येतो.

 

सृष्टीतील सर्व भौतिक व आध्यात्मिक ज्ञानाचा आधार परमेश्वर आहे. ऋग्वेदातील ऋचा असोत की युजर्वेद, सामवेद व अथर्ववेदातील मंत्र! हे सर्व ज्ञान त्या ‘अक्षर’ म्हणजेच क्षर न पावणार्‍या (नष्ट न होणार्‍या) महान आकारस्वरूपी परमेश्वरामध्ये आश्रित आहे. त्या महान ईश्वराने समग्र विश्वाला जे दिव्य ज्ञान दिले, तेच सर्वांचे कल्याण साधणारे आहे. तो भगवंत सर्वांचा आद्य आचार्य आहे. ‘गुरुणां गुरु:’ आहे. म्हणूनच पतंजली मुनी म्हणतात, “स पूर्वेषामणि गुरू: कालेनानवच्छेदात्।”

 

सर्व ग्रंथांतील दडलेल्या ज्ञानाचा आधार अक्षर परमेश्वर असल्याने तो विद्वान व ज्ञानी जनांच्या बुद्धीत प्रकाश निर्माणकरतो. म्हणूनच तो उपासनीय आहे. तो ‘व्योम‘ म्हणजे विशेष प्रकारे सर्वांचे रक्षण करणारा आहे. त्याच भगवंतामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यशक्ती निवास करतात. त्याच्याच आज्ञेचे पालन करतात. सार्‍या जगाचे व जगातील सर्व वस्तूंचे अधिष्ठान म्हणजे तो सर्व व्यापक परमेश्वर! ब्रह्माण्डातील सारे पदार्थ त्या एकमेवाद्वितीय अशा परमशक्तीमध्ये विराजमान आहेत. उपनिषदंही याचे कथन करतात -

 

सर्वे वेदाः यत्पदमामनन्ति

तपांसि सर्वानिच यद्वदन्ति।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति,

तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत्।

 

म्हणजेच सर्व वेद आणि सर्वधर्म-कर्म पवित्र अनुष्ठानादी तपश्चरण, ज्यांचे कथन आणि आदर करतात तसेच त्या परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा बाळगणारे तपस्वी जन ब्रह्मचर्याचे पालन करतात, त्या पदाचे नाव ‘ओम्’ असे आहे.पण, आम्ही ज्ञानी कितीही झालो अथवा अनेक वेदमंत्राचे पठण केले, व्याख्याने दिली आणि वेदमंत्रांवर लेखन केले. पण, त्या परम ईश्वर ‘ओम्’ची श्रद्धेने भक्ती किंवा उपासना केली नाही, तर ते सर्व व्यर्थच झाले. मुखाने मंत्र जपले, श्लोकही वाचले, पण परमेश्वराचे ध्यान व साक्षात्कार केला नाही, तर ते सर्व पाण्यात गेले. अशा दांभिक नास्तिक भक्ताचे ईश्वर कधीही भले करणार नाही. आम्ही केवळ ज्ञानी झालो, पण ईश्वराची अनुभती न होता, प्रत्यक्षात ते ज्ञान जीवनात उतरविले नाही, तर काहीच उपयोग नाही. संत तुकाराम अशा तोंडपाठी लोकांवर ताशेरे ओढतात.

मुखे बोले ब्रह्मज्ञान। मनी धन अभिमान।आचरणविहीन ज्ञान किंवा उपासनेविना मंंत्रपाठ काहीच कामाचे नाही. आचारण शून्य कोरड्या पाषाणाचे देव (परमेश्वर) काहीच व कधीच भले करू शकणार नाही. याउलट जे मंत्र शिकू शकले नाहीत, पण धर्माचरणी आहेत. परमेश्वराचे खरे (प्रामाणिक) भक्त आहेत, ते मात्र आनंदी प्रसन्न व सदैव सुखा-समाधानाने जगतात. कितीही दुःखे आली तरी, न डगमगता ईश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवणारे भक्तगण त्या परम ओम आकाशात विचरण करतात. पण असे महात्मे फारच दुर्लभ सापडतील...

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat