‘कावळेवाले काका’
महा एमटीबी   15-May-2019
पक्ष्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणार्‍या आणि कावळ्यासारख्या अशुभ समजल्या जाणार्‍या पक्ष्याला आपला मित्र बनविणार्‍या एका अनोख्या पक्षीप्रेमाची ही कहाणी...

 

काकस्पर्शम्हणजेच कावळ्याचा स्पर्श. समाजात कावळ्याचा स्पर्श होणे अशुभ समजले जाते. मात्र, मैत्रीच्या नात्याने या जुन्या रुढींना पूर्णपणे विराम दिला तो मुलुंडच्या ७० वर्षीय त्रिक्रमजी ठक्कर उर्फकावळेवाले काका’ यांनी. त्रिक्रमजी संपूर्ण मुलुंडमध्ये ‘कावळेवाले काका’ म्हणूनच प्रसिद्ध आहेत. हातात चिवडा, दहीभात घेऊन ‘कावळेवाले काका’ घराबाहेर पडतात. त्यांनी वाजवलेल्या एका शिट्टीत शेकडो कावळे जमा होतात. काकांच्या हातावर, डोक्यावर, मानेवर बसून ते खाऊ खातात. हे दृश्य बघून अनेकांना चक्क आश्चर्याचा धक्काच बसतो.

 

मुलुंडच्या ‘योगीहील’मध्ये राहणारे ठक्कर व्यवसायाने ब्रोकर असून पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. ‘कावळेवाल्या काकां’ची वृद्धापकाळातसुद्धा प्राणिसेवा निरंतर सुरूच आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या परिवाराने त्यांना या कार्यापासून कधीही रोखले नाही. उलट हवी ती मदत त्यांनी काकांना केली. लहान मुलांमध्ये ‘काका’ खूप प्रसिद्ध असून दररोज त्यांना कावळ्यांना बोलावताना आणि खाऊ खायला घालताना बघण्यासाठी लहान मुले उत्सुक असतात. लहानपणापासून प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रचंड प्रेम असल्याने रोज परिसरातील कुत्र्यांना साद देऊन गोळा करतात आणि त्यांना प्रेमाने खाऊ घालतात. त्यांचे प्राणिप्रेम वयानुसार वाढतच गेले. भुकेने व्याकूळ असणार्‍या मुक्या प्राण्यांना पाहून ते अस्वस्थ होतात. माणसांप्रमाणे पक्षी आणि प्राणी यांनासुद्धा जगण्याचा हक्क आहे. त्यांना खायला तर आपण नक्कीच देऊ शकतो, असे त्रिक्रमजींना वाटत असे. मग त्यांनी आपल्या दिनक्रमामध्ये दररोज पक्ष्यांना आणि प्राण्यांना खायला घालण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा समावेश केला. त्यांच्या याच सवयीमुळे एका सादेवर जमणारे कुत्रे बघून त्यांच्या मित्राने, “तू कावळ्यांना शिट्टी मारून गोळा करू शकशील का? मी दहा हजारांची पैज लावतो,” असे आव्हान दिले.

 

ठक्कर यांनी रोज हातात खाऊ घेऊन कावळ्यांना शिटी मारून बोलावण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसात शेकडो कावळे त्यांच्या एका शिट्टीवर जमू लागले आणि गेल्या ४५ वर्षांपासून त्यांची आणि कावळ्यांची ही अतूट मैत्री अधिक घट्ट होत गेली. रोज सकाळी उठून कावळ्यांसाठी खाऊ घेऊन दहा-बारा ठिकाणी फिरून शिट्टी वाजवून कावळ्यांना बोलवून खाऊ घालणे हा त्यांचा रोजचा उपक्रम आहे. आज त्यांच्या जीवनात या सर्व मुक्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांचा कावळ्यांवर विशेष लोभ आहे. कारण, कावळा निसर्गाची स्वच्छता राखण्यास खूप मदत करतो. या शेकडो कावळ्यांमध्ये आणि ‘कावळे काकां’मध्ये प्रेमाचे सुंदर नाते आहे.

 

पक्षी-प्राण्यांवर केलेले प्रेम ते कधीही विसरत नाहीत. २० वर्षांच्या या प्रदीर्घ मैत्रीत यांच्यातील मैत्रीसुद्धा अशीच बहरली आहे. कावळा अशुभ असतो वगैरे अंधश्रद्धांवर काकांचा अजिबात विश्वास आही. हे सर्व चुकीचे समज आहेत, असे ‘काका’ म्हणतात. काकांनी या पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी खूप सोई उपलब्ध केल्या आहेत. विशेषतः उन्हाळ्यात पक्षी आणि प्राण्यांचे खूप हाल होतात. त्यांना अन्नपाणी मिळत नाही. कावळे, कुत्रे आणि इतर प्राण्यांसाठी ठक्कर यांनी अनेक इमारतींखाली सिमेंटचे छोटे-छोटे हौद बनवले आहेत. पालिकेने ठक्कर यांच्या प्राण्यांना खायला घालण्याच्या पद्धतीची तपासणी केली असता, कुठेही अस्वच्छता दिसून आली नाही. त्यामुळे पालिकेनेही त्यांचे कौतुक केले.

 

समाजात कावळ्याला स्पर्श झाल्यावर अशुभ घडते आणि वाईट घटना घडते असे मानले जाते. मात्र, ठक्कर यांची मात्र कावळ्यांशी मैत्री करून प्रगती झाली, असे ते मान्य करतात. माणसे कावळा सोडून सर्व पक्ष्यांवर प्रेम करतात. खरे तर कावळा अत्यंत चाणाक्ष आणि स्वच्छता राखणारा पक्षी आहे. काक म्हणतात की, “आपल्या धर्माप्रमाणे कावळे आपले पितर आहेत. कावळ्यांच्या सान्निध्यात मला खूप समाधान मिळते. कावळ्यांमुळेच मला ‘कावळेवाले काका’ अशी ओळख मिळाली. आज दीड हजारांपेक्षा जास्त कावळे माझे मित्र असून एक शिटीत गोळा होतात. त्यांच्या या नि:स्वार्थी प्रेमाची तुलना करणे अश्यक्य आहे,” असे कावळेवाले काका आनंदाने सांगतात.

 

अनेकांनी त्यांना कावळ्याशी असणारी ही मैत्री अशुभ असून त्याचा काही वाईट परिणाम होईल, असेही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व गोष्टींचा काकांवर काहीही परिणाम झाला नाही. आजच्या स्वार्थी जगात माणसे-माणसांपासून, रक्ताच्या माणसांपासूनसुद्धा लांब जात आहेत. दिखावी दुनियेच्या मोहजालात आजचा माणूस फसत चालला असून माणसांपासून दुरावला जातो आहे. त्यामुळे आजच्या जगात या कावळेप्रेमाला तोड नाही. यातून नक्कीच आपण काही शिकणे गरजेचे असून भूतदया आपला धर्म आहे. यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक आहे. निसर्गाला वाचविण्यासाठी आपल्याला या प्राणिमात्रांचे रक्षण करणे गरजेचे आहे. शिवाय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण आपली जबाबदारी पार पाडायला हवीठक्कर आणि कावळ्यांची ही अनोखी मैत्री आश्चर्यकारक आहे. रूढी-परंपरांपेक्षा भूतदया किती श्रेष्ठ आहे, हे या मैत्रीतून दिसून येते.

 
 
- कविता भोसले
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat