कोलकात्यातील हिंसाचारात मी केवळ सीआरपीएफमुळे वाचलो : अमित शाह
महा एमटीबी   15-May-2019कोलकाता : भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकाता येथील रोडशोदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शहा यांनी एका पत्रकार परिषदेत बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. बुधवारी दुपारी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

 

अमित शाह म्हणाले, "कोलकात्यातील रोड शोला सीआरपीएफचे संरक्षण नसते तर माझे वाचणे कठीण होते. कालच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. रोड शोमध्ये काही विद्यार्थी गोंधळ करतील, अशी शक्यता वर्तविली असूनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली नाही, असे म्हणत अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केले.

 

अमित शाह देव आहेत का ? : ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी अमित शहा देवा आहेत का, त्यांच्याविरोधात निदर्शने केली जाऊ शकत नाहीत का ?, असा सवाल विचारला आहे. दरम्यान याविरोधात आता तृणमुल कॉंग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. ममता बॅनर्जी यांनी ईश्वर चंद्र विद्यासागर यांची प्रतिमा फेसबुक आणि ट्विटरवर प्रोफाईल म्हणून ठेवली आहे. यानंतर तृणमुलच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही ही मोहीम सुरू केली आहे.

 

आम्ही मुर्तीपूजेचे समर्थक : योगी आदित्यनाथ

योगी आदित्यानाथ यांनीही या प्रकारावर ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, "ममता दिदी तुम्ही ज्यांना आश्रय दिला आहे ते मुर्ती पूजा मानत नाहीत. ज्या गुंडांना तुम्ही आश्रय दिला आहे ते जागोजागी जाऊन मूर्ती खंडित करण्याचे काम करत आहेत. त्यांनी भाजपची प्रतिमा बिघडवण्यासाठी आणि स्वतःची कुकर्म लपवण्यासाठी ईश्वर चंद्र विद्यासागर यांची मुर्ती खंडीत करण्याचे दुष्कृत्य केले आहे."

 

बंद महाविद्यालयातील मुर्तीची तोडफोड कशी होऊ शकते : अमित शाह

हिंसाचारामध्ये समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप अमित शाह यांनी फेटाळून लावले आहेत. आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी अमित शाह यांनी काही फोटो दाखवले. महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद असतानाचा फोटो अमित शाह यांनी दाखवला. महाविद्यालयाच्या आत जाऊन एका खोलीत असलेला पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्ते कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रकार सायंकाळी साडेसात वाजता घडला होता. त्यावेळेस कॉलेज बंद होते. "त्यामुळे कुलूप उघडून आम्ही आतमध्ये जाऊन तोडफोड करू शकत नाही," असे अमित शाह म्हणाले.

 

ममता मिळवताहेत खोटी सहानूभूती

खोटी सहानुभूती आणि मतांचं राजकारण करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसने विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली असल्याचा आरोप अमित शाहांनी केला आहे. विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड ही ममता बॅनर्जींचे दिवस फिरल्याची चिन्ह आहे, असेही शाह म्हणाले.

 

ममतांचा हुकूमशाहीद्वारे होत असलेला प्रचार थांबवा !

पश्चिम बंगालमध्ये संविधानिक तंत्र संपुष्टात आल्याचा दावा भाजपने केला आहे. रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे मुक्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी भाजपनेच हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat