दुष्काळाबाबत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला जाब विचारावा : शिवसेनेचे प्रत्युत्तर
महा एमटीबी   14-May-2019
मुंबई : दुष्काळी कामांवरून प्रश्न उपस्थित करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. “जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्या राष्ट्रवादीला विचारावा,” असे विधानपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात दुष्काळावरून राज्य सरकारवर हल्ला चढवला होता. २९ हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामे केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता.

 

गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत भाजप-शिवसेना युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. सरकारचा शेतकर्‍यांना मदत करण्याचा हेतू प्रामाणिक आहे. दुष्काळ हे नैसर्गिक संकट आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावर उपाययोजना करण्याचे सरकारचे काम निरंतर सुरू आहे,” असे अनिल परब यांनी नमूद केले. “विरोधकांकडे सध्या काही विषय नाही, केवळ आरोप करायचे म्हणून ते दुष्काळावरून आरोप करीत आहेत,” असेही परब म्हणाले. “आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीकडे सलगपणे जलसिंचन खाते होते. त्यामुळे राज यांनी आताच्या दुष्काळाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाब विचारला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

 

युती सरकारवर जलसिंचनात भ्रष्टाचार झाल्याचा एकही आरोप नाही!

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या 1५ वर्षांच्या काळात जलसिंचनाचे नेमके काय झाले ते सर्वांना माहीत आहे. कागदोपत्री प्रचंड निधी खर्च झाला पण प्रत्यक्ष सिंचनच झाले नाही. आमच्या युती सरकारच्या आम्ही जलसिंचनाची खूप कामे केली आणि अजूनही करत आहोत. आगामी काळात या कामांचे फायदे राज्याला मिळतील असे सांगून युती सरकारवर जलसिंचनात भ्रष्टाचार झाल्याचा एकही आरोप नाही,” असा दावाही अनिल परब यांनी यावेळी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat