महावितरणची ‘बिजली गर्ल’
महा एमटीबी   14-May-2019बहुतांशी महिलांचा सुलभ मार्गावरून जीवनप्रवास करण्यावर भर असतो, तर काहीजणी भेगाळली वाट निवडून नवा स्वत:चा नवीनच मार्ग निर्माण करतात. त्यापैकीच एक म्हणजे उषा जगदाळे...

 


पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून महिला दिवसेंदिवस विविध क्षेत्रं पादक्रांत करताना दिसतात
. परंतु, आजही काही क्षेत्रं अशी आहेत, त्यामध्ये फारशा महिला कार्यरत दिसत नाहीत. त्यातही विशेषकरुन कारकुनी कामांनाच महिलांचे प्राधान्य असल्याचे दिसते. या मानसिकतेला अपवाद ठरली, ती महावितरणची बीड जिल्हातील कडा येथील महिलातंत्रज्ञ उषा जगदाळे. खरेतर महिला म्हणून कार्यालयीन पोस्टिंग उषाला मिळविता आलेही असते. परंतु, तिने मात्र आपल्या कामाचे स्वरूप ओळखून प्रत्यक्ष साईटवरच काम करण्याचा निर्णय घेतला. महिला असूनही ती तरबेज पुरुष कर्मचार्‍यांप्रमाणे खांबावर चढते. विजेची सर्व कामे करते म्हणून नव्हे, तर साहस आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर तिने ‘महावितरणची दामिनी,’ ‘बिजली गर्ल’ आणि ‘महावितरणची हिरकणी’ अशी आपल्या कामाला साजेशी बिरुदे मिळविली आहेत. ती तर तिच्या कामामुळे परिसरातील लोकांच्या विश्वासास पात्र ठरलीच. शिवाय, तिच्या कामामुळे प्रकाशाचा झोत देणारी ती एक प्रकाशज्योत बनली आहे.

 

महावितरणच्या सेवेत असणार्‍या उषा जगदाळेचा पेशा वीजतंत्रज्ञ म्हणून असला तरी, मूळ मात्र खेळाचे आणि कूळ शेतकर्‍याचे. खरेतर उषाला खेळात रस होता. तिने खो-खोमध्ये सुवर्णपदकेही पटकावलेली आहेत. उषाने शालेय जीवनात हिमाचल प्रदेश, पंजाब, पटियाला, जालंधर, इंदौर, हैदराबाद आदी ठिकाणी राष्ट्रीय खो-खोच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. भविष्यातील कारकीर्द सोनेरी असतानाही तिने आपल्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती ओळखत हिरकणी होण्याचा प्रयत्न मात्र सोडला नाही. वडील भाऊसाहेब जगदाळे. देवीगव्हाण (ता. आष्ठी जि. बीड) येथे त्यांची तीन एकर कोरडवाहू शेती आणि शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. घरात आईसह थोरली मुलगी उषा, तिच्यापेक्षा आणखी एक लहान मुलगी अन् त्यानंतरचा सर्वात लहान भाऊ.

 

शेती केवळ निसर्गाच्या भरवशावर. अगदी चांगलेच पिकले तर ठीक अन्यथा अर्धपोटीच. अशा परिस्थितीतही उषाचे कसेबसे खेळाबरोबर दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणाची आस असतानाही वडिलांच्या कर्तव्य जबाबदारीतून मुक्त होण्याच्या कल्पनेला उषाने अगदी खिलाडू वृत्तीने होकार दिला अन् ती त्याच तालुक्यातील तवलवाडीच्या भारत सूर्यभान केरुळकर यांच्याशी विवाहबद्ध झाली. सासरचीही परिस्थिती वेगळी नव्हती. तिथेही अडीच-तीन एकर शेती. परंतु, उषा येथेही डगमगली नाही. कारण, माहेरी कष्ट उपसण्याचे त्यात समाधान मानत पुढे जाण्याचे संस्कार तिच्यावर होते. शिवाय, सर्वांशी प्रेमाने वागत आई-वडिलांप्रमाणे सासू-सासर्‍यांचे प्रेम मिळविण्याची शिदोरी तिच्याकडे होती. त्यामुळे तिचा संसार फुलत गेला. ती नोकरी सांभाळत-सांभाळत घरातील सर्व रांधावाढायची कामे नित्यनियमाने पहाटेपासून करते. पतीच्या दुग्ध व्यवसायातही ती पतीला हातभार लावते. ”2013 मध्ये महावितरणच्या भरतीसाठी अर्ज करायला गेले होते. पण, तिथे गेल्यावर कळले की, खेळाडू कोट्यातून जागा आहे. अर्ज भरण्याची ती त्यादिवशीची शेवटची तारीख होती. तोपर्यंत महावितरण म्हणजे काय हेच माहितीही नव्हते. खो-खोच्या बळावर खेळाडू कोट्यातून महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून तिची निवड झाली. आज महावितरणच्या आष्ठी तालुक्यातील कडा शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून उषा कार्यरत आहे.

 

आपल्या नोकरीतील कामाचे स्वरूप ओळखून उषाने कुठे महिला म्हणून कार्यालयात पोस्टिंग मागण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी, साईटवरच आपल्या पदाचे काम मागितले. ते तिला देण्यातही आले. कडा येथे काम करताना वीजवाहिनी दुरुस्ती, रोहित्राची किरकोळ दुरुस्ती, फ्युज कॉल अटेंड करणे, नवीन जोडणी देणे, वीजदेयक वसुली, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कामे कार्यालयातील वरिष्ठांसह वीज ग्राहकांनाही विश्वासात घेऊन ती करते. तिच्या नियमित आणि निष्ठापूर्वक कामामुळे कडा येथील महावितरणची परिस्थिती सुधारली आहे. लोकांच्या तक्रारीही कमी होऊन तेथील वसुली क्षमता वाढून हानीचे प्रमाणही नियंत्रित झाले आहे. येथील नागरिकांचा उषावरील विश्वास अधिकच दृढ होत गेला अन् परिसरात ती महावितरणचीबिजली गर्ल,’ ‘हिरकणी’ व ‘दामिनी’ नावाने परिचित झाली. वाढत जाणार्‍या प्रशंसेने उषा अधिकच प्रकाशझोतात येत होती, तशी तिच्यावरच्या कामाची जबाबदारी वाढत गेली. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे, तसेच पुरस्कारांनी तिला गौरविण्यात येत आहे. खेळापासून सुरू झालेला पुरस्कारांचा हा सिलसिला आजही कायम आहे. साधरणत: बातम्यांमुळे सामान्य माणसे प्रकाशझोतात येतात. मात्र, उषाला तिच्या कामामुळे प्रकाशज्योत बनून वीजग्राहकांसह इतरांना प्रकाशझोत देण्याचे भाग्य मिळाले आहे. त्यात समाधानी असल्याचे ती आनंदाने सांगते. तिच्या कामाचा तिच्या सासर-माहेरच्यांना सार्थ अभिमान आहे. उषाच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम !

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat